बाळासाहेबांनी लिहलं, “पुलंच्या घरी लक्ष्मी पाणी भरते आणि सरस्वती भांडी घासते !”

महाराष्ट्राची लाडकी माणसं हाताच्या बोटावर मोजण्याएवढी आहेत. त्यातही निर्विवाद दैवत ठरलेली पुलं देशपांडे यांच्यासारखी माणसं दुर्मिळ. बाळासाहेब ठाकरे दैवत होते. पण त्यांचा द्वेष करणारेही कमी नव्हते.

अर्थात बाळासाहेबांची राजकीय भूमिका एवढी थेट होती की त्यांचे शत्रू असणार यात दुमत नाही. राजकारणातला जातीयवाद बाजूला फेकणारे बाळासाहेब शेवटी फक्त हिंदुत्ववादी म्हणून ओळखले गेले. इथून पुढेही सगळ्या जातींच्या लोकांना सोबत घेऊन राजकारण करणारा नेता ही ओळख होण्याची शक्यता नाही. बाळासाहेबांची ओळख हिंदुत्ववादी अशीच राहणार. त्यांच्या चाहत्यांना त्यात काही वाईट वाटायचं कारण पण नाही. 

पण पुलं आणि बाळासाहेबांची तुलना करताना लक्षात येतं की ही दोन्ही माणसं मोठी आहेत ती आपल्या जातीपलीकडे जाऊन विचार करण्यामुळे, माणसं जोडण्यामुळे. 

डॉक्टर विजय ढवळे यांनी आपल्या शब्दांच्या फुलवाती या पुस्तकातल्या एका लेखात या दोघांची खूप छान तुलना केली आहे.

त्यातल्या काही वाती

पु लं देशपांडे यांचा जन्म मुंबईत झाला. पण ते पुण्यात स्थायिक झाले. मृत्यू पुण्यात झाला. बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म पुण्यातला. पण ते मुंबईत मोठे झाले. शेवट मुंबईत झाला. दोघेही उत्तम नकला करणारे. दोघेही उत्स्फूर्त विनोद करण्यात वस्ताद.दोघांनाही गप्पांच्या मैफिली रंगवण्याची आवड.

इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली तेंव्हा पु. लं. देशपांडे अर्थातच आणीबाणीच्या विरोधात होते. पण शिवसेना आणि बाळासाहेब मात्र आणीबाणीचं समर्थन करायचे. त्यावेळी पु. लं. देशपांडे खाजगीत म्हणाले होते,

‘तुरुंगवास वाचवण्याकरता शिवसेनेच्या वाघाने आपले शेपूट पायात घातले’. 

पुलं सुद्धा असे थेट होते. पण बाळासाहेबांना हे मत कळले नसावे अशी शक्यता जास्त आहे. खरंतर बाळासाहेब पुलंचे चाहते होते यात वाद नाही. बाळासाहेबांनी मार्मिक सुरु केलं १९६० साली. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते मार्मिकचं प्रकाशन झालं.

हे शिवसैनिकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर दरवर्षी मार्मिकचा वर्धापनदिन व्हायचा. अध्यक्ष असायचे कॉंग्रेसचे बाळासाहेब देसाई, कधी कॉंग्रेसचे वसंतदादा पाटील तर कधी कॉंग्रेसचे वसंतराव नाईक. असो. 

तर एकवर्षी बाळासाहेबांची इच्छा झाली की पु.लं. देशपांडे यांना मार्मिकच्या वाढदिवसाला बोलवायला पाहिजे. पण पुलंनी चक्क नकार कळवला. अर्थान नकार कळवण्यासाठी सौजन्य म्हणून पुलंनी एक पत्र लिहिलं.

त्यात पुलं देशपांडे यांनी काय लिहिलं होतं?

पुलंनी बाळासाहेब आणी श्रीकांत ठाकरे या व्यंगचित्रकार बंधुंचं कौतुक केलं होतं. विशेषतः त्यांच्या व्यंगचित्रकलेचं. पण सोबत असंही लिहिलं होतं की मार्मिकमध्ये येणारा मजकूर सामान्य दर्जाचा असतो. बाळासाहेबांना काय वाटलं असेल ? 

आता थोडं त्याही आधीच्या काळात जाऊया. पुलंचं वाऱ्यावरची वरात हे नाटक रंगभूमीवर जोरदार लोकप्रिय होतं.

बाळासाहेबांनी रांगेत उभं राहून तिकीट काढलं आणि वाऱ्यावरची वरात नाटक पाहिलं. ते एवढी खुश झाले की त्यांनी मार्मिक साप्ताहिकात दोन पानं केवळ वाऱ्यावरची वरात या नाटकावर व्यंगचित्र काढली. बाळासाहेब एखाद्यावर जीव ओवाळून टाकायचे तो असा. आश्चर्य वाटेल पण पुलंचं असं कौतुक कुणीही ऐकलं नसेल. 

बाळासाहेबांनी चित्राखाली ओळ लिहिली होती,

पुलंच्या घरी लक्ष्मी पाणी भरते आणी सरस्वती भांडी घासते…!

अशी प्रतिक्रिया फक्त बाळासाहेबच देऊ शकतात. ते तेवढ्या मोठ्या मनाचे होते. त्यावर कळस एका चित्रात होता. 

बाळासाहेबांनी एका चित्रात पुलंना चक्क शेंडी दाखवली होती आणी खाली ओळ होती, the god of wisdom! देवांची नावं घेऊन दुसऱ्या कुणी आज अशी प्रतिक्रिया दिली तर सेनेवाले आंदोलन करतील. पण बाळासाहेब हटके होते. 

मार्मिकमधल्या मजकुराला स्पष्टपणे सामान्य दर्जाचा मजकूर अशी पुलंनी संभावना करूनही बाळासाहेब त्यांच्या खास शैलीत व्यक्त झाले नाहीत. नाराज झाले. पण पुढे सेनेची सत्ता आली. महाराष्ट्रभूषण पुरस्कार सुरु केला. तो पुरस्कार बाळासाहेबांना द्यावा अशी शिवसैनिकांची इच्छा होती. पण बाळासाहेबांच म्हणणं पडलं की पुरस्कार पुलंना दिला पाहिजे.

पुलं आजारी होते. त्यांचं भाषण सुनीताबाईंनी वाचलं. त्यात लिहिलं होतं,

‘ ठोकशाहीचं उघडउघड पुरस्कार करणारे सरकार राज्यात सत्तारूढ झाले आहे हे पाहून माझ्या मनाला अपार यातना होतात’

तेंव्हा मात्र बाळासाहेब प्रचंड संतापले. पुढच्या आठवड्यात एका पुलाच्या उद्घाटनात बाळासाहेब म्हणाले,

‘ आता जुने पूल मोडून टाकले पाहिजेत. नवे पूल उभारले पाहिजेत.’ 

पण बाळासाहेब आणि पुलं ही मोठ्या मनाची माणसं होती. त्यांच्यात दुरावा निर्माण होणं शक्यच नव्हतं. पुलं आजारी आहेत हे समजल्यावर बाळासाहेब स्वतः त्यांना भेटायला पुण्याला निघाले. वाऱ्यावरची वरात टेपवर ऐकत. पण लोणावळ्याजवळ बातमी आली. 

पुलं गेले. बाळासाहेब पुलंच्या पत्नीला सांत्वन करताना म्हणाले, वरात ऐकत आलो, आता ह्या वरातीत सामील व्हायला लागते आहे !

हे ही वाचा – 

Leave A Reply

Your email address will not be published.