पूना मर्चंट्स चेंबरमुळं आजही पुण्यातल्या कष्टकऱ्यांची दिवाळी गोड होते…

दिवाळी म्हणलं की, नवे कपडे, फटाके, दिव्यांची आरास आणि फराळ या गोष्टी हमखास आठवतात. कष्टकरीच काय पण मध्यमवर्गीय लोकांनाही या सगळ्या गोष्टी एकत्रित परवडतातच असं नाही. कुणी मग मुलांना कपडे घेऊन, स्वतः जुन्याच कपड्यात राहतं. कुणी मोठ्या कसोशीनं मुलांना कमी फटाक्यात खुश ठेवतं, घरात आठच्या जागी चारच दिवे लागतात. पण थोडा का होईना फराळ हा प्रत्येक घरात बनतोच.

वाढती महागाई, लॉकडाऊनचं संकट, बेरोजगारी यामुळं यंदाची दिवाळी फराळाविना जाणार की काय असं अनेकांना वाटत होतं. पण तसं झालं नाही- या मागचं कारण म्हणजे पूना मर्चंट्स चेंबरचा १९८८ पासून सुरु असलेला, लाडू-चिवडा विक्री उपक्रम.

आधी जाणून घेऊयात पूना मर्चंट्स चेंबरचा इतिहास

१९४९ मध्ये स्थापन झालेली ही संस्था, महाराष्ट्रातल्या धान्य, गूळ, खाद्यतेलं, डाळी, सुकामेवा इत्यादींच्या घाऊक व्यापाऱ्यांचं प्रतिनिधित्व करते. या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट व्यापाऱ्यांना भेडसावणारे प्रश्न सोडवणं आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढणं हे आहे. सोबतच व्यापाऱ्यांमध्ये एकजूट राहावी म्हणूनही ही संस्था प्रयत्नशील आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सामाजिक कार्यात पूना मर्चंट्स चेंबर कायम अग्रेसर राहिलं आहे. लातूर आणि गुजरातमध्ये आलेल्या भूकंपावेळीही या संस्थेनं मदतीचा हात पुढं केला होता.

दुष्काळ, टंचाई आणि श्रीनिवास पाटील यांचा आग्रह

बरोबर ३३ वर्षांपूर्वी म्हणजेच १९८८ मध्ये पुण्यात अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली होती. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीनिवास पाटील यांनी पूना मर्चंट्स चेंबरला स्वस्त दरात उत्तम दर्जाचा फराळ तयार करण्याचा आग्रह केला. पाटील यांच्या आग्रहाला मान देत पूना मर्चंट्स चेंबरनं ‘ना नफा-ना तोटा तत्वावर फराळ विक्री केंद्र’ सुरू केलं. त्यावर्षी १० हजार लाडू बनवले गेले.

तेव्हापासून आतापर्यंत ही परंपरा अविरत सुरू आहे. इतर ठिकाणच्या दरांपेक्षा या लाडू चिवडा विक्री केंद्रातल्या फराळाचा दर जवळपास निम्मा आहे. बिझनेस मॉडेल म्हणून याचं आश्चर्य वाटू शकतं, पण अनेकांच्या चेहऱ्यावर आनंदाचं हसू पसरवण्याचं काम या उपक्रमाच्या माध्यमातून केलं जात आहे.

‘यंदा गॅस, तेल व इतर खाद्यसामुग्रीचे भाव वाढल्यानं लाडू-चिवड्याचा किंमतीतही वाढ करावी लागली आहे. गेल्या वर्षी हा दर १३० रुपये प्रतिकिलो होता, तर यंदा १४४ रुपये प्रतिकिलो दरानं लाडू आणि चिवड्याची विक्री होईल. पुण्यातल्या यश लॉन्समध्ये लाडू आणि चिवडा बनवण्याचं काम सुरू राहणार आहे,’ अशी माहिती पूना मर्चंट्स चेंबरचे विद्यमान अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिली.

साडेपाचशे कामगारांना मिळतो रोजगार

या उपक्रमामुळं केवळ कष्टकऱ्यांना स्वस्त फराळच मिळतो असं नाही, तर यातून अनेकांना रोजगारही उपल्बध होतो. जवळपास ५५० कामगार हे लाडू-चिवडा बनवण्याचं काम करतात. तीन शिफ्टमध्ये चालणाऱ्या या कामासाठी ३५० पुरुष कामगार, तर २०० महिला कामगार अहोरात्र झटतात.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये समावेश

या समाजपयोगी उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. पूना मर्चंट्स चेंबरनं २०१२ मध्ये २०० किलो लाडू वाटण्याचा विक्रम मोडत, ४०१.८ किलो लाडूंची विक्री केली आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नाव नोंदवलं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.