एका कोकणी डॉक्टरचं नाव पाकिस्तानमधल्या रस्त्याला देण्यात आलं होतं

जवळपास शंभर वर्षांपूर्वीचा काळ. फाळणी व्हायची होती. अखंड भारतावर तेव्हा इंग्रजांचे राज्य होते. त्याकाळात वायव्य सरहद्दीवरील बलुचिस्तानच्या क्वेटा या शहरात एक कोकणी डॉक्टर निस्वार्थ पणे सेवा करत होता.

डॉ. रामजी धोंडजी खानोलकर त्यांचं नाव.

मूळचे वेंगुर्ल्याचे. जात्याच हुशार. त्यांचे वडील ब्रिटिश सैन्याच्या नोकरीत होते म्हणून त्यांनी आपल्या मुलांना शिक्षणाच महत्व पटवून दिलं होतं. रामजी खानोलकर मेडिकलची परीक्षा उत्तीर्ण होऊन वडिलांप्रमाणे आर्मी जॉईन केली.

त्यांची नेमणूक ब्रिटिश लष्करामध्ये सब असिस्टंट सर्जन म्हणून झाली. त्यांनी लष्करासोबत अनेक देशांचा प्रवास केला. इराण, अफगाणिस्तान, एडन, चीन, अरबस्थान या देशांचा प्रवास त्यांनी केला. १८८६ साली त्यांची नेमणूक क्वेटा या शहरातील सरकारी लष्करी इस्पितळात झाली. १९०० च्या चीन मधील बॉक्सर युद्धात त्यांनी वैद्यकीय सेवा पुरवली. १९०६ साली ते सरकारी नोकरीतून निवृत्त झाले.

निवृत्त झाल्यावर लोकाग्रहास्तव त्यांनी क्वेटयातच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.

क्वेटा हे बलुचिस्तानची राजधानी. पश्तून पठाण यांच्या सोबतच सिंधी पंजाबी शीख लोकांची संख्या त्याकाळी खूप होती. डॉ.रामजी खानोलकर यांनी तिथे स्वतःचा एक खाजगी दवाखाना सुरू केला. अगदी थोड्याच दिवसात तो प्रचंड लोकप्रिय झाला.

ग्रँड ओल्ड मॅन ऑफ क्वेटा अस त्यांना म्हटलं जायचं.

क्वेटा या शहरात डॉ.रामजी यांनी एक मोठा दुमजली बंगला बांधला होता. या बंगल्यात जवळपास ३० जणांचं खानोलकर कुटुंब राहत असे. रामजी यांचा क्वेटामध्ये चांगलाच दबदबा होता. त्यांच्या कडे दोन मोठ्या कार, एक बग्गी ४ घोडे होते.

फ्रँटियर गांधी म्हणून ओळखले जाणारे खान अब्दुल गफार खान यांचं त्यांच्या घरी येणं जाणं असायचं.

क्वेटात त्यांनी बरेच समाजकार्य केले. तिथे त्यांनी स्वखर्चाने बहुजनांसाठी धर्मशाळा स्थापन केली. रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर हे क्वेटामधील हिंदूपंचायत आणि स्वामी देशराज धर्मशाळा (प्रार्थना मंदीर) या संस्थांचे कित्येक वर्षे अध्यक्ष होते.

त्यांच्या समाजसेवेच्या प्रभावामुळे क्वेटा येथील रस्त्याला “रामजी लेन” असे नाव दिले होते.

रायसाहेबांना इंग्रजी, हिंदी, संस्कृत, गुजराती, कन्नड, उर्दू, पुस्तू, पर्शियन इत्यादी भाषा अवगत होत्या. त्यांनी आपल्या जन्म गावी वेंगुर्ला येथे देखील अनेक सुधारणा केल्या.

१९०३ साली मठ (पूर्वीचे सावंतवाडी संस्थान) ता. वेंगुर्ला येथे स्वखर्चाने शाळा सुरू करून सर्व समाजातील गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सोय करून दिली. सर्वच समाजाच्या विद्यार्थ्यांना त्यांनी अनेक शिष्यवृत्ती दिल्या.समाजाला सुधारायचे असेल तर शिक्षणाची गरज त्यांनी ओळखली आणि त्यामुळे त्यांनी ज्ञान आणि शिक्षणाच्या प्रसाराच पवित्र कार्य हाती घेतलं.

त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून ब्रिटिश सरकारने १९२८ साली त्यांना राय बहाद्दूर ही मानाची पदवी दिली होती.

त्यांचे जेष्ठ पुत्र डॉ. विष्णुपंत रामजी खानोलकर यांनी वडीलांच्या इस्पितळात सर्जन म्हणून काम पाहिले. त्यांचे दुसरे पुत्र कर्करोगतज्ञ व मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. वसंतराव खानोलकर. मेजर जनरल विक्रम रामजी खानोलकर. नातू रावसाहेब मधुसूदन खानोलकर आणि डॉ. प्रकाश खानोलकर. सून सावित्री खानोलकर ज्यांनी परमवीर चक्राची निर्मिती केली. या सर्वांनी तसेच खानोलकरांच्या पुढच्या पिढीने रायासाहेबांची कीर्ती साऱ्या जगात पसरवली.

रायसाहेबांचे बंधू कै. विठ्ठल खानोलकर यांनी आपल्या जेष्ठ बंधूने सुरू केलेले समाजकार्य तसेच चालू ठेवले. त्यांनीच मठ येथिल डॉ. खानोलकर हायस्कूल बांधून पूर्ण केल.

अशा या समाजसुधारकाचा आणि समाजनेत्याचा मृत्यू  ३१ मे १९३५ रोजी पहाटे ३:०२ मी. क्वेटा शहरात घडलेल्या भयानक भूकंपात झाला.

त्यांच्या कुटुंबातील १३ सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू या भूकंपात झाला. क्वेटातील ६०००० लोकांचा मृत्यू या भूकंपात झाला होता. डॉ. खानोलकर विचारवंत, समाजसुधारक आणि बुद्धिवादी होते. त्यांनी आपल्या कार्याने स्वत:चा ठसा उमटवला. सामजिक बांधिलकी त्यांनी जपली होती. त्यांचा वारसा त्यांच्या मुलांनी क्वेटा मध्ये जपला.

मात्र १९४७ च्या फाळणीनंतर खानोलकर कुटुंबाला जीव वाचवून तिथून पळून यावे लागले. आजही त्यांची आठवण असलेला रामजी लेन पाकिस्तानच्या क्वेटा शहरात पहावयास मिळतो.

संदर्भ- वामन परुळेकर

http://wamanparulekar.blogspot.com/2012/04/blog-post_10.html?m=1

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.