डालड्याचा शोध एका मराठी माणसाने लावला होता.

डालडा सगळ्यानाच माहित आहे. एकेकाळी हे पिवळे डब्बे प्रत्येकाच्या घरात दिसायचे. साजूक तुपाचा सबस्टीट्युट असलेला हा डालडा मोकळा झाल्यावर भरपूर कामासाठी उपयोगी पडायचा. तो आपल्या जेवणाशी आणि जीवनाशी एवढा जोडला गेला होता की डालडा हा एक ब्रँड आहे आणि पदार्थाच नाव वनस्पती तूप आहे हे आपण विसरूनच गेलो होतो.

हो वनस्पती तूप. एकेकाळी याच वनस्पती तूपाने अख्ख्या दुसऱ्या महायुद्धात सैनिकांना जगवल होतं. पण गंमत अशी की आपल्या पैकी प्रत्येकाला वाटत की हे वनस्पती तूप परदेशात शोधलं गेलंय. तर तस नाही. वनस्पती तुपाचा शोध एका मराठी माणसाने लावला आहे.

नारायणराव बाळाजी भागवत.

भागवत घराणे हे मुळचे पंढरपूरचे. घरात अगदी गर्भश्रीमंती होती. पण नारायणरावांचे वडील त्यांच्या वडिलांशी भांडून निराधार अवस्थेत मुंबईस आले. तिथेच हमाली वगैरे करून शिक्षण घेतल. मट्रीकच्या परीक्षेवेळी कष्टाने त्यांना मानाची  ‘जगन्नाथ शंकरशेठ’ शिष्यवृत्ती मिळाली. आपल्या मेहनतीने शिक्षण पूर्ण करून ते वकील झाले. नंतर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. नंतर बाळाजी भागवत इंदोरच्या होळकर संस्थानचे दिवान बनले.

 बाळाजी भागवतांची पत्नी ही त्या काळातली म्हणजे एकोणिसाव्या शतकातली मॅट्रिक होती आणि इंग्रजी पुस्तके वाचणे हा तिचा छंद होता.

अशा सुशिक्षित माता-पित्यांच्या पोटी नारायणरावांचा जन्म १८८६ मध्ये झाला. नारायणराव व त्यांची भावंडे अभ्यासात हुशार होते. नारायणरावांनादेखील  आपल्या वडिलांच्या प्रमाणे ‘जगन्नाथ शंकरशेठ’ स्कॉलरशिप मिळवायची होती. त्यासाठी ते संस्कृत भाषेचा अभ्यास फार जोमाने करत होते. पण त्यांच्याच एका आप्ताने त्यांना सांगितले,

‘नारायणा, तुझी आíथक स्थिती उत्तम आहे, तुझे शिक्षण तुझे आई-वडील सहज करू शकतात. त्यामुळे उगीचच जगन्नाथ शंकरशेठ मिळवून तू दुस-या एका हुशार पण गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण पैशाअभावी अडवू नकोस आणि जो काही अभ्यास करशील तो आनंदासाठी कर, काही मिळवायचे असे ध्येय ठरवून करू नकोस’

हा सल्ला नारायणरावांना जन्मभर मार्गदर्शक आणि दिशादर्शक ठरला. नारायणराव भागवतांनी मुंबईच्या झेवियर्स कॉलेजमधून  रसायनशास्त्रात डिग्री घेतली. याच काळात सर जमशेदजी टाटांच्या संकल्पनेतून कर्नाटकातील बेंगलोरमध्ये इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’ची स्थापना झाली होती.

भारतातील हे पहिले मुलभूत संशोधन केंद्र होते. नारायणरावांनी तिथल्या पहिल्याच बॅचमध्ये प्रवेश घेतला. रसायनशास्त्रात त्यांनी ऑईल्स आणि फॅट्स यावर संशोधन केले.

ते टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सची संशोधन पदवी पूर्ण करणारे पहिले विद्यार्थी ठरले. त्यांच्यापाठोपाठ त्यांच्या भावाने देखील याच संस्थेत प्रवेश घेतला.

पासआउट झाल्यावर नारायणराव येमेन देशातील एडनला गेले. तिथे त्यांच्या वडिलांच्या मित्राचा इब्राहीमभाई लालजी यांचा साबणाचा कारखाना होता. तिथे त्यांना मदत करण्यास सुरवात केली. त्यांच्याच घरात त्यांच्या मुलासारखे राहिले.

पुढे १९१९ मध्ये पत्नीचे निधन झाल्यावर ते भारतात परत आले. भारतात आल्यावर टाटा ऑईल मिल्स येथे कंपनीचे डायरेक्टर कपिलराम वकील यांचे मुख्य मदतनीस म्हणून ते नोकरी करू लागले.

