इंदिरा बाईंचं ओझं…

प्रियंका गांधीनी राजकारणात अधिकृत प्रवेश काय केला सगळे त्यांची तुलना इंदिरा गांधींशी करायला लागले. खरंतर रणजी सामन्यात खेळणाऱ्या खेळाडूचा एखादा सामना पाहून त्याची थेट तेंडुलकरशी तुलना करण्यासारखा हा प्रकार आहे. एक हेअर स्टाईल सोडली तर इंदिरा गांधी आणि प्रियंका गांधी यांची तुलना सध्या तरी चुकीची आहे. इंदिरा गांधी यांच्या नजरेत असणारा करारीपणा अजूनही प्रियंकाच्या नजरेत मिसिंग आहे. अर्थात ही तुलना प्रियंका गांधीवर पण अन्याय करणारी आहे.

कारण आताशी कुठे त्यांची सुरुवात आहे. आणि खरंतर आपली आपल्या आजीशी होणारी तुलना त्यांच्यासाठी दडपण आणणारीच असणार आहे. राहुल गांधी त्याबाबतीत सुदैवी होते. त्यांची गांधी घराण्यातल्यासुद्धा कुणाशी तुलना करण्याचा मोह कुणाला झाला नाही. बीजेपीच्या प्रचारकांनी त्यांना पप्पूच करून टाकलं. आता प्रियंका गांधी यांच्या रूपाने बीजेपीच्या ट्रोलना नवीन विषय मिळालाय.

इंदिरा गांधी आणि प्रियंका गांधी यांची तुलना करण्याआधी सगळ्यांनी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. इंदिरा गांधींनी स्वातंत्र्य चळवळ जवळून पाहिली होती. घरात अनुभवली होती. त्यामुळे आपले वडील आणि आजोबांनी केवढा मोठा त्याग केला होता याच्या त्या साक्षीदार होत्या. याउलट प्रियंका गांधी लहानाच्या मोठ्या होत होत्या त्या आपल्या वडलांवर म्हणजे राजीव गांधी यांच्यावर होणारे भ्रष्टाचाराचे आरोप ऐकत. बोफोर्स प्रकरण वाचत. 

इंदिरा गांधी यांना वडलांकडून सातत्याने येणारी जगभरची आणि भारताची ओळख करून देणारी पुस्तकं, खुद्द जवाहरलाल नेहरू यांची पत्रं मार्गदर्शक होती. जवाहरलाल नेहरूंचा तुरुंगवास असो किंवा त्यांनी लिहिलेली पत्रं, त्यांची जागतिक नेत्यांना भुरळ पाडणारी विचारधारा, भाषणं ऐकत इंदिराजी मोठ्या झाल्या. प्रियंका गांधी यांनी राजीव गांधी यांच्याबद्दल टेलिकॉम क्षेत्रात क्रांती करणारा पंतप्रधान एवढ्या पुरतंच बरं ऐकलं. बाकी शिखांच्या विरोधातली दंगल, श्रीलंकेत झालेला हल्ला, शहाबानो प्रकरणात दाखवलेली कचखाऊ वृत्ती हेच प्रियंका गांधी बघत आल्या.

त्यामुळे राजकीयदृष्ट्या त्यांचा आत्मविश्वास किती असेल याची काही खात्री नाही. इंदिरा गांधींचा प्रवास त्यांना विरोधक गुंगी गुडिया म्हणायचे इथपासून सुरु होतो तो थेट त्यांना लोक दुर्गा म्हणायला लागले इथपर्यंत. प्रियंका गांधींचा प्रवास असा नाही. केवळ आपल्या घरच्या लोकांच्या प्रचाराला येणारी एक मुलगी जी थोडी थोडी इंदिरा गांधी यांच्यासारखी दिसते एवढीच त्यांची ओळख आहे.

इंदिरा गांधींचा नवरा फिरोज गांधी. फिरोज गांधी खासदार होते. पण साधेसुधे खासदार नव्हते. थेट नेहरूंना विरोध करण्याची ताकद असणारे खासदार होते. जावई असून नेहरूंच्या सरकारमधल्या मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्याची हिंमत असलेले खासदार म्हणून फिरोज गांधी यांना देश लक्षात ठेवेल असं वाटलं होतं. पण देश त्यांना फक्त त्यांचं धर्मामुळे लक्षात ठेवतो.

खरंतर फिरोज गांधींनी नेहरूंच्या विरोधात आवाज उठवण्याचं धाडस त्याकाळी केलं होतं हे कॉंग्रेस विरोधकांनी नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. पण फिरोज गांधी यांचं दुर्दैव असं की त्यांना कॉंग्रेसमध्ये सुद्धा योग्य श्रेय मिळालं नाही. विरोधकांकडून तर नेहमीच बदनामी वाट्याला आली.

