आणि तेव्हा तो ठरला वनडेत हा पराक्रम करणारा पृथ्वीवरचा पहिला माणूस, अंहं ‘देव’ !!!

आज २४ फेब्रुवारी.. दोन महिन्यांनी याच तारखेला त्याचा वाढदिवस असतो. पण आजच्या तारखेला ११ वर्षांपूर्वी त्यानं जे केलं ते निव्वळ अचाट होतं.

ग्वाल्हेरमध्ये आपली साऊथ आफ्रिकेविरुद्ध मॅच सुरु होती, ४५ वी ओव्हर संपली तेव्हाच तो १९१ वर पोचला होता, सगळा देश त्याची बॅटिंग श्वास रोखून बघत होता, पण त्याला बहुतेक काही गडबड नव्हती. तशीही त्याला नव्वदीत आला की कधी गडबड नसायची असं काहीजण उगाच म्हणायचे त्याच्याबद्दल, आता तर तो एकशे नव्वदीत होता.

आपल्यापैकी त्याच्याशिवाय कपिल, गांगुली, धोनी यांनीच काय तो वनडेत पावणे दोनशेचा टप्पा त्याआधी पाहिला होता. पण १९० चा टप्पा गाठणारा तो पहिलाच भारतीय बॅट्समन.

अजूनही तो काळ असा होता की कुणी वनडेत १९० पार केलं की तो दात विचकत खेळणारा पाकिस्तानी ओपनर आठवायचा. होय, भारतीयांना एक कायमची भळभळणारी जखम करूनच ठेवली होती त्याने.

कुंबळेच्या ४१ व्या ओव्हरला २४ रन्स ठोकणारा तो सईद अन्वर १९९७ सालीच १९४ करून तेरा वर्ष तो रेकॉर्ड मिरवत बसला होता, तेव्हा ती मॅच दोन कारणांसाठी जखम करून गेली होती – एक कुंबळेला सलग तीन सिक्स खाताना कधी पाहिलं नव्हतं, मॅचभर दमलोय दमलोय असं दाखवत सतत खाली बसणाऱ्या, पाणी मागवणाऱ्या, आपली निम्मी इनिंग आफ्रिदीचे पाय घेऊन पळणाऱ्या अन्वरने ती दुखरी नस दाबली होती आणि दुसरं म्हणजे नंतर उत्तर देताना द्रविडचं पहिलं वनडे शतकही त्याच मॅचमध्ये झालं जी अन्वरने आधीच खाऊन टाकली होती, पर्यायाने द्रविडला दुसऱ्याच्या इनिंगमुळे झाकोळला जाण्याच्या सवयीची सुरुवात करून दिली होती.

चार्ल्स कॉव्हेन्ट्रीने २००९ ला १९४ करत बरोबरी साधली होती, पण वनडेत अजून २०० कुणीच केलं नव्हतं. आज तो पराक्रम होणार का याकडे सगळ्यांचे डोळे लागले होते.

आज तसाही मूड जरा वेगळाच दिसत होता त्याचा. मॅच सुरु होताच दुसऱ्याच ओव्हरला पार्नेलला सलग दोन सणसणीत चौकार मारत त्याने इरादे स्पष्ट केले होते. आणि मग आपले इरादे किती जास्त स्पष्ट आहेत हे त्यानं ३७ बॉल्समध्ये ५०, मग ९० मध्ये १००, ११७ मध्ये १५० असं टप्प्याटप्प्याने करत स्टेन, पार्नेल, कॅलिस, लान्गव्हेल्ड, मर्व्ह वगैरे सगळ्यांनाच दाखवून दिलं होतं.

आणि आता तर काय निवांत पाच ओव्हर्स बाकी होत्या, त्याने ऑलरेडी २५ फोर्स आणि ३ सिक्स मारले होते. रन अ बॉल खेळला असता तरी उरलेल्या तीसपैकी नऊ बॉल्स तर त्याला सहज खेळायला मिळणार होतेच, फक्त तो जरा दमल्यासारखा वाटत होता म्हणून चुकून आउट होऊ नये इतकीच प्रार्थना देश करत होता.

पाच ओव्हर्स बाकी असताना जोडीला १३ बॉल १७ वर खेळणाऱ्या धोनीने मग एकदम टॉप गियर टाकला आणि धुलाई सुरु केली. त्या नादात तो जरा जास्तच बुडून गेला बहुतेक, कारण पुढच्या चार ओव्हर्समध्ये इकडे दुसऱ्याच्या वाट्याला फक्त आठ बॉल्स आले, त्यात त्याने आठ रन्स करून देशाला १९९ वर धडधडत ठेवलं होतं. पैकी ४९ वी ओव्हर तर पूर्ण धोनीनेच खेळली. म्हणजे साहेब ४८ नंतर १९९ आणि ४९ नंतर पण १९९ च.

