कॉम्रेड कृष्णा देसाईंच्या लहान पोराला संघाचे रामभाऊ म्हाळगी खेळवत बसलेले तेव्हाची ही गोष्ट.

भाजपचे द्रोणाचार्य म्हणून रामभाऊ म्हाळगी यांना ओळखले जाते. अभ्यासू, सुसंस्कृतपणा आणि साधेपणा हि रामभाऊ म्हाळगींची ओळख. रामभाऊ म्हाळगींची जडणघडण हि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात झाली. ते भारत स्वातंत्र होण्याच्या पुर्वी केरळमध्ये संघाचे प्रचारक म्हणून काम करत. त्याच काळात ब्रिटीश शासनाला विरोध करण्याबरोबर कम्युनिस्ट विचारांचा कट्टर विरोध करणं हे त्यांच सुत्र झालं.

जनसंघाची स्थापना झाल्यानंतर जनसंघाचे ते पहिले आमदार म्हणून विधानसभेत गेले होते. एकाच वेळी कॉंग्रेसी विचारसरणी आणि त्याच सोबत डाव्या विचारांना जोरदार विरोध करणं हीच त्यांच्या ओळख झाली होती. 

आत्ता दूसरे व्यक्ती म्हणजे कृष्णा देसाई.

परळ भागातून गिरणी कामगारांच्या मोठ्या पाठिंब्यावर कामगारांच्या हक्कांसाठी धडाडणारी तोफ. कृष्णा देसाई हे मुंबईच्या कामगार चळवळीच प्रतिक होते. कॉम्रेड कृष्णा देसाई हे मुंबईच्या लाखों कामगारांचा आवाज होते. 

हे दोघेही महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार. दोघेही विरोधी पक्षात. मात्र विचारसरणी भिन्न. दोघेही एकमेकांचे शत्रूच. एकवेळ कॉंग्रेस परवडली पण डावे नको अशा विचारांचे रामभाऊ म्हाळगी तर एकवेळ कॉंग्रेस परवडली पण हे  संघवाले नको म्हणणारे कॉंम्रेड कृष्णा देसाई. अस ते समीकरण. 

दोघेही विरोधी बाकावर बसत. रामभाऊ म्हाळगी यांच्या बरोबर मागच्या बाकावर कृष्णा देसाई बसत. तितकाच साधा सरळ आणि विचारसरणीच्या पलीकडे माणूस असतो हे सांगणारा. 

नागपूरमध्ये १९६६ साली हिवाळी अधिवेशन भरलं होतं.

या अधिवेशनाला कृष्णा देसाई आपल्या सहा वर्षाच्या लहान मुलाला घेवून आले होते. नेमकी त्याच दिवशी कृष्णा देसाईंनी सभागृहात लक्षवेधी मांडली होती. आत्ता मुलाला घेवून सभागृहात जाण शक्य नव्हतं. तिकडे अधिवेशन काळात मांडलेल्या लक्षवेधीची वेळ झाली होती. 

तेव्हा विरोधी दालनात समोर रामभाऊ म्हाळगी बसले होते. दालनात रामभाऊ बसलेले पाहून कॉम्रेड कृष्णा देसाईंनी रामभाऊंना हाक मारली, अरे हिकडं ये. 

कृष्णा देसाई म्हणाले, 

‘ए रामभाऊ, सभागृहात माझी लक्षवेधी आहे. माझ्या मुलाला सांभाळ. मी लक्षवेधी करून येतो..’

त्यानंतर ते सभागृहात गेले तर इकडे रामभाऊंवर कम्युनिस्ट नेत्याच्या मुलाला खेळवण्याची वेळ आली. सभागृहात लक्षवेधी चाळीस मिनीट चालली. लक्षवेधी संपल्यानंतर कृष्णा देसाई बाहेर आले आणि रामभाऊंना शोधू लागले.

तेव्हा परिसरातल्या लॉनवर आपल्या लहान मुलासोबत लहान मुलासारखेच खेळत असलेले रामभाऊ त्यांना दिसले. खूप काळ त्या दोघांना खेळताना पाहून कृष्णा देसाई लांबवर उभा राहून ते दृश्य पहात बसले. ही तेव्हाची गोष्ट होती आणि हे तेव्हाच राजकारण होतं. विरोध विचारांना म्हणता म्हणता विरोध माणसांना होवू लागला, पण तेव्हाची गोष्ट वेगळीच होती. 

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.