पैशासाठी नाही, पण आपल्या क्लबच्या इज्जतीसाठी रिटायर झालेला द्रविड मैदानात उतरलेला

राहुल द्रविड म्हणजे शांतीत क्रांती, राहुल द्रविड म्हणजे संयमाचा पुतळा आणि राहुल द्रविड म्हणजे फक्त क्रिकेटर्सच नाही, तर कित्येकांसाठी आदर्श. द्रविडनं कधी मैदानात राडे घातले नाहीत, तर मैदानाबाहेर घालायचा विषयच नव्हता. त्याचं काम रन्स करायचं होतं, ते त्यानं अगदी मन लाऊन केलं.

कित्येक क्रिकेटर्सवर रिटायरमेंट घेण्यासाठी प्रेशर टाकावं लागतं, कित्येक जणांबद्दल हा कधी रिटायर होणार राव अशी शंका उपस्थित झालेली, कित्येक जण कमबॅकच्या तर कित्येक जण फेअरवेलच्या आशेनं खेळत राहिले.

पण द्रविडनं इथंही कुणाला नाव ठेवायला जागा राहू दिली नाही. जेव्हा त्याला वाटलं की, आपला फॉर्म गंडत चाललाय, तेव्हा त्यानं शांतपणे रिटायरमेंट घेतली. कसलाच गाजावाजा केला नाही, ना कुणावर आरोप केले.

जे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये केलं तेच आयपीएलमध्ये. द्रविड अखेरचा आयपीएल सामना खेळला होता, राजस्थान रॉयल्सकडून. त्यानं नंतर त्याच संघाचा प्रशिक्षक म्हणून काम केलं. खरंतर त्याच्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध होते. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, त्याची पहिली टीम रॉयल चॅलेंजर्स बँगलोर अशा मोठ्या, तगड्या टीम्स होत्या.

पण द्रविड तो द्रविडच, हा गडी तुलनेनं यंग राजस्थान रॉयल्सचा कोच झाला.

आपला हा विषय कोच द्रविडचा नाही, तर क्रिकेटर द्रविडचा आहे…

इंटरनॅशनल क्रिकेटमधून रिटायर झाल्यावर, चॅम्पियन्स लीगच्या फायनलमध्ये द्रविडनं मुंबई इंडियन्स विरुद्ध आपली अखेरची स्पर्धात्मक मॅच खेळली होती. त्या मॅचमध्ये त्याला फक्त १ रन करता आला होता. त्यानंतर तो कदाचित पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर खेळाडू म्हणून दिसणार नाही. असंच सगळ्यांना वाटत होतं.

आता द्रविड सारखा प्लेअर आपल्या शेवटच्या मॅचमध्ये एक रन करुन आऊट होतो, हे तसं पचायलाच जड आहे. पण सगळ्याच गोष्टींना हॅप्पी एंडिंग नसते, उसेन बोल्टही आपल्या करिअरमधली अखेरची रेस पूर्ण करू शकला नव्हता.

त्यामुळं द्रविडच्या लय बाप करिअरला, लय बाप एन्डिंग मिळालं नाय याची रुखरुख होतीच.

मग घडली एक घटना, ज्यामुळं द्रविडचं ‘द्रविड’ असणं ही किती भारी गोष्ट आहे, हे सहज समजलं.

द्रविड क्रिकेटर म्हणून घडला, तो बँगलोरच्या बँगलोर युनायटेड क्रिकेट क्लबमध्ये. आता मुंबई क्रिकेटमध्ये जसं क्लब क्रिकेटला, कोल्हापूरमध्ये फुटबॉल क्लबला महत्त्व आहे, अगदी तसंच बँगलोरमध्ये क्लब क्रिकेटला.

