हा केटलब्रो भिडू अंपायर असला की, भारत खरंच हरतोय का?

आमच्या मंडळात एक कार्यकर्ता आहे, त्याचं टोपण नावाय ‘पनौती.’ या भिडूला आम्ही ‘गोवा प्लॅन’ ग्रुपमध्ये ॲड करतो आणि आमचा प्लॅन दरवेळी कॅन्सल होतो. हा कार्यकर्ता क्रिकेट खेळायला आला की, पाऊस पडतो. थोडक्यात हा जिथं असंल तिथं आमची रम्मी काय लागत नाही. पण कसाही असला तरी तो आमचा दोस्त आहे आणि कायम राहील.

आपले दोस्त आपणच बदलू शकत असलो, तरी आम्ही पनौतीला काय ग्रुपमधून काढणार नाही. काढायचंच असलं तर आम्ही एका अंपायरला काढू. कारण तो भिडू विकेटपाशी उभा राहिला की भारताची क्रिकेट टीम मेन मेन मॅचमध्ये हरत्या. मग उगाच जगजीत सिंग ऐकायला लागतो.

सणसूद तोंडावर आल्यात तर कशाला त्याची आठवण काढायची?

हा प्रश्न तुम्हाला पडला असणारच. पण कसंय सध्या वर्ल्डकप सुरूये आणि भारताची मॅच आहे न्यूझीलंड विरुद्ध. ही मॅच भारताला जिंकणंच जिंकणं आहे. सकाळ सकाळ पाहिलं, तर अंपायरची नावं होती मराईस इरॅसमस आणि रिचर्ड केटलब्रो.

रिचर्ड केटलब्रोचं नाव वाचलं आणि डायरेक्ट टेन्शन आलं.

आता तुम्ही विचाराल का? कारण अगदी सोपं आहे भिडू. भारत लास्ट टाईम कुठल्या टूर्नामेंटमध्ये जिंकला? चॅम्पियन्स ट्रॉफी, २०१३. त्यानंतर भारत कुठं कुठं हरला ते वाचा.

२०१४ टी२० वर्ल्डकप- फायनल, २०१५ वर्ल्डकप- सेमीफायनल, २०१६ टी२० वर्ल्डकप- सेमीफायनल, २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी- फायनल, २०१९ वर्ल्डकप- सेमीफायनल, २०२१ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप- फायनल.

थोडक्यात प्रत्येकवेळी भारत नॉकआऊट मॅचमध्येच हरलाय. आता या सगळ्यात केटलब्रोचा काय विषय. तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल सोडली, तर बाकीच्या सगळ्या मॅचेसमध्ये केटलब्रो भिडू ऑनफिल्ड अंपायर होता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीव्ही अंपायर म्हणून तो निर्णय देत होताच.

आता न्यूझीलंड विरुद्धची मॅच भारतासाठी करो या मरो आहेच. त्यात हा बाबा ऑनफिल्ड अंपायर म्हणल्यावर आमच्या आतल्या अक्षय कुमारला आतापासूनच धकधक व्हायला लागलंय.

आता केटलब्रो विषयी थोडं सांगतो

रिचर्ड केटलब्रो हा इंग्लिशमन. आयुष्याची जवळपास ५० वर्ष पूर्ण झालेला हा भिडू इंग्लंडकडून फर्स्ट क्लास क्रिकेट खेळलाय. टॉप ऑर्डर बॅटर आणि कधीतरी पेस बॉलिंग करणारा केटलब्रो ३३ फर्स्ट क्लास मॅचेस आणि २१ लिस्ट ए मॅचेस खेळलाय.

अंपायर म्हणून हा भिडू लई भारी आहे यात वादच नाही. गडी आतापर्यंत ९९ टेस्ट, १३९ वनडे आणि ३७ टी२० मध्ये अंपायर होता. मुलींच्या सात मॅचेसमध्येही केटलब्रोनं अम्पायरिंग केलंय.

आता आणखीन एक महत्त्वाचा विषय. भारत काय अंपायरमुळं हरत नाही. आपली बॅटिंग, बॉलिंग कुठं तरी कमी पडत्या. त्यामुळं केटलब्रोच्या मस्करी पुरतं ठीकाय, उगा त्याच्या नावानं बोटं मोडू नका. आता पाकिस्ताननं आपल्याला हरवलं याचा अर्थ काय? इतिहास बदलतोय. त्यामुळं केटलब्रो असला तरी भारत फिक्स मॅच जिंकू शकत असतोय.

फक्त पोरं जरा क्वालिटी क्रिकेट खेळली म्हणजे झालं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.