भाजपचं माहीत नाय, पण मोदीजींसारख्या दिसणाऱ्या मूर्तीला ५ हजार वर्षांचा इतिहास आहे

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणजे कायम चर्चेत असलेलं नाव. त्यांची नुसती कार्यपद्धतीच नाही, तर वक्तव्य ही प्रचंड चर्चिली जातात. नुकतंच एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले,

‘भाजपची स्थापना १९८० साली झाली असं काही लोकांना वाटतं, पण खरंतर भाजपला पाच हजार वर्ष जुन्या हिंदुत्वाचा इतिहास आहे.’

चंद्रकांत दादा म्हणाले भाजपला ५ हजार वर्षांच्या हिंदुत्वाचा इतिहास आहे. पण माध्यमांनी चंद्रकांत दादांचं वक्तव्य टाकताना भाजपला ५ हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे असं टाकलं आणि त्यानंतर त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं.

पण आमच्या डोक्यात आलं की,

भाजपचं सोडा पाच हजार वर्षांपूर्वी या पृथ्वीवर काय असेल? शोधता शोधता आम्हाला एक मूर्ती सापडली.

मूर्ती बघितल्यासारखी वाटू लागली, कारण मूर्ती फेमस होती. फेमस का झाली? तर कुणीतरी म्हणलेलं ही मूर्ती सेम मोदींसारखी दिसते.आता मूर्तीत मोदी दिसतात की मूर्ती मोदींसारखी दिसते हा ज्याच्या त्याच्या नजरेचा प्रश्न. आम्हाला जास्त इंटरेस्ट मूर्तीच्या इतिहासात होता. कारण या मूर्तीचा इतिहास पाच हजार वर्ष जुनाय…

या मूर्तीचं नाव ‘प्रिस्ट किंग’ किंवा ‘किंग प्रिस्ट.’ मराठीत ट्रान्सलेट मारायचं झालं तर, पुजारी राजा किंवा राजा पुजारी. लय सामान्य ज्ञान वापरायचं झालं, तर फकीर असणारा राजा माणूस. डोकं खाजवून कनेक्शन लावत बसू नका आपल्याला पुढं जायचंय.

‘प्रिस्ट किंग’ मूर्ती कुठं सापडली, तर पाकिस्तानात.

स्वातंत्र्यपूर्व काळात १९२५-२६ या कालावधीत पाकिस्तानमध्ये उत्तखन सुरू होतं. हडप्पा-मोहेंजोदाडो संस्कृतीबाबत आणखी माहिती घेण्याचे प्रयत्न सुरू होते. काशिनाथ नारायण दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली सुरू असणाऱ्या उत्खननात प्रिस्ट किंगची मूर्ती सापडली.

ही मूर्ती इसवीसन पूर्व १९००-२००९ सालातली असल्याचं अनुमान तज्ञांनी काढलं. आजच्या हिशोबानी गेलं तर जवळपास पाच हजार वर्ष या मूर्तीला पूर्ण होतात. सिंधू संस्कृतीच्या इतिहासातलं सर्वात प्रसिद्ध दगडी शिल्प म्हणून ‘प्रिस्ट किंग’ मूर्ती फेमस आहे. मोहेंजोदडोच्या पार नंतरच्या काळात ही मूर्ती बनवण्यात आल्याचा तज्ञांचा अंदाज आहे.

या प्रिस्ट किंगच्या मूर्तीत नेमकं आहे तरी काय?

पूर्णपणे दगडापासून बनवलेली ही मूर्ती १७.५ सेंटीमीटर उंच आहे. तिचं डोकं काहीसं लांब आहे, केसांकडच्या भागावर उतार आहे. कधीकाळी रुबाबात असलेल्या या मूर्तीचे दोन्ही हात खांद्यापासून तुटलेत. खांद्याभोवती शालटाईप उपरणं घेतलंय. त्याच्यावर एकदम भारी डिझाईन आहे. डोक्याला कपाळभूषण आहे (ते नाय का नागीन सीरिअलमधली हिरॉईन घालती, त्याला मध्ये मणी असतो, अगदी तसंच)

या मूर्तीच्या कानामागं दोन छोटी भोकं आहेत. नेकलेस किंवा इतर दागिने घालण्यासाठी ही भोकं पाडलेली असू शकतात. आणखी एक लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे या मूर्तीला असलेली दाढी. प्रिस्ट किंग मूर्तीला अगदी आखीव-रेखीव दाढी आहे.

या मूर्तीचे डोळे अगदी बारीक आहेत, म्हणजे आपण जर खूप कमी वेळ झोपलो तर आपले डोळे जसे बारीक दिसतात अगदी तसेच.

उज्ज्वल परंपरा असलेल्या या मूर्तीचं सौंदर्य मात्र कुणीतरी भंग केलंय. मूर्तीचं नाक भंगलंय, तर डोक्याला तडा गेलाय. अभ्यासकांच्या मते ज्या माणसाला डोळ्यांसमोर ठेऊन ही मूर्ती बनवण्यात आली होती, त्यानं आपली पॉवर गमावल्यानंतर ही मूर्ती तोडण्यात आली असावी.

इतकी जुनी आणि मौल्यवान मूर्ती सध्या आहे कुठं..?

ही मूर्ती सापडली पाकिस्तानात. पण तिच्यावर अभ्यास करण्यासाठी मूर्ती भारतात आणण्यात आली. त्यानंतर १९७२ पर्यंत ही मूर्ती भारतामध्येच होती. सध्या प्रिस्ट किंगची मूर्ती पाकिस्तानाच्या राष्ट्रीय संग्रहालयात आहे. त्याची प्रतिकृती सामान्य माणसांना पाहायला मिळते कारण मूळ मूर्ती सुरक्षेच्या दृष्टीनं जपून ठेवण्यात आली आहे.

प्रिस्ट किंग पाकिस्तानात जाण्यामागं इंदिरा गांधी कनेक्शन आहे…

अहो खरंच!

१९७२ मध्ये भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानच्या तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांच्यात शिमला करार झाला. एका पाकिस्तानी पुरातत्व अभ्यासकानुसार इंदिरा गांधींनी भुट्टो यांना एक स्कीम टाकली.

‘भारताकडे डान्सिंग गर्ल आणि प्रिस्ट किंग अशा दोन मुर्त्या आहेत. या दोन्ही मुर्त्या भारी आहेत आणि ऐतिहासिकही. त्यामुळं तुम्हाला आम्ही एकच मूर्ती देऊ शकतो.’ झुल्फिकार अली भुट्टो यांनी डान्सिंग गर्लच्या ऐवजी प्रिस्ट किंगची मूर्ती निवडली.

पाच हजार वर्ष जुना ऐतिहासिक वारसा आणि मूर्तीच्या देखणेपणामुळं ती मूर्ती पाकिस्तानात फेमस आहे, पण भारतात ती प्रसिद्ध होण्यामागचं कारण आहे भाजपचे कार्यकर्ते. २०१४ सालच्या प्रचारात भाजपकडूनच हडप्पा संस्कृतील ही मुर्ती मोदींजींच्या चेहऱ्यासोबत साम्य दाखवते म्हणून शेअर करण्यात आली होती. त्यानंतर या मुर्तीची लोकप्रियता वाढली. 

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.