राज्याच्या राजकारणात प्रफुल्ल पटेल कुठेच नसतात, तरीही इतका वट कसाय ?
शरद पवारांच्या राजीनाम्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या समितीने फेटाळला असल्याची घोषणा प्रफुल्ल पटेलांनी केली. शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पदी दोन नेत्यांची घोषणा केली, पहिलं नाव सुप्रिया सुळे आणि दुसरं प्रफुल्ल पटेल.
मागे शरद पवारांच्या राजीनाम्याचा निर्णय समितीने फेटाळला ही महत्वपूर्ण घोषणा कोणी केली तर प्रफुल्ल पटेलांनी. ही जबाबदारी ना सुप्रिया सुळेंकडे आली ना जयंत पाटलांकडे ना अजित पवारांकडे…याचं कारण सांगण्यात आलं की प्रफुल्ल पटेल हे पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत… आजही सुप्रिया सुळेंसोबत राज्यातले नेते म्हणून ना अजित पवारांचं नाव आलं ना जयंत पाटलांचं, नाव आलं प्रफुल्ल पटेल यांचंच.
प्रफुल्ल पटेल ना कधी राज्याच्या राजकारणात दिसतात ना कधी व्यासपीठावरून भाषणं देताना दिसतात. महाविकास आघाडी सरकार, सत्तांतराच नाट्य अशा कोणत्याच राजकीय घडामोडींमध्ये प्रफुल्ल पटेल नसतात….
पण जेव्हा जेव्हा पक्षांतर्गत महत्वाची घडामोड होते, शरद पवार यांच्या व्यक्तिगत नावासोबत काहीही हालचाली सुरू असतात तेव्हा तेव्हा प्रफुल्ल पटेल हेच एकमेव नाव समोर येतं.
राज्याच्या राजकारणात प्रफुल्ल पटेल कुठेच नसतात, तरीही त्यांचं पक्षात एवढं महत्व कसं काय?
राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीतल्या अनेक नेत्यांची भूमिका गृहित धरली जाते. अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, तटकरे अशा एकास एक नेते राष्ट्रवादीची ठाम भूमिका मांडत असतात. पण विषय जेव्हा देशाचा येतो, राष्ट्रीय पातळीवरचा येतो तेव्हा हे सर्व नेते पिक्चरमधून गायब होतात आणि प्रफुल्ल पटेल यांची एन्ट्री होते.
यासाठी आपल्याला इतिहासत जावं लागेल..
प्रफुल्ल पटेल आणि शरद पवारांची ओळख कधीपासून असेल. तर प्रफुल्ल पटेल यांची शरद पवारांशी ओळख अगदी वयाच्या आठव्या ते दहाव्या वर्षापासून आहे. प्रफुल्ल पटेल यांचे वडील मनोहरभाई पटेल हे कॉंग्रेसचे नेते. गोंदीया-भंडारा हा त्यांचा जूना मतदारसंघ. कॉंग्रेसचा नेता म्हणून त्यांची ओळख.
तो काळ होता 1970 चा.
या काळात कॉंग्रेसच्या राजकारणात महाराष्ट्रात नाव गाजत होतं ते यशवंतराव चव्हाण यांच. दूसरीकडे विदर्भातून येणाऱ्या मनोहरभाई पटेल यांची देखील हवा होती. तिसरीकडे एक तरुण राजकारणाच्या मैदानात तयार होत होता. त्याच नाव शरद पवार. तर चौथीकडे या सर्व राड्यात अगदी 10-12 वर्षाचा पोरगा आपल्या बापाचं बोट पकडून राजकारण पहात होता. तो पोरगा म्हणजे प्रफुल्ल पटेल.
यशवंतराव चव्हाण व मनोहर पटेल यांच्या बैठकांमध्ये नव्याने राजकारण करणारा मुलगा म्हणून शरद पवार आणि मनोहरभाईंचा मिसरुड न फुटलेला पोरगा म्हणून प्रफुल्ल पटेल यांची देखील तोंडओळख राहिली. याच त्या पवार आणि पटेलांच्या पहिल्या भेटी.
