सैन्यातील पराक्रमासाठी दिले जाणारे परमवीर चक्र मराठमोळ्या सावित्रीबाईंनी बनवलं आहे

भारत देशाच्या रक्षणार्थ युद्धादम्यान गाजवलेल्या अतुलनीय शौर्याचा सन्मान म्हणून सैनिकांसाठी परमवीर चक्र हे सर्वात मोठे मान चिन्ह आहे. जिवंत आणि मरणोत्तर अशा दोन्ही वेळी हे पदक दिले जाते. हे पदक मिळवणे म्हणजे कोणत्याही सैनिकासाठी सर्वोच्च अभिमानाची गोष्ट असते.

पण भिडूनों या पदकाच्या निर्मिती मागे देखील एक गोष्ट आहे. भारतीय सैन्यासाठी दिल्या जाणाऱ्या या पदकाचे डिझाइन हे सावित्रीबाई खानोलकर या मराठमोळ्या महिलेने तयार केले आहे.   

सावित्रीबाई खानोलकर या आधी मुळच्या मराठी नव्हे तर भारतीय देखील नव्हत्या. त्यांचे मुळ नाव ‘इव्हा युओन लिंडा मॅदे -दे मोरॉस’. जन्म स्वित्झर्लंडमधील न्यूशातेलमध्ये २० जुलै १९१३ रोजीचा. वडील हंगेरियन, तर आई रशियन होती. इव्हाने आईला कधी पाहिले नाही. वडील जिनेव्हाच्या ‘लीग ऑफ नेशन्स’ मध्ये ग्रंथपाल होते. त्यामुळे बालपण जिनेव्हात गेले.

ही गोष्ट १९२९ मधील आहे. घरी करणारे दुसरे कोण नव्हते त्यामुळे वडिलांनी इव्हाला शिक्षणासाठी वसतिगृहात ठेवले होते. एकदा रिव्हिएराच्या समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेली असता तिचे लक्ष ब्रिटिश सोल्जर्सच्या एका घोळक्याकडे गेले.

ब्रिटनमधील सॅन्डहर्स्ट येथे रॉयल मिलिटरी ॲकॅडमी मध्ये सैनिकी प्रशिक्षणासाठी आलेला एक ग्रुप होता आणि सुट्टीमध्ये स्वित्झर्लंडमध्ये ते फिरायला आले होते.

त्या ग्रुपमध्ये विक्रम खानोलकर नावाचा तरुण पण वरिष्ठ अधिकारी होता. खानोलकर हे वेंगुर्ल्यातील मराठी कुटुंबातील. त्यांच्या कुटुंबाला देखील देशसेवेचा मोठा वारसा होता. वडील रामजी खानोलकर आणि आजोबा धोंडोजी खानोलकर दोघेही सैन्यात होते.  

इव्हा आणि विक्रम दोघांचीही पहिली भेटच प्रेमात पडायला पुरेशी ठरली.  इव्हा अवघी १६ वर्षांची आणि कॅप्टन खानोलकर २७ वर्षांचे होते. 

भारताबद्दल अधिकच कुतूहल असलेल्या इव्हाला भारत देश खूपच आवडला. पण यामध्ये आणि संस्कृतीमध्ये खूप फरक असल्यामुळे वडिलांनी मात्र त्यांच्या लग्नाला परवानगी दिली नाही, पण दोन वर्षांत वडिलांचा विरोध झुगारून १९३२ मध्ये तिने तडक मुंबई गाठली.

वास्तविक तिशी गाठल्याशिवाय विवाहबंधनात अडकायचे नाही, असा ब्रिटिश सैन्याचा संकेत होता; पण विक्रमने इव्हासाठी तो संकेत मोडला. लखनऊमध्ये इव्हाची समारंभपूर्वक मराठमोळी सावित्री झाली.

सावित्रीबाई आणि विक्रम यांचे वास्तव्य काही काळ औरंगाबादेत होते. युरोपियन पार्श्वभूमीतून आल्या असूनही त्यांनी भारतीय संस्कृतींशी चटकन जुळवून घेतले. शाकाहार आत्मसात केला, हिंदू प्रथा-परंपरा पाळू लागल्या. त्या काळात प्रयत्नपूर्वक मराठी, हिंदी आणि गुजराती भाषांवर देखील प्रभुत्व मिळवले.

