तुमचा हनुमान तर आमचा मारुती
हनुमानाची ओळख देशात वेगळी वेगळी आहे. कुणासाठी तो हनुमान तर कुणासाठी बजरंगबली आहे. पण महाराष्ट्रातल्या गावोगावी तो मारुती आहे.
थोडं बारकाईने बघितलं तर हनुमान आणि बजरंगबली या दोन्ही नावांना मोठ मोठ्या उत्सवाला, व्यापारी उद्देशाला वापरण्यात येतं. या दोन्ही नावाचा राजकीय वापर पण खूप होतो. पण मारुतीराया हे नाव सगळ्यात जास्त आपुलकी आणि सच्च्या भक्तीचं राहिलंय.
गावात भले मारुतीचं मन्दिर बाहेर असेल पण सगळ्यात मानाचं आहे.
गाव जले हनुमान बाहर ही म्हण शुद्ध व्यापारी दृष्टी असणाऱ्या मानसिकतेची आहे. कारण गावातल्या सगळ्या मोठ्या अडचणीत हनुमानाचा भक्त धावून येतोच. हनुमान काही स्वतःहून बाहेर नसतो. त्याला माणसानेच बाहेर ठेवलेलं आहे. आणि गावातल्या सच्च्या भक्ताच्या दृष्टीने हनुमान म्हणजे मारुतीराया असतो.
बालपण मारुती मंदिराभोवती खेळत घालवायचं. सगळ्यात शांत आणी निवांत जागा. तरुणपणी गप्पा मारायला, व्यायाम करायला, उपवास धरायला, नारळ फोडायला मारुतीच. मग लग्नाच्या वेळी माफी मागून मोकळं व्हायचं. पण मारुतीराया कधी कुणावर नाराज नाही झाला.
पुन्हा सगळ्यांचं म्हातारपणीचं आयुष्य मारुतीच्या पारावर आहेच. गावातला मारुतीचा पार, मारुतीचं मन्दिर प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक. मारुती हे नाव गावोगाव लोकप्रिय. मारुती नावाची माणसं नाहीत असं गाव भेटणं अवघड अशी परिस्थिती होती.
हनुमान आणि मारुती या दोन नावात एक महत्वाचा फरक आहे. हनुमान भक्तीचं प्रतिक आहे. मारुतीराया देव आहे.
हनुमान नेहमी छाती फाडून राम दाखवताना किंवा रामाच्या पायाशी नमस्कार करताना किंवा पर्वत उचलून आणताना दिसतो आपल्याला. पण मराठी माणसाला मारुती म्हणाल्यावर असं काही आठवत नाही. देवूळ आठवतं. शेंदूर लावलेली मूर्ती डोळ्यासमोर येते.
अगदी आपल्या मराठीतला मुख्य फरक सांगायचा तर हनुमान चालीसा असते आणि मारुती स्तोत्र असतं. रामायण, जय हनुमान सारख्या मालिका, बजरंगाची कमाल सारखे चित्रपट येऊन देखील मारुती हा शब्द कायम राहिला. कारण ती आपली संस्कृती आहे.
मारुतीत एक आपलेपण आहे. म्हणून तर मारुतीच्या पारावर नवरदेव हट्ट करून बसायला पण कमी करायचे नाही. लग्नात एचएमटी घड्याळ किंवा रेडीओसाठी रुसणारे लाखो नवरदेव मारुतीरायाने पाहिलेत. लग्नाच्या कपड्यावर चाललेले वाद गावोगावच्या मारुतीरायाने ऐकलेत.
गावचा मारुती खरंतर घरचाच माणूस असल्यासारखा असतो. त्याच्यापुढे काही लपवलं जात नाही. आपण लग्न करतोय हे मला वाटतं मारुतीरायालाच सांगितलं जातं फक्त. बाकी देवांना आशीर्वाद घेण्यासाठीच भेटतात. माहिती देण्यासाठी नाही.
देव देवच असतात. पण भक्त म्हणून गाजलेलं नाव हनुमानाचं. तरीही देव म्हणून मान्यता असलेले फार कमी देव आहेत. त्यात एवढी कठोर शिस्त असलेले देव फार कमी.
हनुमानाचं भव्य दिव्य रूप बघून वानर असल्याची गोष्ट आपण विसरून जातो. हनुमानाच्या भव्य दिव्य मूर्ती बघत राहतो आपण. पण मारुतीची मूर्ती अशी नसते. अगदी मोठ्या दगडाला थोडा आकार देऊन शेंदूर फासलेला असो.
मारुतीच्या मूर्तीबद्दल गावाला प्रचंड जिव्हाळा आणि आदर असतो. कुस्तीची तालीम असो किंवा निवडणूक. मारुतीराया महत्वाचा असतो. पण मारुतीरायाच्या नावाने काही फार मोठे खर्च नसतात गावात. गावोगाव रामकथा असेल, पोरं अंगावर बारदाना घालून चौदा दिवस वनवासाला गेली असतील आणि लक्ष्मणाला शक्ती लागलेली असेल तेंव्हा मारुतीरायाची भक्ती बघण्यासारखी असायची.