त्यानंतर प्रफुल्ल पटेलांच्या वयाच्या 13 व्या वर्षी मनोहरभाईंच निधन झालं. पुढे 1980 चा काळ उगवला. या कालावधीत यशवंतराव चव्हाण यांच राजकारण विस्मृतीत जावू लागलं. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार नावाचा पैलवान तयार झाला होता. अशाच काळात गोंदिया नगरपालिकेचा तरुण नगराध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांचं राजकारण सुरु झालं होतं.
काँग्रेसमध्ये परतलेले शरद पवार मुख्यमंत्री देखील झाले. त्यांनी राज्यावर आपली पकड मजबूत केली होती, देशाच्या राजकारणाचे त्यांना वेध लागले होते.
या काळात शरद पवारांच्या आजूबाजूला दोन युवा नेत्यांचा वावर असायचा. त्यापैकी एक प्रफुल्ल पटेल आणि दुसरे सुरेश कलमाडी. मात्र, पुढे कलमाडी आणि पवार यांच्यात अंतर वाढलं. तर दुसरीकडे प्रफुल्ल पटेल हे त्यांच्या अधिक जवळ येत गेले.
१९९१ साली दहाव्या लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं होतं.
अवघ्या ३३ वर्षांच्या प्रफुल्ल पटेलांना पवारांनी गोंदिया लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवून दिली. प्रफुल्ल पटेलांनी त्यांच्यावरील विश्वास सार्थ करून दाखवत तिथे मोठा विजय मिळवला.
या निवडणुकीवेळी काँग्रेसचे अध्यक्ष राजीव गांधी यांच्यावर अतिरेकी हल्ला झाला व त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूमुळे उठलेल्या सहानुभूतीच्या लाटेत काँग्रेसने अनपेक्षितपणे चांगली कामगिरी केली. राजीव गांधींचे वारसदार म्हणून पंतप्रधानपदी पवारांचं नाव चर्चेत आलं. यावेळी नरसिंहराव व त्यांच्यात पंतप्रधानपदासाठी मोठी लढाई झाली.
या लढाई मध्ये पवारांच्या उमेदवारीसाठी दिल्लीत रसद पुरवणाऱ्यांमध्ये प्रफुल्ल पटेल आघाडीवर होते. पण काही कारणामुळे शरद पवार यांनी आपली पंतप्रधानपदाची उमेदवारी मागे घेतली.
प्रफुल्ल पटेल याबद्दल म्हणतात,
” काँग्रेसच्या दरबारी संस्कृतीमुळेच शरद पवार पंतप्रधान होऊ शकले नाहीत”.
पुढे शरद पवार यांनी नरसिंह राव यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आणि त्यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणून सहभागी झाले. दिल्लीतल्या त्यांच्या वास्तव्यात खासदार प्रफुल्ल पटेल सावलीप्रमाणे त्यांच्या पाठीशी होते.
१९९४ ते १९९५ च्या काळात पटेल विज्ञान आणि तंत्रज्ञान कमेटीचे सदस्य होते. ९६ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला. या काळात अर्थ विभागाच्या कमिटीचे आणि उड्डाण मंत्रालयाचे सदस्य होते. शरद पवारांच्या सहवासात राहून प्रफुल्ल पटेलांनी राजकारणातले डाव पेच शिकून घेतले होते.
गोंदिया ते दिल्ली हा प्रवास पटेलांनी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली केला होता. त्यामुळेच पवारांच्या विश्वासू सहकाऱ्यांमध्ये पटेलांच नाव तेव्हापासूनच समाविष्ट झालं.
१९९८ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत पटेल तिसऱ्यांदा लोकसभेत निवडून गेले. या निवडणुकीनंतर काँग्रेसला विरोधी पक्षात बसावं लागलं. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. तर विरोधीपक्ष नेते पद मिळालं खासदार शरद पवार यांना. पण जवळपास १३ महिन्यातच वाजपेयींचं सरकार कोसळलं.
