राष्ट्रपती की राष्ट्रपत्नी ? या वादावर बाळासाहेबांनी २००७ मध्येच पर्याय सुचवला होता…

काँग्रेसचे लोकसभेतले गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी देशाच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख ‘राष्ट्रपत्नी’ असा केला. त्यांच्या या उल्लेखानंतर देशातलं वातावरण ढवळून निघालं. भाजप नेते विशेषतः केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अधीर रंजन चौधरी आणि काँग्रेसवर हल्ला चढवला. चौधरी यांच्यासोबतच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सुद्धा माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली.

‘चौधरींची ही टीका महिलांचा अवमान करणारी आहे, आदिवासींबद्दल काँग्रेसला काही आदर नाही,’ अशी टीकास्त्र भाजपकडून सोडण्यात आली. दुसऱ्या बाजूला अधीर रंजन चौधरी यांनी, ‘आपण चुकून असं बोलून गेलो आणि या संदर्भात राष्ट्रपतींची माफी मागणार आहोत’, असं सांगितलं.

मात्र त्यानंतरही वातावरण निवळलं नाही. लोकसभा आणि राज्यसभेत यावरुन खडाजंगी सुरूच आहे.

खरंतर महिला राष्ट्रपतींना नेमकं काय म्हणावं ? हा वाद आपल्या देशाला नवीन नाही. २००७ मध्ये जेव्हा प्रतिभा पाटील देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या, तेव्हाही हा वाद उफाळला होता. तेव्हा अनेक नेत्यांनी, तज्ञांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी वेगवेगळे पर्याय सुचवले होते, त्यातलाच एक पर्याय होता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुचवलेला.

राष्ट्रपती या शब्दाऐवजी कुठले पर्याय समोर आले होते ? आणि बाळासाहेबांनी काय पर्याय सुचवलं होता हे पाहुयात.

त्याआधी हे पाहणं महत्त्वाचं आहे की भारताला राष्ट्रपती शब्द मिळाला कसा ?

जुलै १९४७ मध्ये झालेल्या संविधान सभा चर्चेत प्रेसिडेंट ऐवजी ‘नेता’ असा शब्द वापरण्यात यावा अशी चर्चा झाली होती. तेव्हा एका दिग्गज मराठी माणसामुळे भारताला राष्ट्रपती हा शब्द मिळाला. याबद्दल तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन वाचू शकता.

शेवटी मराठी माणसानेच ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ या शब्दाला राष्ट्रपती हा प्रतिशब्द दिला

त्यानंतर १९४८ मध्ये प्रेसिडेंटला नेमकं काय म्हणायचं हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या भाषांमधल्या संविधानाच्या मसुद्यांमध्ये काय शब्द वापरले आहेत याचा संदर्भ दिला. हिंदीमध्ये प्रधान, हिंदुस्थानीमध्ये हिंद का एक प्रेसिडेंट तर उर्दूमध्ये सरदार असे वेगवेगळे उल्लेख करण्यात आल्याचं डॉ. बाबासाहेबांनी सांगितलं.

‘द चीफ एक्झिक्युटिव्ह अँड हेड ऑफ द स्टेट’ हा पर्यायी शब्दही आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचा आणि लोकशाहीचा संदर्भ देत खोडून काढला आणि अखेर नेहरूंनी राष्ट्र्पती या शब्दावर शिक्कामोर्तब केलं.

त्यानंतर राष्ट्रपतींच्या संबोधनाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला तो २००७ मध्ये

काँग्रेसच्या नेतृत्वातल्या संयुक्त पुरोगामी आघाडीनं प्रतिभा पाटील यांचं नाव राष्ट्रपती पदासाठी जाहीर केलं. काँग्रेसची सत्ता आणि संख्याबळ पाहता त्यांचा विजय जवळपास निश्चित होता. त्यामुळं त्यांच्या नावाच्या घोषणेपासूनच एखादी महिला राष्ट्रपती पदावर विराजमान झाल्यावर संबोधन कसं करावं, हा मुद्दा चर्चेत आला.

