IT फर्म मध्ये काम करताना हजारात खेळत होता, आता लोकांचं भविष्य सांगून लाखो छापतोय

तुमचा भविष्य आणि ज्योतिषावर विश्वास आहे का ? नसेल तर राहिलं… माझा पण विश्वास नव्हता, पण आता आहे! कारण फक्त एकच पुनीत गुप्ता…

हा भिडू या भविष्य सांगण्याच्या धंद्यातून दिवसाला नाही म्हणलं तरी ४१ लाख रुपये छापतो. मग का ठेवायचा नाही विश्वास आता तुम्हीच सांगा बघू. पारंपरिक व्यवसायला ऑनलाईन व्यवसाय बनवून लोकांच्या गळी उतरवणं साधं सुधं स्किल नसतं गड्या.

आमच्या आईला आजीला कुठला ज्योतिष चांगला हे आजवर कळलं नाही. या ज्योतिष बुवांच्या फाडफाड बोलण्यावरण तर कधी नुसतंच कल्याण होईल या बोलण्यावर या दोघी पण शंका घेतात. पण ज्योतिषांची रंगवून सांगायची पद्धत यांना भावते आणि खरं काय समजत नाही.

आजच्या पिढीला ज्योतिष पाहिजे पण कसं एकदम खरं. एवढे पैसे घ्या आणि आपलं निदान करा. कसाय न हा चांगला तो चांगला हे करत बसण्यापेक्षा त्यांचे ऑनलाइन रेटिंग चेक करा आणि आपली कुंडली बघून घ्या. आणि ते ही ऑनलाईन. एकदम सुम्ममधी. नाहीतर चारचौघात हे ज्योतिष बाजार उठवतात.

या सगळ्या गोष्टी हेरत पुनीत गुप्तान सुरू केलं ऍस्ट्रोटॉक !

२०१५ सालात हा पुनीत मुंबईच्या एका IT फर्म मध्ये काम करत होता. आता सगळ्यांना जसा स्टार्टअपचा किडा येतो, तसा याच्या डोक्यात पण आला. पण स्टार्टअप करायचं कोणतं या प्रश्नाचं उत्तर त्याला काही घावेना. त्याच फ्रस्ट्रेशन बघून त्याच्या सोबत काम करणाऱ्या लोकांनी त्याला त्याच भविष्य बघण्याचा सल्ला दिला. त्यात एक मुलगी होती, त्याच्यासोबतच काम करायची. तिने पण पुनीतला सल्ला दिला की तू बघून घे तुझं भविष्य म्हणजे तुला कुठल्या वेने जायचं ते समजेल.

आता त्याच्या त्या मैत्रिणीचा सल्ला ऐकून पुनीत तिच्यावर हसला आणि म्हंटला अरे आपण इतके शिकलो आहोत असल्या भाकड गोष्टींवर आपण विश्वास ठेवायला लागलो तर कसं व्हायचं ?

यावर त्या मैत्रिणीला थोडा राग आला. म्हणजे तिला ही भविष्य बघता येत होतं. त्याप्रमाणे तिने पुनीतला सांगितलं की तूझ्या भूतकाळात अशा अशा गोष्टी घडल्या आहेत. तिने सांगितलेल्या गोष्टी खऱ्या होत्या पण पुनीतचा विश्वास काही बसेना. त्याला वाटलं आपल्या पास्ट बद्दल तिला कोणीतरी सांगितलं असावं. ती मैत्रीण आता पुनीतच्या भविष्याबद्दल सांगायला लागली. ती म्हंटली की, तू तुझ्या मित्राबरोबर एक IT चं स्टार्टअप सुरू करशील, पण ते दोन वर्षात बंद पडेल. पण तू तुझ्या फिल्डशी रिलेटेड नसणार एक स्टार्टअप सुरू करशील आणि ते चालेल.

पुनीतचा काय विश्वास बसलाच नाही आणि त्याने कंपनीत रिजाईन टाकलं आणि तो त्याच्या स्टार्टअपच्या कामाला लागला. पण त्याच्या मैत्रिणीने जे जे सांगितलं होतं अगदी तसंच दोन वर्षांनी झालं. मग काय पुनीतने तिला कॉल केला आणि गंडलेला सगळा कारभार सांगितला.

मग तिने पुनीतला सांगितलं की तू ऍस्ट्रोलॉजीशी रिलेटेड काहीतरी सुरू कर, त्यात तुला यश मिळेल.

आता हा पुनीत भिडू शिकलाय इंजिनिअरिंग. आता इंजिनिअर असलेल्यांना नेहमीच प्रश्न पडतात, तसे या पुनीतला पण पडले. त्याच्या मते, भारतात ABC लै खपतं. Astrology, Bollywood आणि Cricket. आता B आणि C ऑनलाईन आहे , मग A का मागं राहिलंय ? यात तर काम करायला खूप स्पेस आहे या पुनीतला समजलं. आणि त्याच्या एवढ्याश्या साध्या प्रश्नातून जन्माला आली ऍस्ट्रोटॉक नावाची भविष्य सांगणारी कंपनी.

आता कंपनी काढणं हे बाकी भारी काम होत. पण शेवटी धंदा होता भविष्याचा. याला मागणी आहे का ? तर निश्चितच, पण या धंद्यातली खरी मेख होती ती एकदम ऍक्युरेट भविष्य सांगणारी मंडळी आणायची कुठून ? भविष्यवाणी करणारे ज्योतिष नेमण्यासाठी पुनीत कडे ढिगाने CV आले. या ढिगातून पुनीतने निवडले फक्त पाचच टक्के. हे पाच टक्के भारी होते.

आता ऍस्ट्रोटॉक एवढं फेमस का झालं ?

तर यात १०० टक्के प्रायव्हसी आहे. आपल्या गल्लीबोळातल्या ज्योतिषांसारखं हे ऍस्ट्रोटॉक आपला सगळ्यांसमोर बाजार मांडत नाहीत. पुनीतच्या म्हणण्यानुसार ऍस्ट्रोटॉकचा दिवसाचा बिजनेस नाही म्हंटल तरी ४१ लाखांच्या घरात आहे. त्याच्या कंपनीत २५०० ऍस्ट्रोलॉजर्स काम करतात. आता यात भारी काय असेल तर या ऍस्ट्रोटॉकचे नाही म्हंटल तरी ९० टक्के कस्टमर्स हे पस्तिशीच्या आतले आहेत. त्यामुळे यांचा धंदा वाढतोय, ऍस्ट्रोलॉजर्स कमी पडतायत. म्हणून २०२२ च्या शेवटापर्यंत निदान १०००० ऍस्ट्रोलॉजर्स वाढवणार असल्याचं पुनीत म्हणतोय.

 हे हि वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.