या काळात सोनिया गांधी राजकारणात सक्रिय झाल्या होत्या. त्यांनी सीताराम केसरींना हटवून काँग्रेसची सूत्रे आपल्या हातात घेतली होती पण जेव्हा काँग्रेसच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवाराचा प्रश्न पुढे आला तेव्हा शरद पवारांनी सोनियांच्या विदेशी जन्माचा करत बंड पुकारले. त्यांना काँग्रेसमधून बाहेर काढून टाकण्यात आलं.
त्यानंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नावाने स्वतः राजकीय पक्ष स्थापन केला. त्या पक्षासाठी गरज होती एका पॉलिटिकल मॅनेजरची आणि तीच उणीव भरून काढली प्रफुल्ल पटेलांनी…
शरद पवारांसोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सामील झाल्यामुळे प्रफुल्ल पटेलांना आपली खासदारकी गमवावी लागली होती. त्यामुळे त्यांनी १९९९ साली राज्यसभा निवडणूक लढवली पण तिथे त्यांचा पराभव झाला. २००० साली पुन्हा त्यांनी राज्यसभा निवडणूक लढवली. यावेळी मात्र पटेल राज्यसभेत पोहोचले.
साल होतं २००४. लोकसभा निवडणुक तोंडावर आली होती. ज्या काँग्रेसने बाहेरचा रस्ता दाखवला त्याचं काँग्रेसने पवारांना आपल्या आघाडीत सोबत घेतलं होतं.
भंडारा गोंदिया इथे तेव्हा भाजपचा खासदार होता. इथली उमेदवारी आपल्या लाडक्या पटेलांना देण्यासाठी पवारांनी एक शक्कल लढवली. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं जागेवाटप झालेल नव्हतं. त्यागोदरच पवारांनी पटेलांची उमेदवारी जाहीर केली.
त्यामुळे काँग्रेसला नाईलाजाने भंडारा जागा राष्ट्रवादीला द्यावी लागली.
तरीही पटेल पुन्हा लोकसभेत जाऊ शकले नाहीत. त्यांना भाजप उमेदवार शिशुपाल पाटले यांनी धूळ चारली. पण या सलग दुसऱ्या पराभवाचा पटेलांच्या राजकीय कारकिर्दीवर कसलाही परिणाम झाला नाही. काँग्रेसची सत्ता आल्यावर पटेलांना राज्यसभेवर पाठवून त्यांना नागरी उड्डाण मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आला.
२००९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत पटेलांनी विजय मिळवत लोकसभेत पदार्पण केलं. मनमोहन सिंग यांच्या सरकरमध्ये त्याने अवजड उद्योग मंत्री व सार्वजनिक उद्योग मंत्रीपदाच्या कॅबिनेट पदी बढती देण्यात आली.
याकाळात दिल्लीच्या राजकारणात पटेलांनी आपलं स्थान मजबूत केलं. विशेषतः राष्ट्रवादीचा दिल्लीचा चेहरा म्हणून ते ओळखले गेले.
२०१४ साली त्यांचा मोदी लाटेत भाजपकडून लढणाऱ्या नाना पटोलेंनी मोठा पराभव केला. तरीही प्रफुल्ल पटेल यांचं राष्ट्रवादी मधील स्थान खच्ची झालेलं नाही. पक्षामध्ये राज्यपातळीवर किती जरी गटतट पडले तरी शरद पवार गटाचा नेता म्हणूनच प्रफुल्ल पटेल यांची ओळख राहील.
हे ही वाच भिडू
- संभाजीराजेंनी जे गणित मांडलय त्याच गणितावर 2014 साली संजय काकडे खासदार झाले होते
- “पंकजा मुंडेंनी आमदार व्हावं” ही कार्यकर्त्यांची इच्छा असली तरी त्यामागे भाजपचा फायदा आहे
- १९९८ च्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला पाडून अपक्ष कलमाडी खासदार झाले