२ वर्ष अंथरुणाला खिळलेला पण आता या मराठी मुलानं युरोपातील सर्वोच्च शिखर २ वेळा सर केलंय..

गरीब मुलांनी स्वतची स्वप्ने कशी पूर्ण करावी याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे सोलापूरचा आनंद बनसोडे….! अंधाऱ्या झोपडीतून सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टसह इतर ४ खंडातील सर्वोच्च शिखरे सर केलेला आनंद बनसोडे आपल्या प्रत्येकाला माहित आहेच. 

एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे याने नुकताच युरोपातील सर्वोच्च शिखर माऊंट एलब्रूस दुसऱ्यांदा सर केला. एकच शिखर २ वेळा सर केले त्यात एवढं विशेष काय??  तेच तर विशेष आहे, हे शिखर २ वेळा सर करणारा प्रथम महाराष्ट्रीयन आनंद बनलाच पण या यशामागे एक सर्वोच्च प्रेरणादायी प्रवासाची किनार आहे.

तुम्हाला आठवत असेल 2015 मध्ये पूर्ण महाराष्ट्रात बातम्या आलेल्या,

“एव्हरेस्टवीर अंथरुणाला खिळला”, “आनंद आता चालुही शकणार नाही”, “अंथरुणाला खिळलेला आनंद रोजच्या जगण्यासाठी धडपडतोय”.

लहानपणापासूनच गरीबीचे चटके सोसलेल्या आनंदला असे दिवस यावेत यावर महाराष्ट्रातील व भारतातील अनेकांनी हळहळ व्यक्त केलेली. ४ खंडातील ४ सर्वोच्च शिखरे सर करणारा विक्रमवीर, जगातील ४ खंडातील सर्वोच्च शिखरावर गिटारवर राष्ट्रगीत वाजवून विक्रम करणारा, प्रत्येक मोहिमेनंतर सोलापूरकरांनी व संपूर्ण भारताने अभिमानाने मिरवलेल्या यशाचा शेवट “आयुष्यभर अंथरुणात पडून” होईल याची कोणी कल्पना केली नव्हती.

त्याच अवस्थेत आनंदची गर्लफ्रेंड (आताची बायको) अक्षया हिने आनंद सोबत लग्न करण्याचे धाडस दाखवले. लग्नही अगदी साधेपणाने म्हणजे एका अनाथालयात ‘भारताच्या संविधानाची प्रस्तावना’ वाचून केले. लग्नानंतर आजारपण, आर्थिक अडचणी यात आनंद बनसोडे परिस्थितीच्या तडाख्यात काळाच्या पडद्याआड नामशेष झाला असे अनेकांना वाटले. २०१५ ते २०१७ ही वर्षे कठीण गेली.

फिजिओथेरपी व विविध उपचारामुळे थोडे थोडे जरी चालता येत असले तरी गिर्यारोहन दूरच. अशातच आनंदचे वजनही ९५ ते ९७ किलो झाले होते. पण म्हणतात ना, “खऱ्या खेळाडूची परीक्षा मैदानात नाही तर जीवनाच्या मैदानात होत असते. खाली पडूनही जो खेळाडू पुन्हा उठण्याचे धाडस दाखवतो तोच विजेता ठरतो”

2017 ला पुन्हा एकदा सुरवात करून आनंदने 360 एक्सप्लोरर या साहसी खेळ आयोजित करणाऱ्या कंपनीची सुरवात केली. अल्पावधीतच आफ्रिका, युरोप, नेपाळ, महाराष्ट्रात अनेक साहसी मोहिमा 360 एक्सप्लोरर मार्फत आयोजित  केल्या. 360 एक्सप्लोररमार्फत गिर्यारोहनातील अनेकांची स्वप्ने पूर्ण करत नियोजनबद्ध मोहिमा आयोजित करणारा आनंद बनसोडे म्हणून लवकरच पूर्ण भारतात व भारताबाहेरही आनंदाची ओळख निर्माण झाली.