पुढे विक्रम यांच्या विविध ठिकाणाहून बदल्या झाल्या. त्या दरम्यान त्यांनी पाटणा विद्यापीठातून हिंदी व संस्कृतचे धडे घेतले. हिंदू पौराणिक ग्रंथांचे आणि भारताच्या इतिहासाचा सखोल अभ्यास केला. लोकसाहित्य, नृत्य, चित्रकला आणि संगीत यांसारख्या शास्त्रीय कलांमध्ये त्यांनी नैपुण्य मिळवले.

साधी सुती साडी, ठसठशीत कुंकू , पायात मराठी चपला, चेह-यावर शांत भाव असे तिचे व्यक्तिमत्त्व होते. चित्रकला त्यांचा आवडता विषय होता.

ब्रिटनमध्ये शौर्यपदक म्हणून ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ दिला जातो. त्या धर्तीवर भारताच्या लष्करातही सर्वोच्च सन्मान दिला जावा, अशी कल्पना मेजर जनरल हिरालाल अटल यांच्या मनात होती. खुद्द पंडित जवाहरलाल नेहरू यांचे पाठबळ या कल्पनेला होते.

सावित्रीबाईंची प्रगल्भता पाहून हिरालाल यांनी या सन्मानाच्या डिझाइनचे काम त्यांच्याकडे सोपवले.

त्यानुसार सावित्रीबाईनी हिंदू पुराणांतील इतिहास आणि संस्कृतीची सांगड घालत ऋषी दधिची यांच्या कथे पासून प्रेरणा घेत मेडलचे डिजाईन तयार केले. ऋषी दधिची यांनी इंद्र वज्र निर्माण करण्यासाठी आपल्या अस्थींचे दान केले होते.

या कथेनुसार पदकाच्या डिजाईनमध्ये इंद्र वज्राच्या चार प्रतिकृती आहेत, ज्या ऋषी ददधिची यांनी केलेल्या समर्पणाचे प्रतिक आहेत आणि मध्यभागी राष्ट्रचिन्ह अशोकस्तंभ आहे. याखेरीज पदकावर शिवरायांची तलवार आहे. पदकाला जोडण्यासाठी एक जांभळी रिबीन आहे.

योगायोगाने, पहिले परमवीरचक्र सावित्रीबाईंची मोठी मुलगी कुमोदिनी यांच्या दिराला – मेजर सोमनाथ शर्मा यांना जाहीर झाले. काश्मीर युद्धातील शौर्याबद्दल नोव्हेंबर १९४७ मध्ये त्यांना हा मरणोत्तर सन्मान मिळाला.

आतापर्यंत एकवीस शूर सैनिकांना हा मान मिळाला. त्यातले एकोणीस जण रणांगणावर मृत्युमुखी पडले. तर ३ जणांना जिवंतपणी हा सन्माम मिळाला आहे.

पायलटचा परवाना मिळवणाऱ्या देखील सावित्री खानोलकर या पहिल्या भारतीय महिल्या होत्या. जालंधरच्या उत्तर भारतीय फ्लायिंग क्लबमधून त्यांनी हा परवाना मिळवला होता.

१९५२ मध्ये त्यांचे पती विक्रम खानोलकर यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी समाजकार्यात आपले लक्ष केंद्रित केले. युद्धामध्ये शाहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना, फाळणीत नुकसान झालेल्या कुटुंबियांसाठी त्यांनी मदत करायला आणि आधार द्यायला सुरुवात केली. पुढे त्यांनी आपले उर्वरित आयुष्य रामकृष्ण मठाची सेवा करण्यासाठी वाहिले. या दरम्यान त्यांनी महाराष्ट्रातील संतांवर एक पुस्तक देखील लिहिले.

स्वित्झर्लंडमधील जन्म आणि त्यानंतर ओळखही नसलेल्या भारतीय संस्कृतीशी त्या चटकन समरण झाल्या. २६ नोव्हेंबर १९९० मध्ये त्यांचे निधन झाले. ७७ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी आपल्या कामाने आणि समाजसेवेने फक्त महाराहाष्ट्रातच नाही तर भारतात आपले नाव अजरामर केले.

   हे हि वाच भिडू. 

1 Comment
  1. Lakhani says

    Whata life ! Had she any children?

Leave A Reply

Your email address will not be published.