प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा राजकारणात नाहीत. पण नेहमी वादग्रस्त आहेत. जमीन प्रकरणात बदनाम आहेत. रॉबर्ट वढेरा यांना कॉंग्रेसच्या काळात विमानतळावर सुरक्षा तपासणीला सामोरं जावं लागायचं नाही. विमानतळावर अतिमहत्वाच्या व्यक्तींची यादी असते ज्यात राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासारख्या व्यक्तीना सुरक्षा यंत्रणेच्या तपासणीत सामोरं जावं लागत नाही. त्या व्हीव्हीआयपी लोकांच्या यादीत रॉबर्ट वढेरा यांचं नाव लिहिलेलं असायचं. हा कॉंग्रेसच्या दरिद्री घराणेशाहीचा कळस होता.

प्रियंका गांधी आपल्या नवऱ्यावरच्या भ्रष्टाचारावर कधी बोलल्याचं आठवत नाही. इंदिरा गांधी यांचा नवरा भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणारा होता तर प्रियंका गांधी यांचा नवरा स्वतःच भ्रष्टाचारी म्हणून बदनाम आहे. 

इंदिरा गांधीना दोन लहान मुलं होती. प्रियंका गांधीना दोन लहान मुलं आहेत. पण हा काही तुलनेचा विषय नाही. विषय हा आहे की इंदिरा गांधीना पंडीत नेहरूंच्या रूपाने भक्कम आधार होता. दुर्दैवाने प्रियंका गांधी यांना आपल्या वडलांचा शेवट खूप लवकर बघावा लागला. आणि तोही अतिशय क्रूर शेवट. आधी प्रियंका गांधी यांना आजीची हत्या या भयंकर घटनेला सामोरं जावं लागलं. नंतर त्यांना वडलांचा बॉम्बस्फोटातला शेवट बघावा लागला. या घटनेनंतरही त्यांनी वडलांची हत्या करणाऱ्या लोकांना माफ करावं अशी कोर्टाला विनंती केली. याबाबतीत प्रियंका गांधी यांच्या मनाचं मोठेपण मान्य केलं पाहिजे.

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी घरातल्या या शोकांतिका खूप लहानपणात अनुभवल्या आहेत ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही. या घटनांनंतरही त्यांनी शक्य असूनही देश सोडलेला नाही. आजोळ परदेशात असूनही देशात राहणारे हे भाऊ बहिण कर्ज प्रकरणात देश सोडून पळून जाणाऱ्या लोकांच्या तुलनेत खूप चांगले वाटू लागतात.

प्रियंका गांधी नेहमी भारतीय स्त्री च्या आदर्श इमेजमध्ये राहतात.

साडी हा त्यांचा सार्वजनिक जीवनातला पोशाख असतो. मुलांसाठी त्यांनी राजकारणाकडे दुर्लक्ष केलं असं चित्र सध्यातरी आहे. त्यात चूक काही नाही. सार्वजनिक जीवनात त्या आपल्या नवऱ्याचा उल्लेख नेहमी वढेराजी असा करतात. ही सुद्धा टिपिकल भारतीय मनाला आवडणारी गोष्ट असू शकते. पण कित्येक वर्षापूर्वी आधुनिक समजली जाणारी इंदिराजींची केशभूषा म्हणजे हेअरस्टाईल त्यांना आजही करावी वाटते. पण यामुळे इंदिराजी काळाच्या पुढे होतात असं आपण म्हणू शकतो. पण प्रियंका गांधी नाही.

आजवर फक्त आपल्या आई आणि भावाचा प्रचार करणाऱ्या प्रियंका गांधी या देशाबद्दल काय विचार करतात? आजवर या देशातल्या स्त्रियांचे एवढे प्रश्न ऐरणीवर आले, शबरीमला सारख्या कित्येक गोष्टी घडल्या. यावर प्रियंका गांधी यांचं नेमकं म्हणणं काय आहे? तिहेरी तलाकवर प्रियंका गांधी यांचं म्हणणं काय आहे ? केवळ इंदिरा गांधी यांच्यासारखी हेअरस्टाईल असून उपयोग नाही. थेट आजीशी तुलना हवीशी वाटत असेल तर तशी भूमिकासुद्धा घ्यावी लागेल.

राहुल गांधी आपल्या उपलब्ध गुणवत्तेवर जनतेला सामोरे गेले. चुका केल्या. टीका सहन केली. पण आपलं स्थान निर्माण केलं. प्रियंका गांधीना जर आपण केवळ आजीच्या दिसण्यावर चमत्कार करू शकतो असं वाटत असेल तर चूक आहे. गांधी घराण्याचा करिश्मा मोदींनी संपवला आहे. आता गांधी घराण्याला पुण्याईवर नाही कर्तृत्वावर यश मिळेल. मोदींचं सगळ्यात मोठं यश हे आहे. त्यांनी घराण्याच्या पुण्याईवर जगणाऱ्या या घराण्याला कर्तृत्व दाखवायला प्रवृत्त केलं आहे.

इंदिरा गांधींना घराण्याची जी पुण्याई मिळाली ती प्रियंका गांधी यांच्या नशिबात नाही. सुदैव एवढच आहे की बीजेपीच्या शायना एन सी यांच्या सारखी बाष्कळ विधानं प्रियांका गांधी यांनी कधी केली नाहीत. जवाबदार राजकीय नेतृत्वाची पोकळी त्या भरून काढतील ही अपेक्षा.  

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.