भावांनो नवी एनफिल्ड आल्या, पण घ्यायचा विचार करण्याआधी हे बघा…

बाईकचा लई नाद नसलेल्या लोकांनाही रॉयल एनफिल्डबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर असतो. बुलेट म्हणलं की भारी वाटतं. गेले काही दिवस रॉयल एनफिल्डच्या सोशल मीडियावर एकच दंगा सुरू होता, की बाबा आमची नवी गाडी येणार.

लई दिवस ताणल्यानंतर ही गाडी मार्केटमध्ये आली. लुकच्या बाबतीत नाद, स्पेसिफिकेशन पण वाढीव आणि किंमतीचं म्हणाल तर बजेटमध्ये बसत्या, नाव रॉयल एन्फिल्ड हंटर ३५०.

भले आपल्याकडे गाडी असली, तरी रॉयल एन्फिल्डची नवी गाडी आलीये म्हणल्यावर जरा खिसा हलका करायची इच्छा होते. नव्यानं दणका उडवायचा असला तर विषयच संपला, त्यामुळं खास शौकीन आणि इच्छूक उमेदवारांसाठी या गाडीचे स्पेसिफिकेशन्स, मॉडेल्स, किंमत आणि याच बजेटमध्ये येणारे दुसरे पर्याय बघुयात.

सुरुवात अर्थातच हंटरपासून, सगळ्यात आधी डोळ्यात काय भरतं तर दिसणं.

WhatsApp Image 2022 08 11 at 2.23.00 PM
Hunter 350

गाडी दिसायला टिपिकल बुलेटसारखी अजिबात नाही, पण तगडी नसली तरी देखणी आहे. हंटर ३५० चा लूक काहीसा कॅफे रेसरसारखा आहे. हंटर ३५० ही ८ कलर्समध्ये ॲव्हेलबेल आहे आणि रेट्रो फॅक्टरी, मेट्रो डॅपर, मेट्रो रेबेल असे ३ मॉडेल्सही आहेत.

आता वळूयात स्पेसिफिकेशन्सकडे, गाडीच्या नावातच आपल्याला इंजिन किती सीसीचं असेल याचा अंदाज येतो. हंटर रॉयल एन्फिल्डच्या ३५० सेगमेंटमधली बाईक आहे, ज्याचं इंजिन ३४९ सीसीचं आहे. आपल्याला वाटतं गाडी क्लासिक ३५० सारखी आहे. पण बघायला गेलं तर दोन्हीत तसा फरक आहे. हंटर क्लासिकपेक्षा वजनानं १४ किलोनं कमी आहे. 

गाडीला ५ गिअर आहेत, २०.२ बीएचपी आणि २७ चा टॉर्क आहे. गोल हेडलाईट, सिंगल पीस सीट यामुळं लूक थोडासा जावा सारखा दिसतो हेही तितकंच खरं.

आता हातात रॉयल एन्फिल्डचं ऍक्सिलेटर आहे, कानावर नाद फायरिंग पडतंय आणि गाडी बुंगवली नाही तर काय मजा ? 

पण कसंय गाडी बुंगवायची असेल, तर सगळ्यात महत्त्वाचे आहेत ब्रेक. हंटर ३५० च्या मेट्रो मॉडेलमध्ये ड्युअल डिस्क ब्रेक आणि ड्युअल चॅनेल ABS आहेत. तर रेट्रो मॉडेलमध्ये पुढं डिस्क ब्रेक, मागं ड्रम ब्रेक आणि सिंगल ABS आहे. तिन्ही मॉडेल्सला इलेक्ट्रिक स्टार्ट आहे, किक मारायला लोड येणाऱ्यांची काळजी घेण्यात आलेली आहे. 

गाडी दिसायला भारी, पळायला भारी असली, तरी मेन मुद्दा किंमतीचा असतोय. 

