बाबासाहेबांच्या संघर्षपूर्ण लढ्यामागे रमाईंच्या त्यागाचा मोठा वाटा आहे

रमाबाई आंबेडकर यांचा जन्म दाभोळजवळील वंणदगावात एका गरीब कुटुंबात झाला. वडील दाभोळच्या बंदरावर हमाली करायचे. दुर्दैवाने रमाबाईंच्या डोक्यावरील आईवडिलांचं छत्र बालपणीच हरवलं.

वडील भिकू यांच्या निधनानंतर वलंगकर काका व गोविंदपुरकर मामा यांनी मुलांना घेऊन मुंबईला भायखळा मार्केटच्या चाळीत रहायला गेले. त्याकाळच्या प्रथेप्रमाणे बालवयातच त्यांचे सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या मुलाशी लग्न झाले.

तेव्हा त्यांना देखील ठाऊक नसेल की

आपला पती पुढे जाऊन अख्ख्या भारताचं भविष्य लिहिणारा महापुरुष डॉ. भीमराव आंबेडकर बनेल

भीमरावांना सगळे बाबासाहेब म्हणत. १९०७ साली बाबासाहेब मॅट्रिक झाले. मुंबईतील पोयबावडी येथील चाळीत ते राहण्यास गेले. बाबासाहेबांनी रमाईंना घरीच लिहायला-वाचायला शिकवले.

बाबासाहेबांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातुन राज्यशास्त्र व अर्थशास्त्राची पदवी पूर्ण केली. त्याकाळी दलित समाजातून आलेले ते पहिले पदवीधारक होते. पण फक्त पदवी पर्यंतचे शिक्षण आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करेल पण त्यापुढे घेतलेले उच्चशिक्षण संपूर्ण समाजाला दारिद्र्यातून बाहेर काढायला मदत करेल या उदात्त हेतूने बाबासाहेब प्रेरित झाले होते.

बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती घेऊन बाबासाहेब १९१३ साली शिक्षणासाठी अमेरिकेला गेले.

हा काळ रमाबाईंसाठी खूप कष्टाचा होता.  एकापाठोपाठ एक जवळच्या व्यक्तींच्या मृत्यू त्यांना पाहावे लागले.सासरे
रामजी मालोजी आंबेडकर व दीर आनंदराव यांचे निधन झाले होते. त्यामुळे कुटुंबाची सगळी जबाबदारी रमाईंवर पडली.

तिकडे बाबासाहेब अर्धपोटी उपाशी राहून १८-१८ तास अभ्‍यास करत होते.

रमाईंचा स्वभाव मितभाषी, दृढनिश्चयी आणि स्वाभिमानी होता. बाबासाहेबांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये त्यांचा परदेशातील शिक्षणाचा खर्च भागत नव्हता मग त्यांच्यावर इकडच्या प्रपंचाच्या अडचणी त्यांच्यावर लादणे रमाबाईंना पसंद नव्हते.

अशा खडतर स्थितीतही मनाची शांतता नि घरातील एकोपा अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी फार कष्ट सोसले.

बाबासाहेबांच्या अनुपस्थितीत त्यांच्या विधवा भावजयीला व तिच्या मुलाला त्यांनी अंतर दिले नाही. त्यांचे उत्तम प्रकारे पालन-पोषण केले. हालअपेष्टांतही कधी कुरकुर केली नाही. काटकसरीने संसार करून पतीच्या अभ्यासात अडचण येईल, अशी एकही गोष्ट त्यांनी केली नाही.

दीन-दलित समाजाचे भवितव्य सुधारण्यासाठी आपला पती कष्ट सोसतोय त्याचा वाटा आपणही उचलला पाहिजे या विचारांनी रमाबाई झिजल्या.

डॉ. बाबासाहेब परदेशातून शिक्षण घेऊन मुंबईला आले असता, त्यांच्या स्वागताला सर्व आंबेडकरी समाज मुंबई बंदरात आला. रमाईला नेसण्यासाठी चांगली साडी नव्हती म्हणून त्यांनी छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या सत्कारप्रसंगी दिलेला भरजरी फेटा नेसून बाबासाहेबांच्या स्वागतासाठी आल्या.

बाबासाहेबांनी दिनदलित समाजाला मानसन्मान व मानवी हक्क मिळावेत म्हणून सामाजिक न्यायाचा लढा उभारला.

