एकेकाळी टेम्पो चालवणाऱ्या मुलाला पितांबरी नावाचं शंभर नंबरी सोनं गवसलं होतं.

रवींद्र प्रभुदेसाई मूळचे ठाण्याचे. तिथल्या चाळीतच त्यांचं बालपण गेलं. वडील पूर्वी रेल्वेत नोकरीला होते. त्यांनी ती नोकरी सोडून रिक्षांना परवाना देण्याच काम करणारे एजंट बनले.

स्वतःची रिक्षा घेतली मग पुढे टेम्पो असे करत करत स्वतःचा ट्रान्सपोर्टचा बिजनेस सुरू केला. वडिलांची खटपट रवींद्र लहानपणापासून पाहत होते. त्यांच्यासोबत अनेकदा ते कंपन्यांमध्ये टेम्पो घेऊन जायचे.

यामुळे खूप कमी वयात एक सक्सेसफुल बिझनेसमन बनण्याचं त्यांनी स्वप्न पाहायला सुरवात केली.

रवींद्र अभ्यासात हुशार नव्हते पण परिस्थितीमुळे व्यवहारज्ञान आलेलं होतं. इंजिनियरिंगला प्रवेश मिळाला नाही मग केमिस्ट्रीमध्ये ग्रॅज्युएशन केलं. लहानपणीच ठरवलेलं की नोकरी करायची नाही.

डोंबिवलीजवळ त्यांनी एक टाईल्स बनवण्याची  फॅक्टरी सुरू केली.

अनुभव नसल्यामुळे एक छोटी चुक झाली आणि फटक्यात ७-८ लाखांचं नुकसान झालं. त्याकाळच्या मानाने खूप मोठी रक्कम होती. धंदा बंद करावा लागला.

दुसरा कोणी असता तर कोलमडून पडला असता. पण रवींद्र प्रभुदेसाई यांनी जिद्द हरली नाही. वडिलांनी देखील खंबीरपणे पाठिंबा दिला. प्रभुदेसाई नव्या संघर्षासाठी सज्ज झाले.

अरविंद गोरे नावाचे एक गृहस्थ त्यांच्या वडिलांचे मित्र होते.

वडिलांनी रवींद्र यांना त्यांच्या हाताखाली शिकण्यासाठी पाठवलं. अरविंद गोरे यांना लिक्विड सोप, डिटर्जंट पावडर बनवण्याचे फॉर्म्युले माहीत होते. रवींद्र यांनी हे शिकून स्वतःचे डिटर्जंट पावडर बनवण्यास सुरवात केली. ताज हॉटेल कडून मोठी ऑर्डर मिळाली.

ताजच्या ऑर्डरमूळे रवींद्र प्रभुदेसाई यांचा धंदा स्थिर झाला. पण त्यांचं लक्ष्य मोठं होतं.

एक छोटा सप्लायर म्हणून राहण्यापेक्षा काही तरी वेगळं करून दाखवायचं याच चक्र सदैव मनात चालू असायचं.

एकदा ते असच विचार करत घरी बसलेले. घरात आई पितळेची व तांब्याची भांडी घासत होती. चिंचेचा कोळ, कोकम असं बरंच काय काय करून तिची खटपट चालली होती. तरीही ते पूर्ण स्वच्छ होत नव्हते.

रवींद्र प्रभुदेसाई यांनी सहज म्हणून आपला ताजला सप्लाय करत असलेला डिटर्जंट या भांड्यांना वापरून पाहिला. तर आश्चर्य म्हणजे चिंच कोकम पेक्षाही हे डिटर्जंट जास्त परिणामकारक ठरले. त्यांच्या आईला देखील आश्चर्य वाटलं कारण या पूर्वी अनेक नामांकित कंपन्यांचे डिटर्जंट पावडर वापरूनही तांब्याच्या भांड्यावरील डाग जात नव्हते.

रवींद्र प्रभुदेसाई यांना चक्क सोनं गवसलं होतं.

त्यांनी यावर अनेक प्रयोग केले, अस करता करता शेवटी पितळ व तांब्याची भांडी स्वच्छ करू शकेल अशा डिटर्जंट पावडरचा फॉर्म्युला त्यांना सापडला. त्याच नाव त्यांनी ठेवलं,

पितांबरी. पितळ व तांबे याच ते कॉम्बिनेशन होतं.

प्रभुदेसाई यांनी पितांबरीच प्रोडक्शन सुरू केलं तर साल होत १९८६. या पावडर ची सुरवातीची किंमत २ रुपये ठेवली. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात हे पावडर लागणार. जर तेव्हाच्या लोकसंख्येच्या दहा टक्के जणांनी जरी ही पावडर खरेदी केली तरी कोट्यवधी पर्यंत टर्नओव्हर जाऊ शकतो हे आडाखा त्यांनी बांधला.

सुरवातीला त्यांचे मित्र देखील त्यांना पितांबरी वरून वेड्यात काढायचे.

जमाना स्टिलच्या भांड्याचा आला आणि तू तांब्या-पितळेकडे चालला अस सांगायचे.

पण प्रभुदेसाई यांना आपल्या प्रॉडक्टवर विश्वास होता.

त्यानी काही बेरोजगार तरुण हाताशी धरले त्यांच्या मार्फत पितांबरीची छोटी पाकिटं चाळ, मध्यमवर्गीय घरं इथं पोहवचली.

या मार्केटिंग टेक्निकचा त्यांना प्रचंड मोठा फायदा झाला.

एकदा वापरल्यावरही लोकांना पितांबरीची ताकद समजत होती. तिचं गोल्डन लाल पिवळ पाकीट किराणा माल खरेदी मध्ये हमखास दिसू लागलं.

प्रशांत दामले यांनी टीव्ही वर केलेली बायको गेली माहेरी काम करी पितांबरी ही जाहिरात तर तुफान लोकप्रिय झाली.

त्या जाहिरातीवर काही स्त्रीवाद्यांनी आक्षेप देखील घेतला पण प्रभुदेसाई यांनी स्पष्टीकरण दिल्यावर प्रकरण मिटल.

काहीही असलं तरी काम करी पितांबरी जाहिरातीने पितांबरीला घराघरात पोहचवला.

फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतभरात पहिल्यांदाच हे खास पितळ तांबे चमकवणारा डिटर्जंट मार्केट मध्ये आलं होतं. खास करून दक्षिण भारतात याची तुफान विक्री सुरू झाली. घरातच नाही तर हॉटेलमध्ये देखील त्याची मागणी जोरात होती.

शतकानुशतके शतके आयाबहिणीनां करावे लागणारे कष्ट रवींद्र प्रभुदेसाई यांच्या एका कल्पनेने चुटकीसरशी दूर झाले.

आजही पितांबरी हा डिटर्जंट भारतातला आघाडीचा ब्रँड आहे. आज अमेरिका इंग्लंडसह पंधरा देशात त्याची निर्यात होते. फक्त तांबे पितळ भांडी नाही तर जवळपास ४० प्रकारचे वेगवेगळे प्रोडक्ट ते विकतात.

एकेकाळी टेम्पो चालवणाऱ्या मुलाने पाहिलेलं हे स्वप्न आज खरोखर कोट्यवधीच्या साम्राज्यात रूपांतरित होऊन शंभर नंबरी सोन्याप्रमाणे लखलखत आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.