जर हंटर ३५० रेट्रो फॅक्टरी घायची म्हणाल, तर एक्स शोरूम प्राईजनुसार दीड लाखाला पडेल. जर मेट्रो डॅपर घ्यायचा विचार केलात, तर एक लाख ६३ हजार ९०० रुपये फक्त. आता राहतंय शेवटचं मॉडेल, मेट्रो रेबेल जी तुम्हाला पडू शकते एक लाख ६८ हजार ९०० रुपयाला. म्हणजे नाही म्हणलं तरी सगळी दुनियादारी आणि मित्रांना पार्टी धरुन पावणेदोन लाखापर्यंत मेट्रो मॉडेलचं बजेट जातंय.

याच बजेटमध्ये येणाऱ्या मार्केटमधल्या इतर गाड्या बघुयात. 

कॉम्पिटीशनमध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं जावा 42 चं. 

WhatsApp Image 2022 08 11 at 2.24.54 PM
Jawa 42

दोन्ही गाड्या दिसायला जवळपास सारख्याच आहेत. जावा २९३ सीसी, २७ बीएचपी, ६ गिअर आणि टॉपस्पीड १३० असल्यानं हंटरला काही प्रमाणात मागं टाकते. मेन विषय राहतो किंमतीचा, तर जावा 42 ची एक्स शोरूम प्राईझ पावणे दोन लाखापर्यंत जाते. म्हणजे मेट्रो रेबेलमध्ये थोडे पैसे टाकले, तर जावा आलीच.

 पुढचा ऑप्शन आहे होंडा हाईनेस सीबी ३५० चा. 

WhatsApp Image 2022 08 11 at 2.26.12 PM
Honda H’ness CB350

याचं डीएलएक्स मॉडेल घेतलं, तर गणित अगदी हंटरच्या मापात बसतंय. ३४८ सीसीचं इंजिन, २० बीएचपी, ३० चा टॉर्क, ५ गिअर, टॉप स्पीड १२५ असे जवळपास हंटर सारखेच फीचर्स असले, तरी गाडीची किंमत जाते १ लाख ९८ हजार, त्यात डीएलएक्स हे सगळ्यात बेसिक मॉडेल आहे. त्यामुळं होंडाचाच हट्ट असेल, तर या गाडीचा विचार करु शकताय.

हंटर ३५० ला शर्यत म्हणून आणखीन एक दावेदार आहे तो म्हणजे टीव्हीएस रॉनिन. 

WhatsApp Image 2022 08 11 at 2.26.57 PM
TVS Ronnin

हंटरच्या रेट्रो मॉडेलपेक्षा रॉनिनच्या सिंगल चॅनेल ABS मॉडेलची किंमत हजारेक रुपयानं स्वस्त आहे. २०० सीसीचं इंजिन वगळता बाकी फीचर्स हंटरच्या रेट्रो मॉडेलसारखेच आहेत. पण हेच रॉनिनच्या ड्युअल चॅनेल ABS मॉडेलची तुलना ड्युअल चॅनेल ABS असलेल्या हंटर ३५० च्या हायएन्ड मेट्रो रेबेलशी केली, तर एक्स शोरूम प्राईजच्या गणितानुसार रॉनीन अगदी २५० रुपयांनी स्वस्त आहे. १९ चा टॉर्क, २२६ सीसीचं इंजिन या फीचर्समुळं मेट्रो रेबेल रॉनीनला भारी पडते.

हंटर ३५० सकट एकूण ४ पर्याय सांगितलेत, रॉयल एन्फिल्डचे दिवाने असाल आणि क्लासिक, हिमालयन, मिटीऑर सोडून दुसरा पर्याय बघत असाल, तर हंटरचा विचार करा आणि रॉयल एन्फिल्ड सोडून दुसरी गाडी घ्यायची असेल तर इतर पर्याय आहेतच. 

हेल्मेट घालून टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि गाडीचं नक्की झालं की पेढे तेवढे द्यायला या.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.