त्यांनी सामाजिक कार्यासाठी जीवन वाहून घेतले होते. अशा परिस्थितीत रमाईंनी संसाराचा गाडा समर्थपणे चालवला. त्यांनी आपल्या पतीस मोलाची साथ दिली.

डॉ. बाबासाहेबांनी ‘बहिष्कृत कार्यकारिणी सभे’ची स्थापना करून पददलितांच्या स्वावलंबन, स्वाभिमान नि आत्मोद्धारासाठी वसतिगृहांची स्थापना केली. सोलापूर येथे पहिले वसतिगृह सुरू झाले. पुढे त्यांनी शिक्षणसंस्थाही सुरू केली.

एकदा रमाईंनी धारवाड येथील वसतिगृहास भेट दिली असता त्यांना तिथे अन्नधान्याचा तुटवडा दिसला.

मुलांना खायला एकही दाणा नव्हता. दुकानदाराचे वाणसामानाचे बिल थकले होते. क्षणाचाही वेळ न दवडता रमाईंनी हातातल्या सोन्याच्या बांगड्या वसतिगृह प्रमुखांकडे दिल्या. त्या मोडून त्यातून आलेल्या पैशांनी धान्य व आवश्यक ते सगळे सामान आणले. जेवणाची व्यवस्था करून मुलांना प्रेमाने जेवायला दिले.

असा प्रसंग पुन्हा येऊ नये, म्हणून त्यांनी पुढच्याही काही दिवसांची बेगमी होईल एवढे अन्नधान्य भरून ठेवले.

रमाईंच्या प्रेमाने, वात्सल्याने वसतिगृहातील सर्व मुले भारावून गेली. त्यांच्या कारुण्याचा ओलावा सगळ्यांनी अनुभवला.

रमाई दीन-दलितांच्या आई व बहुजनांच्या सावली झाल्या. सर्वांना आधार देण्याची रमाईंची वृत्ती होती. स्वत:ची सर्व स्वप्ने विसरून कुटुंबाच्या व समाजाच्या उज्ज्वल स्वप्नांना साकारण्यासाठी त्या शेवटपर्यंत झगडल्या.

ख्यातनाम गायक मिलिंद शिंदे म्हणतात,

“भुकेल्या मुलांची दशा पाहुनी, भुकेल्या मुलांची दशा पाहुनी, बांगड्या… सोन्याच्या रमान दिल्या काढुनी. धन्य रमाई | धन्य रमाई|

महासुर्याची सावली असणाऱ्या रमाबाईंनी आयुष्यभर झीज सोसली. प्रसंगी उपासमार सोसला. आपल्या सोन्यासारख्या मुलांचा मृत्यू पचवला. पण त्या आतून पोखरून गेल्या होत्या. त्यांचे आजारपण बळावले.

बाबासाहेबांनी अनेक प्रयत्न केले, त्यांच्या उशाशी तासनतास बसून शुश्रूषा केली पण रमाईंना ते वाचवू शकले नाहीत.

२७ मे १९३५ रोजी सकाळी ९ वाजता रमाईची प्राण ज्योत मावळली. सर्व परिसर आकांतात बुडाला. कोट्यवधी रंजल्या गांजल्याची रमाई माता त्यांना अंतरली होती.

थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा आपला ग्रंथ बाबासाहेबांनी आपल्या ‘प्रिय रामू’ला अर्पण केला.

अर्पणपत्रिकेत बाबासाहेबांनी लिहिले आहे की,

‘‘तिच्या हृदयाचा चांगूलपणा, मनाची कुलीनता आणि शीलाच्या पावित्र्यासह तिचे शालीन मनोधैर्य नि माझ्याबरोबर दु:ख सोसण्याची तिची तयारी अशा दिवसांत तिने मला दाखविली- जेव्हा मी नशिबाने लादलेला मित्रविरहित काळ चिंतेसह कंठीत होतो. या बिकट परिस्थितीत साथ देणाऱ्या रामूच्या आठवणींत कोरलेले हे प्रतीक…’’

आज आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध छाताडावर पाय पददलित समाज बाहेर येत आहे त्यांना सन्मानाने जगण्याचा हक्क मिळावा यासाठी डॉ बाबासाहेबांनी दिव्यासमान काम केलं पण त्या दिव्याची वात रमाई होती.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.