नारायण राणेंपाठोपाठ रामदास कदम ही काँग्रेस मध्ये जाणार होते.

दसरा मेळाव्यानंतर शिवसेनेचे रामदास कदम खूपच चर्चेत आलेत. चर्चेत येण्यासारखा विषय केला  व्यक्ती चर्चेत येतो. चर्चा अशी आहे कि, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामदास कदमांना शिवसेनेतून नारळ दिला जाणार आहे.

पण आज ज्या रामदास कदमांना सेना नारळ देऊ शकते ते रामदास कदम कधीकाळी नारायण राणेंसोबत काँग्रेस मध्ये जाणार होते. त्याचाच हा किस्सा नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे यांनी सांगितलाय. 

सेनेत पक्ष शिस्तीला खूपच महत्व आहे. आणि पक्ष शिस्त मोडणाऱ्या किंवा पक्षाविरुद्ध कारवाया करणाऱ्या व्यक्तीला नेतृत्वाबरोबरच शिवसैनिकांच्या रोषालाही सामोरं जावं लागतं. याची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. यातलं एक उदाहरण म्हणून नारायण राणेंकडे ही बघता येईल.

नारायण राणे हे एकेकाळी शिवसेनेचे फायरब्रँड नेते होते. शाखाप्रमुख, नगरसेवक, तीन वर्षे बेस्ट समितीचे अध्यक्षपद, मंत्रीपद आणि नंतर थेट मुख्यमंत्रिपद असा राणेंच्या कारकिर्दीचा चढता आलेख होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत मर्जीतील नेते म्हणून नारायण राणे ओळखले जायचे. पण याचा अर्थ तेव्हाही नारायण राणेंसाठी शिवसेनेत सर्व आलबेल होते असं नाहीये. अंतर्गत धुसफूस होतीच. ती धुसफुशीला ही बरीच मोठी पार्श्वभूमी आहे.

१९९५ साली राज्यात युतीची सत्ता आली तेव्हा शिवसेनेत उघडउघड दोन गट होते. एकीकडे उद्धव ठाकरे, मनोहर जोशी आणि सुभाष देसाई होते. तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरे, नारायण राणे आणि स्मिता ठाकरे. वाद होतेच, पण २००४ साली नारायण राणे विरोधी पक्षनेते होते. ते परदेशात गेले होते. ते परत आले तेव्हा त्यांच्याविरोधातली नाराजी विकोपाला गेली होती आणि राणेंचीही पक्षातली घुसमट वाढली होती.

त्यातून २००५ साली नारायण राणेंनी शिवसेनेला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

पण नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडण्याआधी सेनेतून काँग्रेस मध्ये जाणाऱ्या आमदारांची यादी तयार करण्याचं काम चालू होत. त्यावेळी सेना सोडून काँग्रेस मध्ये येणाऱ्या आमदारांच्या लिस्ट मध्ये रामदास कदमांचं नाव पहिल्या क्रमांकावर होत.

रामदास कदमांची ओळख म्हणजे बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक अशी होती. बाळासाहेबानंतर रामदास कदम हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळचे होते. ठाकरे यांच्यासोबत खास राजकीय संबंध असलेल्या नेत्यांमध्ये कदम हे नाव महत्त्वाचे होते.

रामदास कदमांना शिवसेनेतून जाण्यासाठी सुद्धा एक पार्श्वभूमी होती.

२००४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेला अपयश आल्याने नारायण राणे यांच्याकडेच विरोधी पक्षनेते पदाची सूत्रे आली. पण दरम्यानच्या काळात राणे यांना विरोधी पक्ष नेतेपदावरून दूर करण्याच्या हालचाली सेनेतील काही राणे विरोधकांनी सुरू केल्या. हा प्रकार आधीच लक्षात आल्याने नारायण राणे यांनी स्वत:च २००५ साली विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला.

त्यांनी हे पद सोडल्यानंतर या पदासाठी शिवसेना नेत्यांनी शोधाशोध सुरू केली आणि त्यांच्या हाती खेडचे रामदास कदम लागले. १९९० साली शिवसेनेची सत्ता येणे अगदी थोडक्यात हुकले होते. पण १९९५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र शिवसेनेच्या ताब्यात महाराष्ट्राची सत्ता आली. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी मंत्रिमंडळ रचनेचे काम सुरू केले. या रचनेत त्यांनी दत्ताजी साळवींपासून भल्याभल्यांचे पत्ते कापले होते. रामदास कदम यांनाही मंत्रिमंडळात घेण्याची त्यांची बिलकूल इच्छा नव्हती.

कदमांना एखादे महामंडळ देऊन त्याच्या अध्यक्षपदी त्यांची वर्णी लावावी, असा विचार करून पेट्रोलियम महामंडळाचे अध्यक्ष म्हणून रामदास कदम यांचे नावही घोषित केले होते. पण रामदास कदमांनी बाळासाहेबांकडे मंत्रिपदासाठी तगादाच लावल्याने अखेर अन्न आणि नागरीपुरवठा या खात्याचे राज्यमंत्रीपद रामदास कदम यांना देण्यात आले. पुढे मनोहर जोशी यांचे मुख्यमंत्रीपद गेले. नारायण राणे मुख्यमंत्री झाले. त्यांच्याही मंत्रिमंडळात कदमांचे राज्यमंत्रीपद कायम होते. त्यानंतर १९९९ साली शिवसेनेची सत्ता गेली.

सेनेत कदमांची ही घुसमट वाढतच चालली होती. अशात कदमांनी नारायण राणेंसोबत काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळेच राणेंना सांगितलं,

कि दादा मी खेडमध्ये जातो आणि कार्यकर्त्यांशी बोलतो. नंतर आपण बॉम्ब टाकुयात. 

असं सांगून कदम शासकीय बंगल्यावरून बाहेर पडले. पण आयत्यावेळी कदम यांना फोन आला आणि विरोधी पक्षनेते पद देण्यात येईल असं सांगण्यात आलं. तोपर्यंत नारायण राणे यांच्याकडे निघालेले कदम महाडजवळून माघारी परतले. आणि त्यांनी मातोश्रीवर जाऊन पद स्वीकारलं.

आणि आज पुन्हा एकदा रामदास कदम नाराज आहेत अशा चर्चा आहेत. यामुळं पुढं जाऊन रामदास कदमांनी शिवसेना सोडली काय आणि सेनेने त्यांना नारळ दिला काय, याविषयी फार मोठं औत्सुक्य राहील असं वाटत नाही.

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.