महंमद घोरीने ‘पृथ्वीराज चौहान’ ह्यांचे डोळे फोडले, त्याही स्थितीत पृथ्वीराजांनी घोरीला संपवलं..

बॉलीवुड आणि बिग बजेट ऐतिहासिक सिनेमे हे एक भारी भक्कम समीकरण अनेक वर्षांपासून चालत आलंय. राजे महाराजे आणि त्यांच्या शौर्यगाथा मोठ्या पडद्यावार बघण्याला प्रेक्षकांचीही कायम पसंती राहिलीये. त्यात पूर्वीपेक्षा हल्ली तर वीएफएक्स आणि आफ्टर इफेक्ट्ससारख्या आधुनिक टेक्नॉलॉजीमुळे तर हे सिनेमे आणखीनच रियलिस्टिक वाटतात आणि वेगळीच छाप पाडून जातात.

सिनेमात वापरले जाणारे भव्य दिव्य सेट्स आपल्या डोळ्यांचं पारणं फिटवणारे असतात. यापैकी काही गाजलेल्या सिनेमांची नावं घ्यायची झाली तर, बाजीराव मस्तानी, जोधा अकबर, पद्मावत, पानिपत हे पिक्चर आपल्या पहिले डोळ्यासमोर येतात. आणि पिक्चरच्या नावांसोबतच त्यातली भव्य दिव्य दृश्यही आठवतात.

असाच एक सिनेमा आता येऊ घातलाय आणि या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉंच झालाय.

सिनेमाचं नाव आहे ‘पृथ्वीराज’ आणि हा सिनेमा हिंदू राजपूत राजा पृथ्वीराज चौहान या योध्याच्या जीवनावर आधारित आहे.

मुख्य भूमिकेत प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेता अक्षय कुमार आहे आणि त्याच्यासोबत मिस वर्ल्ड हा किताब पटकावलेली मानुषी छिल्लर काम करतेय. आणि हा सिनेमा चंद्रप्रकाश द्वीवेदी यांनी  दिग्दर्शित केलाय.

आता ऐतिहासिक गोष्ट म्हटली की युद्ध, लढाया सुद्धा येतात आणि ह्या पिक्चरच्या ट्रेलरमध्ये सुद्धा तुम्हाला युद्ध, लढाया दिसतीलच पण फक्त ट्रेलर पाहून तुम्हाला या योध्याची गोष्ट उमगणार नाही आणि म्हणूनच या महान राजाची शौर्यगाथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न.

पृथ्वीराज चौहान म्हणजे राजपुतांच्या इतिहासातले एक थोर आणि पराक्रमी योद्धा होते. मुळात राजपुतांचा इतिहासच प्रचंड मोठा आणि गौरवशाली आहे. सातव्या शतकापासून ते सतराव्या शतकापर्यंत उत्तर आणि पश्चिम भारतात राजपुतांनी राज्य केलं.

राजपुतांचा उत्तर आणि पश्चिम भारतात अक्षरश: दबदबा होता. त्या काळातच अनेक महान योद्धे होऊन गेले आणि त्यातलेच एक म्हणजे पृथ्वीराज चौहान.

पृथ्वीराज चौहान यांच्याविषयी अनेक कथा आणि दंतकथा प्रचलित आहेत. परंतु एक प्रसिद्ध झालेली थिअरी आहे पृथ्वीराज रासो ह्यांची, जे पृथ्वीराज चौहान यांच्या दरबारातले कवि होते आणि त्यांचे जवळचे मित्रही होते. त्यांनी ‘चाँद बराई’ ह्या संग्रहात ही थिअरी लिहून ठेवली आहे. 

पृथ्वीराज चौहान यांचा जन्म ११६६ साली गुजरातमध्ये झाला. अजमेरचे महाराजा सोमेश्वर आणि कारपुरा देवी यांचे ते पुत्र होते. ११७७ साली त्यांच्या वडिलांचं म्हणजेच महाराजा सोमेश्वर यांचं निधन झालं आणि अवघ्या अकराव्या वर्षी पृथ्वीराज चौहान ह्यांनी राज्य कारभार हाती घेतला होता.

पृथ्वीराज चौहान यांनी कायमच आपल्या साम्राज्य विस्तारावर भर दिला होता. ते अत्यंत महत्वाकांक्षी होते, हुशार होते, कुशल योद्धे होते, युद्धा विषयीचं ज्ञान, कसब आणि बाकी सगळे साहसी गुण त्यांनी लहान वयातच आत्मसात केले होते. असं म्हणतात त्यांना तब्बल १७ भाषा येत होत्या.

पण त्यांच्या ह्या साम्राज्य विस्ताराच्या भावनेमुळे त्यांनी आपल्या मुलूखातच अनेक शत्रू निर्माण केले. त्यातले एक मोठे शत्रू होते ते म्हणजे कंनोजचे राजे जयचंद.