म्हणजे पीटीएम व्हर्सेस मंडळ या मॅचला कोल्हापूरकर जितकी गर्दी करतील, सेम गर्दी बँगलोर युनायटेड विरुद्ध फ्रेंड्स युनियनच्या मॅचला होणार. त्यात कर्नाटकवाले सुरुवातीपासूनच आगाऊ. म्हणजे त्यांनी काय केलं, तर कर्नाटक क्रिकेट असोसिएशनमध्ये रँकिंग पद्धत ठेवली. तुमच्या क्लबमध्ये कितीही बाप प्लेअर्स असू द्यात, जर तुम्हाला दर्जा राखायचा असेल… तर पर्याय एकच… जिंकणं!

२०१३ मध्ये द्रविडचा लहानपणीचा क्लब म्हणजेच बँगलोर युनायटेड क्रिकेट क्लबला वरच्या लेव्हलला जाण्यासाठी एक मॅच जिंकणं गरजेचं होतं. नेमके क्लबमधले इतर प्लेअर्स कुठं देशाच्या, तर कुठं राज्याच्या संघातून खेळत होते.

जिंकणार कसं? टीमला बूस्टर द्यायला कोणतरी भारी पाहिजे होतं…

जून महिन्यात द्रविड त्यांच्याकडून एक मॅच खेळला होता. आता द्रविडचा स्वभाव कृतज्ञ, पण सारखं कसा खेळेल. त्यातही व्यावसायिक क्रिकेट सोडल्यावर तो खेळल का नाही अशी शंका होतीच.

पण क्लबकडून द्रविडपर्यंत मेसेज पोहोचला, मॅचच्या दिवशी सकाळी एक गोष्ट घडली, ती म्हणजे द्रविड मैदानावर हजर, तेही किटबॅगसकट.

मॅचच्या आधी त्यानं मस्तपैकी ग्राऊंडवर असलेल्या चाहत्यांशी गप्पा हाणल्या, त्यांना फोटो काढू दिले. युनायटेड विरुद्ध फ्रेंड्स युनियन मॅच होती. द्रविडच्या युनायटेडची पहिली फिल्डिंग होती. द्रविडनं आपलं भारी असणं, सिनियर असणं हे सगळं बाजूला ठेवलं आणि निवांत स्लिपमध्ये जाऊन फिल्डिंग केली. 

त्याच्या टीमची बॅटिंग आली, तेव्हा द्रविडला हवा तो नंबर मिळू शकत होता. पण गडी टीमच्या गरजेनुसार पाच नंबरला बॅटिंगला आला. एक कडकडीत सेंच्युरी मारली आणि टीमला जिंकवून दिलं. त्या दोन दिवसांच्या मॅचमध्ये बँगलोरवासियांनी पुन्हा एकदा थ्रिल अनुभवलं. साक्षात द्रविडला खेळताना बघण्याचं. त्याला बॉल डिफेन्ड करताना पाहण्याचं, त्याची ती सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहण्याचं आणि सगळ्यात भारी म्हणजे…

द्रविडनं शतक पूर्ण करुन बॅट उंचावताना पाहण्याचं.

त्या विजयाचा द्रविडच्या क्लबला फायदा झाला, तिथनं पुढं या क्लबमधून खेळणाऱ्या पोरांचं भविष्य भारी झालं. ज्याला खेळताना बघून मोठं झाले असतील, त्या द्रविड सोबत कित्येकांना खेळायला मिळालं.

कित्येक माजी खेळाडू आजही आपल्या जुन्या क्लबमध्ये जातात, पण बक्षिस समारंभासाठी किंवा उद्घाटन, सत्कार अशा कार्यक्रमांसाठी. मात्र द्रविड गेला, तो आपल्या क्लबची इज्जत वाचवण्यासाठी, आपलं कुठंही न लिहून ठेवलेलं ऋण फेडण्यासाठी.

भारी खेळणारे, भारी दिसणारे, भारी असणारे कित्येक क्रिकेटर होतील… पण दुसरा द्रविड तेवढा व्हायचा नाही.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.