राजकारणाच्या राड्यात एक ऊसतोडणी कामगाराचा मुलगा आमदार झाला…

अकलूज माळशिरस म्हणजे मोहिते पाटलांचा गड. गेली अनेक वर्षे त्यांनी या भागात सहकार फुलवला. दुष्काळी भागात ऊस लागला. मोहितेंच्या उस कारखान्यांमुळे सुबत्ता आली. तिकडचा शेतकरी सुखी झाला. याच मोहिते पाटलांच्या कारखान्यात ऊस तोडणीकामगाराचा मुलगा माळशिरसमधून निवडणूक लढवली. त्याचा फॉर्म भरायला स्वतः रणजितसिंह मोहिते पाटील हजर होते.

आज तोच उसतोडणी कामगाराचा मुलगा विजयी झाला. 

ही जादू कशी झाली? कोण आहेत राम सातपुते?

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुकामध्ये डोईठाण नावाचे गाव आहे. विठ्ठल सातपुते याच गावाचे. परंपरागत चर्मकार व्यवसाय घरात चालत आलेला. पण दुष्काळा मुळे दोघेही पतीपत्नीनां उसतोडणी कामगार म्हणून जाव लागायचं. अख्ख गावच्या गाव ऊस तोडायला म्हणून पश्चिम महाराष्ट्रात यायचं.

अखेर सातपुते कुटुंबाने आपला मुक्कामच माळशिरस मधल्या भाम्बुर्डी येथे हलवला. हे ही गाव तसं दुष्काळी पण जवळच असलेल्या साखर कारखान्यामूळ पोटापाण्याची चिंता मिटलेली.

सातपुते यांना तीन मुलींच्या पाठीवर एक मुलगा झाला. नाव ठेवलं राम. गरिबीच्या खाईतून बाहेर पडायचं झालं तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे विठ्ठल सातपुतेना माहित होतं. म्हणूनच त्यांनी आपल्या पोरांना शिकवलं. एकवेळ उपास केला पण मुलाला इंजिनियर करायचं स्वप्न बघितलं. मुलगा ही तसाच हुशार निघाला.

पुण्याचा विद्यार्थीगृह अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रिंटींग इंजिनियरिंगच्या कोर्ससाठी प्रवेश घेतला. सुरवातीला माळशिरससारख्या ग्रामीण भागात शालेय शिक्षण झाल्यामुळे दबून असणारा राम काही काळानंतर तिथे रमला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी त्याचा संपर्क आला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी काम करायला सुरवात केली.

स्वतः गरिबीतून आल्यामुळे परिस्थितीचे चटके सहन केलेले असल्यामुळे त्याला स्वतःला या प्रश्नाची जाण होती.

त्याच गांभीर्य समजत होतं. विद्यार्थी लढ्यात काम करत असताना त्याला आपला खरा सूर गवसला. ग्रामीण भागातून आलेल्याच दडपण त्याने झुगारून दिले. मोठ्या सभांमधून आत्मविश्वासाने आपल म्हणण मांडू लागला.

सर्व थरातून आलेल्या मुलांशी सहजपणे कनेक्ट होण्याची हातोटी त्याला विद्यार्थ्यांचा लढा उभारताना उपयोगाला झाली. पुणे विद्यापीठात त्याने केलेली आंदोलने यशस्वी झाली. बरीच प्रश्ने सोडवता आली. त्याची दखल अभाविपच्या नेतृत्वाने घेतली.

राम सातपुतेनां वेळोवेळी मोठमोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या.

पुणे विद्यार्थीगृहाचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून सुरवात केलेला राम पुढे जाऊन अभाविपचा महाराष्ट्र राज्याचा प्रांतमंत्री या पदापर्यंत जाऊन पोहचला. केरळ मध्ये संघ कार्यकर्त्यांवर सुरु झालेल्या खुनी हल्ल्यामुळे अभाविपने चलो केरळ हे आंदोलन हाती घेतले होते. राम सातपुतेनी महाराष्ट्रातून या आंदोलनात उडी घेतली.

राष्ट्रीय पातळीवर देखील त्याच्या नावाची चर्चा होऊ लागली. महाराष्ट्रात त्याने केलेले मजबूत संघटन याच कौतुक वरच्या पातळीवर देखील करण्यात आलं. कोणतीही राजकीय, जातीय, पैशाच पाठबळ नसतानाही त्याला भाजपच्या युवा मोर्च्याच प्रदेश उपाध्यक्ष पद देण्यात आले.

गेल्यावर्षी  झालेल्या भीमा कोरगाव आंदोलनानंतर नक्षलवाद व शहरी नक्षलवाद हा प्रश्न प्रामुख्याने माध्यमांमध्ये चर्चेत आला होता.

यावेळी राम सातपुतेनी याविषयावर सखोल अभ्यास केला. रामचं वक्तृत्व, त्याचा अभ्यास, सहज सोप्या भाषेत व्यक्त करण्याची क्षमता यामुळे संघ परिवारच्या वेगवेगळ्या कार्यक्रमात त्याला शहरी नक्षलवाद हा विषय मांडायची जबाबदारी देण्यात आली.

यातूनच त्याचे नेतृत्व घडत गेले. गेले काही दिवस विधानसभेसाठी राखीव मतदारसंघ असणाऱ्या माळशिरस मधून भाजपचे तिकीट कोणाला द्यायचे हे निश्चित होत नव्हते. मात्र स्वतः मुख्यमंत्र्यांनी आपल्या विश्वासातील असणाऱ्या या युवा नेत्याला तिकीट देऊन सगळ्यांना धक्का दिला. त्याचा फॉर्म भरण्यासाठी स्वतः विजयसिंह मोहिते पाटील हजर होते.

एकेकाळी त्यांच्याच कारखान्यामध्ये आठ वर्ष राम सातपुतेंचे आईवडील ऊसतोडणी कामगार होते. रामच्या उमेदवारीमुळे एक वर्तुळ पूर्ण होतंय.

आज ही त्याचे वडील गावात चपला शिवायचे काम करतात. तर त्याच्या आईला जिजाबाई सातपुते यांना आपला मुलगा आमदार होणार म्हणजे काय होणार हे माहित नाही. त्या म्हणतात,

“आमदाराने काय काम करायचं असतं हे मला माहित नाही. पण, लोक रामचं कौतुक करतात म्हणजे नक्कीच मोठं काम करणार असेल.”

रामच्या मागे कोणत्याही राजकीय घराण्याचे नाव नव्हते. निवडणूक लढवण्यासाठी पैसे वर्गणीतून गोळा करावे लागले. त्याच्यासाठी ही निवडणूक निश्चित सोपी नव्हती. पण स्वतः या भागात वाढला असल्यामुळे इथल्या दिनदलितांचे प्रश्न स्वतः अनुभवले असल्यामुळे लोकांचा पाठिंबा मिळवून राम सातपुते विजयी झाले.

हे ही वाच भिडू.