पण 2015 साली झालेल्या मणक्याच्या आजाराने स्वतःच्या शारीरिक भीतीवर मात करणे अवघड होते. आनंद सांगतो, “गेली अनेक वर्षे मला रात्री अपरात्री स्वप्न पडायची की पुन्हा माझा मणका तुटला आहे. आणि मी खाली कोसळलो आहे. मणक्याबाबत माझ्या मनात एक अंतर्गत भीती होती त्यावर मात करणे गरजेचे होते”

मार्च 2020 मध्ये कोरोनामुळे संपूर्ण जग लॉकडाऊन झाले याच काळात घरात राहून फिजिओथेरपी, मेडिटेशन, व्यायाम, विपश्यना याचा आधार घेत आनंदने मणक्याच्या या भीतीवर मात करणे सुरवात केली. वजनही कमी केले. सुरवातीला अगदी हातावर थांबण्यापासून ते 1 जोर मारण्यापर्यंत यश मिळवले. हळूहळू या भीतीवर पूर्णपणे मात करत आनंद त्यातून बाहेर पडला. 17 ऑगस्ट 2021 रोजी तो सुवर्णक्षण उगवला ज्याचा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल. युरोपातील सर्वोच्च शिखर माऊंट एलब्रूस (रशिया) सर करून हे शिखर सर करणारा प्रथम महाराष्ट्रीयन आनंद बनसोडे बनला.

आनंदचे हे यश फक्त गिर्यारोहनापुरतेच मर्यादित नाही. प्रेरणादायी वक्ता व लेखक असलेल्या आनंद बनसोडे याने असे अनेक गोष्टींवर मात करत सर्वोच्च स्थानी झेप घेतली आहे.

विशेष म्हणजे आनंद च्या बोलण्यात एकेकाळी दोष होता. मात्र गिर्यारोहणातील लढाऊ जिद्दीने त्यावरदेखील मात करत आनंद प्रेरणादायी वक्ता व ट्रेनर बनला आहे. युनायटेड नेशन्स च्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयातही आनंदने 110 देशांसमोर भाषण केले आहे.

आनंद एकेकाळी 9 वी नापास झाला होता. 9 वीच्याच हिंदी प्रथमच भाषेच्या पाठ्यपुस्तकात आनंदच्या आयुष्यावर एक धडा आहे.एके काळी ९ वी नापास असूनही पुढील शिक्षण घेत आनंद सध्या पुणे विद्यापीठातील फिजिक्स डिपार्टमेंटमेंट मध्ये PhD करत आहे. एके काळी ‘ढ’ असा शिक्का असलेला आनंद संशोधकही आहे हे विशेष.

बिजनेसची कोणतीही पाश्वभूमी नसताना आनंदने आंतरराष्ट्रीय स्तरावरील साहसी कंपनी सुरू केली व महाराष्ट्रातील सर्वात यशस्वी ‘बिजनेस कोच’ म्हणून आनंद ओळखला जातो. इतकंच नाही तर त्याने आतापर्यंत 5 पुस्तके लिहिली असून 2019 चा “झी युवा साहित्य सन्मान” हा पुरस्कार आनंदला मिळालेला आहे.

 युनायटेड नेशन्स च्या Sustainable Developement Goals वर काम करत अनेक सामाजिक उपक्रमात आनंदने सहभाग नोंदवला आहे. युनायटेड नेशन्स चा Goodwill Ambassador असलेल्या फरहान अख्तर ने ही आनंदची भेट घेऊन त्याचे कौतुक केले होते. आनंद हा एक लाईफ कोच असून आतापर्यंत अनेक लोकांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोचिंग केले आहे.

४ खंडातील सर्वोच्च शिखरावर गिटारने भारताचे राष्ट्रगीत वाजवणारा एकमेव व्यक्ती म्हणून आनंदच्या नावे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, हाय रेंज बुक ऑफ रेकॉर्ड इ. अनेक रेकॉर्ड आहेत.

आनंदचा प्रवास सुरूच आहे. पण या प्रवासातून आपण प्रत्येकजण खूप काही शिकू शकतो. अगदी अंथरुणाला खिळून पुन्हा सर्वोच्च शिखरे गाठण्यासाठी तयार होणे असो, बोलण्यातील शारीरिक व्यंगावर केलेली मात असो, आनंदच्या पत्नीने प्रेमात दिलेली साथ असतो, स्वप्नांच्या प्रवासात अनेकांना दाखवलेला मार्ग असो या प्रत्येक गोष्टीत आनंदच “स्वप्नाकडून सत्याकडे” जाणारा प्रवास प्रेरणादायी आहे.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.