कधीकाळी मजूर म्हणून काम करणाऱ्या आमदाराची तब्येत पैलवानाला पण लाजवू शकतेय…
लॉकडाऊननंतर घराबाहेर पडायला सुरुवात केली, तेव्हा बऱ्याच लोकांना एक कॉमन डायलॉग ऐकायला मिळायला, ‘वजन वाढलंय की.’ आता बदलती लाईफस्टाईल, एकाजागेवर बसून काम, खाण्याच्या सवयी अशा लय काय काय गोष्टींमुळं कित्येकांची वजनं वाढली. फॉर्मल कपडे सोडा, जीन्सपण बसेनाशा झाल्या.
थोडक्यात काय तर, कित्येकांची शारीरिक हालचाल कमी झाली आणि पोटं पुढं आली. कोविडनं एक गोष्ट मात्र शिकवली, फिटनेस ही लय महत्त्वाची गोष्ट आहे भिडू.
कोविडनंतर कित्येकांनी व्यायाम करायची सवय लावून घेतली. पोटं आत गेली, डायट सुरू झाला. काहीजण अजूनही बिगेनर स्टेजला आहेत. पण कसंय, निवांत झाली तरी चालतेय पण प्रगती झाली पाहिजे.
आता हे सगळं पुराण तुम्हाला सांगायचं कारण म्हणजे, आम्ही एका आमदाराची तब्येत पाहिली. तालमीतले पैलवान, जिममधले बिल्डर यांना पण विषय हार्ड वाटेल अशी तब्येत त्यांनी वयाच्या ६८ व्या वर्षी जपलीये. आता इतकं वय झालंय म्हणल्यावर दुखणं, खुपणं आलं असणारच की, पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी आपला व्यायामाचा नाद जपला आणि त्याचं फळ म्हणजे त्यांचं बलदंड शरीर.
हे आमदार म्हणजे, राजस्थानचे रूपाराम मुरावतिया. विद्यार्थी चळवळीपासून रूपाराम यांचा राजकारणाशी संबंध आला. राजस्थानमधले ज्येष्ठ शेतकरी नेते नथुराम मिर्धा यांच्या प्रभावामुळं ते राजकारणात आले. सुरुवातीला त्यांना आमदारकीचं तिकीट मिळालं नाही,पण १९९३ मध्ये ते अपक्ष म्हणून निवडून आले. ती टर्म संपल्यावर ते थेट, २०१८ मध्ये भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि जिंकलेही.
आता जरा रूपाराम यांचा इतिहास जाणून घेऊ-
रूपाराम यांचं शिक्षण फक्त अकरावीपर्यंत झालं; पण दुनियादाऱ्यांमध्ये ते अजिबात कमी पडले नाहीत. त्यांनी दहा वर्ष लोखंडाच्या कारखान्यात काम केलं. त्यावेळी त्यांना दिवसाला १९ तास काम करुन, फक्त १३ रुपये मिळायचे. रूपाराम प्रयत्न करत राहिले आणि त्यांनी एक धाडस करायचं ठरवलं. १९७६ साली राजस्थान फायनान्स कॉर्पोरेशनकडून सव्वा लाख रुपयांचं कर्ज घेत त्यांनी मार्बल कटिंग मशीन बनवण्याचं काम सुरू केलं.
हे स्वदेशी मशीन बवण्यासाठी त्यांनी सलग दोन वर्ष काम केलं. फक्त अकरावीपर्यंत शिकलेल्या रूपाराम यांनी बनवलेल्या ११० डायमंड आणि गँगसा मशिन्सला जबरदस्त लोकप्रियता मिळाली. पुढं १९८४ मध्ये त्यांनी स्वतःचं लोखंडाचं वर्कशॉप सुरू केलं. पुढे ते राजकारणात आले आणि काही वेळा तिकीट नाकारल्यानंतर अपक्ष म्हणून निवडूनही आले.
आता येऊयात त्यांच्या तब्येतीकडे
दैनिक भास्करला दिलेल्या एका मुलाखतीत रुपाराम सांगतात, की ते आयुष्यात कधीच जिमला गेलेले नाहीत. ‘मला कठोर परिश्रमानं तंदुरुस्त आणि निरोगी ठेवलं आहे. संघर्षाच्या दिवसांत केलेली मेहनत आणि ग्रामीण वातावरणात गेलेल्या आयुष्यामुळं मी अजूनही फिट आहे. माझी आर्टजीक परिस्थिती सुधारली, मी आमदारही झालो, आता नियमित योगासनं करुन आणि फुटबॉल खेळून आरोग्य संभाळतोय,’ असंही ते सांगतात.
विशेष म्हणजे एकदा रूपाराम आपल्या गावातून फेरफटका मारत होते, तेव्हा त्यांना सैन्य भरतीची तयारी करणारे काही तरुण व्यायाम करताना दिसले. रूपाराम यांनी त्यांच्या सोबत जोर मारत वयाच्या ६८ व्या वर्षीही आपण ‘फिट अँड फाईन’ आहोत याचा जबरदस्त दाखला दिला. जोर मारतानाचा व्हिडीओ त्यांनी ट्विटरवर पोस्टदेखील केला आहे.
68 साल की उम्र में भी खुद को फिट एवं युवा रखने की कोशिश करता हूँ,आज ग्रामीण क्षेत्र के दौरे पर था,एक खेत में युवाओं को आर्मी भर्ती की तैय्यारी करते देख थोङी पुश-अप लगा ली,उम्र का असर तो इंसान पर आता ही है लेकिन कोशिश यही रहती है की खुद को थोङा और फिट करुं।
पहला सुख-निरोगी काया🙏 pic.twitter.com/ygCyDpaT8r— Ruparam Murawtiya (@mlaruparam) June 13, 2021
आपल्या आरोग्याकडं लक्ष दिलं, तर आपण ६८ व्या वर्षी पण फिट राहू शकतोय भिडू. भले व्यायाम नाही जमला, तरी योगासनं आणि एखादा खेळ खेळायला पाहिजे, शेवटी जान सलामत तो पगडी पचास…
हे ही वाच भिडू:
- बिअर्ड ऑईल लावल्यानं खरंच दाढी येते का भिडू?
- २ वर्ष अंथरुणाला खिळलेला पण आता या मराठी मुलानं युरोपातील सर्वोच्च शिखर २ वेळा सर केलंय..
- निजामापुढं पेशव्यांची इभ्रत पणाला लागली आणि मल्लखांबाचा जन्म झाला