कसाबला मेट्रो जंक्शनवर नेऊन नाक घासून ‘भारतमाता की जय’ म्हणायला लावलं होतं…

राज्याची राजधानी मुंबईवर झालेल्या हल्ल्याला आता १३ वर्ष पूर्ण झाली. या हल्ल्यात मुंबईचं अतोनात नुकसान तर झालंच; पण अनेक निष्पापांना आपले प्राण गमवावे लागले, कित्येक कर्तबगार पोलिस अधिकारी धारातीर्थी पडले. फक्त मुंबईचीच नाही, तर संपूर्ण देशाची शान असणारं ताज हॉटेल, ओबेरॉय हॉटेल आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानक धुमसत राहिलं.

मुंबई पोलिसांचे अथक प्रयत्न आणि एनएसजी कमांडोंची जिगरबाज मोहीम यामुळं दहशतवाद्यांचा बिमोड करण्यात यश आलं.

या मोहिमेत भारताला मिळालेलं सर्वात मोठं यश म्हणजे दहशतवादी अजमल कसाबला मुंबई पोलिसांनी जिवंत पकडलं होतं. हुतात्मा तुकाराम ओंबळे यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि कसाबला पकडण्याचं धाडस दाखवलं.

कसाबला ताब्यात घेतल्यामुळं पाकिस्तानमधून मिळालेली मदत, तिकडं अतिरेक्यांचा झालेला ब्रेनवॉश, हल्ल्याचे मास्टरमाईंड या सगळ्या गोष्टी उजेडात आल्या.

कसाबला ताब्यात घेतल्यानंतर, त्याची चौकशी करण्याची जबाबदारी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्यावर सोपवण्यात आली होती. आपल्या ‘लेट मी से इट नाऊ’ या आत्मचरित्रात त्यांनी २६/११ हल्ल्याच्या तपासाच्या आणि अजमल कसाबच्या चौकशीच्या अनेक आठवणी लिहिल्या आहेत.

मारिया त्यात लिहितात, ‘एखाद्या जिवंत दहशतवाद्याला पकडणं हे प्रचंड मोठं यश होतं. कसाबला पकडल्यावर लक्षात आलं की, त्याच्या हातात लाल धागा बांधलेला होता. त्याच्या जवळ समीर चौधरी असं नाव असलेलं ओळखपत्रही होतं.मुंबईवर झालेला हा हल्ला हिंदू दहशतवाद्यांनी केला आहे, असं पाकिस्तानला भासवायचं होतं. मात्र कसाबला जिवंत पकडल्यामुळं त्यांचे मनसुबे उधळले गेले.’

कसाब जिवंत हाती लागल्यामुळं पाकिस्तानशी निगडित खळबळजनक माहिती समोर येण्याची शक्यता होती. त्यामुळं दाऊदच्या मुंबईतल्या हस्तकांवर कसाबला जेलमध्येच मारून टाकण्याचं काम सोपवल्याची माहिती, आपल्याला गुप्तचर यंत्रणांनी दिल्याचं मारिया सांगतात.

ते लिहितात,

‘कसाबला दिला जाणारा डबा पोलिस कर्मचाऱ्यांच्या घरून यायचा. जेवण असेल किंवा पाणी त्याला देण्याआधी आम्ही चव घेऊन बघायचो.’

मारियांनी लिहिलेल्या या पुस्तकात कसाबला मशिदीसमोर नेल्याचाही उल्लेख आहे.

‘कसाबला ब्रेनवॉश करताना असं सांगण्यात आलं होतं की, भारतात मुस्लिम नागरिकांना मारून टाकतात. कोठडीमध्ये असताना त्याच्या कानावर अझान पडायची. त्याला वाटायचं की आपल्याला भास होतायत. त्यामुळं मी एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला सांगितलं की, कसाबला मशिदीसमोर घेऊन जा. तिथं गेल्यावर त्यानं  मुस्लिम बांधवांना नमाज पढताना पाहिलं, तेव्हा त्याचा विश्वास बसला नाही,’ असा उल्लेखही मारिया यांनी पुस्तकात केला आहे.

कसाबला घेऊन जाणारा गाड्यांचा ताफा मेट्रो जंक्शनपाशी आला होता. चिडलेल्या राकेश मारियांनी गाड्या थांबवल्या, पुढच्या प्रसंगाचं वर्णन करता ते लिहितात, ‘माझ्या शहरातल्या निष्पाप नागरिकांची आणि माझ्या सहकाऱ्यांची निर्घृण हत्या करणारा राक्षस आत गाडीत बसला होता.

मी त्याला बाहेर काढण्याचे आदेश दिले. ज्या मेट्रो जंक्शनवर त्यानं प्रेतांचा खच पाडला होता, त्याच जमिनीवर मी त्याला डोकं टेकवायला लावलं. त्यानं डोकं टेकवल्यावरही माझा राग शांत झाला नाही. मी त्याला घोषणा द्यायला लावली, ”भारतमाता की जय.” त्यानं एकदा घोषणा दिल्यावरही मी त्याला पुन्हा एकदा म्हणायला लावलं, भारतमाता की जय.’

त्या रात्री मारिया आणि त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या सर्व सहकाऱ्यांच्या मनावर ती आठवण कोरली गेली असणार आहे. रात्रीची भयाण शांतता, जीव गमवावा लागलेल्या नागरिकांची आणि मित्रांची आठवण, आणि त्यांचा निर्घृणपणे जीव घेणाऱ्या दहशतवाद्याच्या तोंडून आलेला आवाज… ‘भारतमाता की जय!!’

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.