हळूहळू सगळ्या गोष्टी बदलत जाताहेत. पण आजही गावात मारुतीराया आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहे. गावाच्या बाहेर असणाऱ्या देवांमध्ये महत्वाचं स्थान असलेला मारुतीराया.
आजवर कधी त्याच्याबद्दल कुणी वाकडा शब्द काढला नव्हता. कारण अगदी सोपं होतं. वानर होते. सगळे रामाच्या मदतीला धावून आले हेच आपल्याला शिकवलं गेलं. हेच आपण समजत आलो. हेच रामायण सांगत आलं.
भक्त कसा असावा तर मारुतीरायासारखा. जीवाला जीव देणारा. छाती फाडून बघितलं तरी राम दिसणार. पण आता भक्तीची व्याख्याच बदलली. रावणासारख्या शत्रूच्या लंकेला शेपटाने आग लावणारा हनुमानासारखा भक्त आणी शेपटीच्या विरुध्ध दिशेला असलेल्या बेताल तोंडाने आपल्याच राज्याला आग लावण्याच्या तयारीत असलेले आधुनिक भक्त.
हनुमान कोणत्या धर्माचा आहे हे सिध्द करण्याची स्पर्धा लागलीय. हनुमान हिंदू नव्हता हे सांगून काय भलं होणार आहे?
एका ठराविक पक्षाकडून हा प्रयत्न होतोय हे आणखी संशय वाढवणारं आहे. महाराष्ट्रात रामदास स्वामींनी जागोजागी हनुमानाची मंदिरं बनवली. बलोपासनेचा मंत्र दिला. त्याचे भक्तगण आजही लाखोच्या घरात आहेत. दुर्दैव हे आहे की हनुमानाचा एवढा राजकीय मुद्दा बनूनही रामदासस्वामींचे भक्त आज काहीच घडत नसल्यासारखे शांत आहेत.
किमान संभाजी भिडे यांच्यासारख्या धाडसी रामदासस्वामींच्या भक्ताकडून तरी अपेक्षा होती. पण भिडे गुरुजी पण हनुमानाला मुसलमान ठरवूनही काहीच बोलत नाहीत हे निराशाजनक आहे. याचा अर्थ काय लावायचा हे कुणालाच कळत नाही असं चित्र निर्माण झालंय.
आपल्याला खरंच हनुमानाची आता गरज नाही का? आणि जर असं कुणा एखाद्या पक्षाच्या नेत्यांना वाटत असेल तर तसं होणं अवघड आहे. कारण तुमचा हनुमान आहे तर आमचा मारुतीराया आहे. गावं मारुतीला असं सहजासहजी मुस्लीम किंवा चायनीज ठरवणार नाहीत.
गावं मारुतीला आपल्या ग्रामव्यवस्थेचा भाग मानत होते. मानत राहतील. कारण गावांनी कधी गाव जले हनुमान बाहर अशी वृत्ती ठेवली नाही.
त्यामुळे प्रत्यक्ष हनुमानाचं अस्तित्व धोक्यात येत असेल तर गाव बाहेर राहणार नाही. कारण गावासाठी तो हनुमान नाही मारुती आहे. तुम्हाला आता रामापुढे हनुमानाची गरज वाटत नसेल. पण गावाला असं वागणं जमणार नाही.
छाती फाडून दाखवणाऱ्या भक्तापेक्षा खिसा रिकामा करून निष्ठा दाखवणारे महत्वाचे झालेत का? नसतील तर अशा टिनपाट लोकांना राजीनामे का द्यायला लावत नाही?
हनुमान हा काय मिम आणि whats app च्या जोकचा विषय आहे का? मग तो तसा कुठल्या वाचाळ नेत्यांमुळे बनला? हे कारस्थान आहे का बोलघेवडेपणा? हे कोण थांबवणार आहे? हिंदूंचा कुणी वाली आहे का? नसिरुद्दीन शहाची मुलं सुरक्षित नाहीत पण आमचा हनुमान पण सुरक्षित नाही ना राव. दाद मागायची कुणाकडे?
तुमचा हनुमान असेल पण आमचा मारुतीराया आहे. आम्हाला त्रास होतो. आमच्यासाठी तो धर्माचा नाही अख्ख्या गावाचा असतो.
हे ही वाचा भिडू.
- खांडवीचा दुतोंड्या मारूती !
- खुन्या मुरलीधराला वाचवण्यासाठी, अरब सैनिकांनी ब्रिटीश जवानांचे खून केले होते.
- नेमकं कशासाठी, शरद जोशींनी देशातील एकमेव सीतेच्या मंदिराच्या जिर्णोद्वाराची जबाबदारी घेतली होती.
- अयोध्येत राम मंदिराच्या अगोदर, कोरियाच्या राणीचं स्मारक बांधल जातय !