स्वत:च नाव आझाद, वडिलांच नाव स्वतंत्र आणि पत्ता जेल सांगणाऱ्या, आझादांची शौर्यकथा.

२७ फेब्रुवारी १९३१, अलाहाबादचे आल्फ्रेड पार्क उद्यान. चंद्रशेखर आझाद आपल्या एका साथीदाराबरोबर सुखदेव राज यांच्यासोबत एका मित्राची वाट पहात होते. पण दुर्दैवाने तो मित्र पोलिसांचा खबरी निघाला. अख्ख्या त्या उद्यानाला इंग्रज पोलिसांनी वेढा घातला होता. आता काय करायचे हा प्रश्न सुखदेव राज यांना पडला. तेव्हा चंद्रशेखर  आझाद  उद्गारले,

“दुश्मन की गोलीयोकां हम सामना करेंगे. हम आझाद है आझाद ही रहेंगे. “

त्यांनी सुखदेवला तेथून पळून जायला सांगितले. त्याचा जीव वाचवा म्हणून पोलिसांना रोखण्यासाठी तिथेच थांबण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. इंग्रजांशी लढण्यासाठी हातात एकच पिस्तुल , जवळ अगदी थोड्या गोळ्या आणि भारतमातेसाठी काहीही करण्याची जिद्द एवढी सामुग्री त्यांना बस होती. झाडाच्या मागे उभे लपून त्यांनी पोलिसांच्या गोळ्यांना प्रत्युत्तर द्यायला सुरवात केली.

पोलिसांची संपूर्ण फोर्स त्यावेळी अल्फ्रेड पार्कच्या बाहेर हजर होती. अत्याधुनिक बंदुकामधून जोरदार गोळीबार सुरु होता. गोळीबार कसला गोळ्याचा पाऊस सुरु होता. आसपासच्या नागरिकांना कळत नव्हत की नेमकं कोणाविरुद्ध कारवाई चालू आहे. आतून ही रिप्लाय येत होता. सीआयडीचे पोलीसप्रमुख जातीने या मोहिमेचे नेतृत्व करत होते.

काही वेळानी आतून गोळ्याचा आवाज येणे बंद झाले. कोणीतरी आत जाऊन पाहणे गरजेचे होते पण कोणाही पोलीस शिपायाचे धाडस होईना. अखेर कसे तरी पोलीस चंद्रशेखर आझाद यांच्या जवळ जाऊन पोहचले. तेव्हा दिसलं,

आझाद यांनी स्वतःला आपल्या पिस्तुल मधली शेवटची गोळी मारून घेतली होती.

चन्द्रशेखर आझाद याचं खर नाव चन्द्रशेखर तिवारी. वयाच्या १४ व्या वर्षी जालियनवाला बाग हत्याकांड याच्या विरुद्ध आंदोलन केलं म्हणून त्यांना पहिल्यांदा जेल झाली होती. त्यावेळी कोर्टातल्या मॅजीस्ट्रेटनी त्यांना विचारलेल्या प्रश्नांना छोटा चंद्रशेखर म्हणाला होता,

“मेरा नाम आज़ाद है, पिता का नाम स्वतंत्र और पता जेल है”

गांधीजीनी पुकारलेल्या असहकार आंदोलनात ते सहभागी झाले. पण चौरीचौराच्या घटनेमुळे गांधीजीनी आंदोलन मागे घेतले याचा त्यांना राग आला. त्याचवेळी देशाला स्वतंत्र करण्यासाठी सशस्त्र क्रांती हाच एकमेव उपाय असल्याचं त्यांच्या लक्षात आल. रामप्रसाद बिस्मिल यांच्या हिंदुस्तान रिपब्लिक असोशिएशनशी ते जोडले गेले. त्यांच्या सोबत एकोणिस वर्षाचे आझाद काकोरीच्या रेल्वे लुटीमध्ये सहभागी झाले.

पुढे काही वर्षांनी भगतसिंग आणि चंद्रशेखर यांनी हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशनची एचआरए चे पुरुजीवन हिंदुस्तान रिपब्लिक सोशालीस्ट आर्मी या डाव्या विचारांच्या संघटनेमध्ये केले. गांधीजींच्या विचारांनी देशाला स्वातंत्र्य मिळवणे यास बराच उशीर लागणार आणि ब्रिटिशासारख्या जुलमी सत्तेला त्यांच्याच भाषेत उत्तर देणे गरजेचे आहे असे या क्रांतिकारकांच मत होत. त्यांची एकच घोषणा होती,

“इन्कलाब जिंदाबाद “

लाला लजपतराय यांच्या मृत्यूनंतर त्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी आणि भगतसिंगने इंग्लिश अधिकारी सोंडर्सला गोळ्या घातल्या. चंद्रशेखर आझाद हे बहुरूपी म्हणून ओळखले जायचे. ते नेहमी म्हणायचे मी इंग्रजांना सापडण्यापेक्षा मरण पत्करेन. आणि शेवटला खरोखर तसेच घडले.

फाशीची शिक्षा झालेल्या भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या सुटकेसाठी प्रयत्नात आझाद होते. याच निमित्ताने ते नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी अलाहाबादला आले होते. याच दरम्यान एका साथीदारानी केलेल्या गद्दारीमुळे ते इंग्रजांच्या तावडीत सापडले. पण त्यावेळी ही आपल्या प्रतिज्ञेला अनुसरून देशासाठी त्यांनी आत्मत्याग केला पण गोऱ्या सोजीरांच्या हातात जिवंतपणे सापडले नाहीत.

शेवटच्या श्वासापर्यंत ते आझादच राहिले.

चंद्रशेखर आझाद यांच्या मृत्यूची बातमी लोकांना कळल्यावर असंतोष पसरेल याची इंग्लिश अधिकाऱ्यांना कल्पना होती. यामुळेच गडबडीत त्यांचा  रसुलाबाद घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आला.

पण जेव्हा अलाहाबादच्या लोकांना हे कळाले तेव्हा तिथे जोरदार आंदोलन करण्यात आले. सर्वत्र आक्रोश होता.पंडीत नेहरूंच्या पत्नी कमला नेहरू या आंदोलनात सर्वात पुढे होत्या. आझाद यांनी ज्या वृक्षाखाली आपले प्राण सोडले तिथे लोक पूजा करत होते. भारतमातेचा हा लाडका सुपुत्र वयाच्या चोविसाव्या वर्षी पूर्ण देशाला स्वाभिमान शिकवून गेला होता.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.