त्यावेळी या चर्चेचे दोन मुख्य प्रवाह होते,

पहिला प्रवाह होता, प्रतिभा पाटील यांना राष्ट्रपती म्हणून नये. त्याऐवजी ‘राष्ट्रपत्नी’ या पर्यायाचा उल्लेख तेव्हाही झाला होता, मात्र तो चर्चेत आला नाही. दुसरा पर्याय उभा राहिला तो म्हणजे ‘राष्ट्रमाता.’ मात्र हा पर्यायही फारसा चर्चेत आला नाही. सामाजिक कार्यकर्त्यांकडून राष्ट्रमाता हा लैंगिक भेदभाव दर्शवणारा आणि पितृसत्ताक समाजव्यवस्थेचं प्रतिनिधित्व करणारा आहे, अशी टीका करण्यात आली.

दुसरा प्रवाह होता, प्रतिभा पाटील यांना राष्ट्रपतीच म्हणण्यात यावं असा. अनेक तज्ञांचं असं म्हणणं होतं की, ‘राष्ट्रपती ही संविधानिक संज्ञा आहे, ती कोणत्याही एका स्त्री किंवा पुरुषाबद्दल नाही, त्यामुळे ती बदलण्याची कोणतीही गरज नाही. राष्ट्रपती हा प्रेसिडेंटला पर्यायी शब्द म्हणून प्रचलित झाला आहे.’

महिला राष्ट्रपतींसाठीही ‘राष्ट्रपती’ हाच शब्द वापरण्यात यावा या युक्तिवादाला राज्यसभेच्या उपसभापती नजमा हेपतुल्लाह यांचा संदर्भ देण्यात आला होता. 

तेव्हा संविधान अभ्यासक सौरभ कश्यप यांनी, ‘हेपतुल्लाह यांना जर उपसभापती म्हणण्यात येतं, तर राष्ट्र्पती म्हणण्यात गैर काय आहे ? जेव्हा प्रतिभा पाटील राज्यसभेच्या उपसभापती होत्या, तेव्हा त्यांनाही उपसभापती असंच संबोधित करण्यात येत होतं. ‘राष्ट्रपती महोदया’ असंही म्हणता येऊ शकतं,’ असं मत मांडलं होतं.

अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्यानंतरही राष्ट्रपती या शब्दासाठी राष्ट्रप्रधान हा पर्याय सुचवण्यात आलाय, तसंच नेमकं काय संबोधन असावं याचा वादही रंगलाय. पण या वादावर २००७ मध्ये पर्याय सुचवला होता, तो बाळासाहेब ठाकरे यांनी.

२००७ मध्ये जेव्हा प्रतिभा पाटील यांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी जाहीर झालं, तेव्हा बाळासाहेबांनी भाजपप्रणित आघाडीमध्ये असूनही काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला होता.

त्यांच्या या पाठिंब्याचीही त्यावेळी बरीच चर्चा झाली. मात्र जेव्हा राष्ट्रपत्नी की राष्ट्रपती हा वाद पुढे आला, तेव्हा बाळासाहेबांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’ मधून आपली भूमिका स्पष्ट केली होती.

त्यांनी लिहिलं होतं की, “मला असं वाटतं की ‘पती’ किंवा ‘पत्नी’ या शब्दांची काहीच गरज नाही. प्रतिभाताईंना ‘राष्ट्राध्यक्ष’ असं संबोधण्यात यावं.”

जर बाळासाहेबांनी दिलेल्या या पर्यायाचा विचार झाला असता, तर कदाचित लोकसभेत नुकतंच जे घडलं, ते टाळलं गेलं असतं आणि या वादावर कायमस्वरूपी पडदा पडला असता, असं म्हणलं तरी वावगं ठरणार  नाही.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.