पहिल्या महायुद्धाचा हा काळ होता. सैनिकांना  लोण्याची आवश्यकता असायची. पण ते सर्वाना पुरवण शक्य नव्हतं. थिजवलेल्या तेलापासून लोण्याचा स्वस्त पर्याय म्हणून मार्गारीन सैन्यात वापरायला लागले. ते लोकप्रिय झाले व ते स्वस्त असल्यामुळे मागणी वाढत गेली.

पण भारतीय सैनिकाकडून मात्र या मार्गारीन पेक्षा तुपाची मागणी जास्त व्हायची.

याच काळात जगभरातील संशोधक साजूक तुपाला पर्याय शोधण्याच्या मागे लागले होते.  विशेषतः अमेरिका व जपान मध्ये गोडेतेलापासून तूप तयार करण्याचे प्रयत्न सुरू होते, पण त्यांना यश मिळत नव्हते. पण टाटा कंपनीमध्ये नारायणराव भागवत आणि कपिलराम या दोघांनी त्यात यश मिळवले.

पहिले नैसर्गिक तूप भारतात तयार झाले.

ही गोष्ट टाटा कंपनीचे वित्तीय सल्लागार असलेल्या पीटरसन या गोऱ्या अधिका-याला कळली. त्याने या कृतीची मागणी त्यांच्याकडे केली. पण भागवत आणि कपिलराम उत्तरले,

‘‘या क्षेत्रात आम्ही शोधकर्ते ठरलो आहोत तर मग त्याचा फायदा आमच्या देशालाच झाला पाहिजे. आमच्या देशालाच त्याचे श्रेय मिळायला हवे’’.

इंग्रजांच्या सत्तेचा काळ होता. आपण ज्यांच्यावर राज्य करतो ते भारतीय लोक आपली आज्ञा मानत नाहीत याचा राग त्या पीटरसनच्या मनात आला. त्याने थेट टाटांच्या या कंपनीची आर्थिक नाकेबंदी केली. टाटांना ही कंपनी बंद करावी लागली.

कपिलराम आणि नारायणराव दोघेही बेकार झाले. जवळपास सातवर्ष नारायणराव बेकार होते. अमेरिकेतील एक अतिशय चांगल्या पगाराची नोकरी त्यांना चालून आली होती पण ‘वनस्पती तुपाच्या’ शोधाचे श्रेय त्यांना आपल्या देशालाच द्यायचे  या हट्टापायी त्यांनी नाकारली.

याकाळात त्यांच्या एका बहिणीने आपल्या शिक्षिकेच्या नोकरीतून त्यांच अख्खं कुटुंब संभाळल.

अखेर सात वर्षानी कपिलराम यांनी गुजरातमध्ये सॉल्ट कंपनी सुरु केली व नारायणरावांना तिथे नोकरी मिळाली. या दोघांच्या जोडीने तिथेही रसायनशास्त्रात अनेक महत्त्वाचे शोध लावले. पुढे ही कपिलराम यांची कंपनी टाटांनी विकत घेतली आणि तिचे नाव ठेवलं

 ‘टाटा केमिकल्स’. टाटा केमिकल्सची मुख्य जबाबदारी कपिलराम आणि नारायणराव यांच्याकडेच होती.

सर्व घडी नीट बसलेली असतानाच अचानक नारायणरावांना  गुजरात सोडून परत यावं लागलं. त्याच्या वडिलांना पॅरालीसीसचा झटका आला होता. मुंबईत येऊन त्यांनी आपले मित्र अनंतराव पटवर्धन यांच्याबरोबरसाबण आणि बाकीच्या कंपन्यांना लागणारी केमिकल्स बनवणारी ‘अनार अँड कंपनी’ सुरू केली.

याच काळात लिव्हर ब्रदर्सनी भारतात हिंदुस्तान वनस्पती मॅन्युफ्कचरिंग नावाची कंपनी स्थापन केली होती.

त्यांनी डाडा या डच कंपनीबरोबर करार केला आणि भारतात सेवर येथे वनस्पती तूप बनवणारी फॅक्ट्री सुरु केली. हे वर्ष होतं १९३७. पुढे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांना संपूर्ण जगभरात वनस्पती तूप पाठवण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आणि तिथून वनस्पती तूप म्हणजे डालडा हा अगदी समानार्थी शब्द पडून गेला,

वनस्पती तुपाचा शोध नारायणराव भागवत यांनी लावला होता हे जगाबरोबरच आपण ही विसरून गेलो.

नारायण राव भागवतांच्या मुलीनीही त्यांच्या घरची उच्च शिक्षणाची परंपरा पुढे नेली. त्यांच्या दोन्ही मुली म्हणजे सुप्रसिद्ध लेखिका आणि समाजसेविका दुर्गा भागवत आणि भारतातल्या पहिल्या डॉक्टरेट मिळवणाऱ्या कमलाबाई भागवत सोहनी. त्यांच्या रूपाने भागवत कुटुंबाच नाव अजरामर राहिले आहे.

संदर्भ : विज्ञान विशारद लेखिका – वसुमती धुरू – ग्रंथाली प्रकाशन

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.