जयचंद पृथ्वीराज चौहान ह्यांचा प्रचंड द्वेष करायचे पण त्यांची मुलगी संयोगीता मात्र राजा पृथ्वीराज चौहान यांच्या प्रेमात अखंड बुडालेली होती. संयोगीताचे वडील जयचंद यांना पृथ्वीराज चौहान यांच्याबद्दल ईर्षा वाटे आणि या उलट त्यांची मुलगी संयोगीता पृथ्वीराज चौहान ह्यांना पतीपरमेश्वर मानून त्यांची पूजा करत असे.

असं ऐकीवात आहे, की जयचंद यांनी एक दिवशी आपल्या मुलीचं स्वयंवर घोषित केलं होतं आणि दरम्यान ह्या स्वयंवराला जगभरातल्या मोठ मोठ्या वीरांना, राजांना आमंत्रण दिलं होतं. परंतु या सोहळ्यासाठी त्यांनी पृथ्वीराज चौहान ह्यांना आमंत्रित न करता त्यांचा पुतळा बनवून घेतला होता. आणि राजकुमारी संयोगीता हिने त्यावेळी त्या पुतळ्यालाच हार घातला होता.

त्याच सोहळ्यात पृथ्वीराज चौहान तिथे पोहोचले आणि राजकुमारी संयोगीताला आपल्या राज्यात घेऊन आले आणि तिथे दोघांचं लग्न थाटामाटात पार पडलं.

ही गोष्ट जयचंद यांना खूप लागली, त्यांनी ह्या गोष्टीचा बदला घ्यायचं ठरवलं. आणि संपूर्ण पंजाबवर राज्य असणाऱ्या महम्मद घोरी ह्या पृथ्वीराज चौहान ह्यांच्या कट्टर शत्रूशी त्यांनी हात मिळवणी केली आणि त्यांना संपवायचं षड्यंत्र रचलं.

उत्तर भारतात पृथ्वीराज चौहान यांची सत्ता होती. आणि त्याच दरम्यान अफगाणिस्थानात महम्मद घोरीचा उदय झाला होता. त्याने साधारण ११७५ साली भारतभरात आपलं साम्राज्य प्रास्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पंजाब, सिंध, पेशावर अशी काही ठिकाणं जिंकण्यात त्याला यश देखील आलं. पण बाकी बऱ्याच ठिकाणी त्याचा सपशेल पराभव झाला.

त्यानंतर पृथ्वीराज चौहान यांच्यासोबत महम्मद घोरीची लढाई झाली ११९० ते ११९१ च्या दरम्यान. महम्मद घोरीला पृथ्वीराज चौहान ह्यांच्या फौजेचा जराही अंदाज नव्हता. शिवाय उत्तर भारतापासून सुरवात करून हळूहळू अख्ख्या भारतावर कब्जा करण्याचा त्याचा मानस होता.

ह्याच अतिआत्मविश्वासाने त्याने युद्ध घोषित केलं आणि आपलं सैन्य सोबत घेऊन तराइनवर (म्हणजे आत्ताच्या करनालवर) आक्रमण केलं. पृथ्वीराज चौहान यांच्या सोबत झालेल्या लढाईत महम्मद घोरीचा पराभव झाला खरा पण पृथ्वीराज चौहान ह्यांच्याकडून एक चूक घडली. ती म्हणजे महम्मद घोरीला शिक्षा न देता सोडून देण्यात आलं. आणि ह्याचाच फायदा नंतर त्याने जयचंद सोबत हात मिळवणी करताना घेतला.

मग महम्मद घोरी आणि पृथ्वीराज चौहान ह्यांच्यात ११९२ साली दुसऱ्यांदा युद्ध झालं. यावेळी मात्र महम्मद घोरीने हुशारी वापरुन सुमारे एक लाख साठ हजार लोकांचं सैन्य घेऊन तयारीनिशी आक्रमण केलं. त्याने आपलं सैन्य पाच तुकड्यांमध्ये विभागलं. 

४ तुकड्यांना मारण्यात पृथ्वीराज चौहान यांच्या सैन्याला यशही आलं परंतु नंतर मात्र त्यांच्या सैन्याला पराभव स्वीकारावा लागला. आणि तेव्हा मग मुस्लिमांचं राज्य भारतभर पसरायला सुरवात झाली.

पृथ्वीराज चौहान ह्यांच्या निधनाविषयी अनेक कथा सांगितल्या जातात. पण त्यांच्या दरबारातल्या कवि, पृथ्वीराज रासो यांनी जे लिहून ठेवलंय त्यात त्यांनी असं सांगितलंय की महम्मद घोरीने त्यांना युद्धातल्या पराभवानंतर कैदेत ठेवलं आणि त्यांचे डोळे फोडले.

पण तरीही पृथ्वीराज चौहान ह्यांनी महम्मद घोरीला चकवून, बाण मारून त्यांचा वध केला आणि नंतर इतर कोणाच्याही हातून मरण्याची वेळ येऊ नये म्हणून स्वतः आत्महत्या केली.

 हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.