आता देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रार्थनेच्या आधी प्रीफिक्स म्हणून धोनीला चार शिव्या जाऊ लागल्या,

‘त्याला स्ट्राईक दे रे, किती खेळशील तूच’, ‘१७ मारलास ना स्टेनला ४९ व्या ओव्हरला, आता ५० व्याला पण आधी स्ट्राईक घेऊन बसलायस होय रे’, पासून ‘आम्ही तुझं काय बिघडवलंय रे, का असं करतोयस’, किंवा ‘अरे तो नॉन स्ट्रायकर एन्डला गेल्या चार ओव्हर्स शांत उभा आहे ना, त्यानेच तुला कॅप्टन करायला रिकमेण्ड केलं होतं, आठवतंय ना’ किंवा अगदी ‘च्यायला हे परप्रांतीय असलेच, असंच करतात मराठी माणसाला, राज ठाकरेंचं बरोबरच आहे’ वगैरे सगळं करोडो मनात आणि काही घरात उघडपणे सुरु झालं होतं.

सर्वांची अपेक्षा होती की आता शेवटच्या ओव्हरला तरी माही पहिल्याच बॉलवर एक रन काढून ऑफ-स्ट्राईक जाईल. तर या माणसाने काय करावं.. बोलर लान्गव्हेल्डला लॉन्ग ऑफच्या मागचे प्रेक्षक दाखवले. सिक्सचा आनंद आणि पहिल्यावहिल्या डबल सेंच्युरीची हुरहूर एकाचवेळी. दुसऱ्या बॉलवर मात्र कॅप्टन शहाण्या बाळासारखा वागला, डीप मिडविकेटला प्लेस करून एक रन पळाला, आमलाची मिसफिल्ड झाली, पण इकडे दोघांनीही दुसरी रन पळायची नाही यावर डोळ्यातल्या डोळ्यात सह्या केल्या होत्या.

आणि मग तिसरा बॉल..

लान्गव्हेल्ड आला पळत पळत.. बॉल हातातून रिलीज झाला तेव्हाच कळलं की फुल लेन्थ दिला गड्यानं. हेच तर पाहिजे होतं. ‘त्याने’ अगदी शांतपणे पॉईंटला बॉल प्लेस केला आणि एक रन घेतली. शांतपणे हेल्मेट काढलं, बॅट उंचावत नेहमीसारखं वर आकाशात पाहिलं.

पण ती एक रन साधीसुधी नव्हती, त्या एका रनने त्या मॅचपुरता चमत्कार नव्हे तर कायमचाच इतिहास घडवला होता.

अशीच एक रन त्यापूर्वी ३८ वर्षे १९७२ साली आणि ऑगस्टच्या २४ तारखेलाच इंग्लंडच्या डेनिस एमिसने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ओल्ड ट्रॅफोर्डवर घेतली होती आणि जगाने पहिली वनडे सेंच्युरी पाहिली होती. पण आजच्या २४ ला खेळणारा हा जो कुणी इंडियन कोहिनूर होता तो नेहमीच त्याच्या चाहत्यांचा, प्रेक्षकांचा आनंद आणि बोलर्सची डोकेदुखी द्विगुणित करण्यासाठी प्रसिद्ध होता. म्हणून त्याने तो थ्री फिगर्सचा फंडाही द्विगुणित केला आणि शतकाचं चक्क द्विशतक केलं.. तेही वनडेत.

तो हे काहीतरी अशक्य करून बसला होता. (पुढे आणखी काहींनी ते शक्य केलंही.. पण शेवटी पहिलं प्रेम ते पहिलं प्रेम.. “पहिलं” म्हणूनच खास)

कॉमेन्टरीला अशा महत्त्वाच्या भारतीय मॅचच्या अविस्मरणीय क्षणांच्या वेळी बोलण्याचं कंत्राट घेऊन बसलेला आणि एकेकाळी कॅमेऱ्यासमोर नाक न कुरतडणारा, गांगुलीवर न जळणारा तेव्हाचा रवी शास्त्री होता. त्याचं त्यावेळचं ते वाक्य मनावर कायमचं कोरलं गेलं ते त्यातल्या एका उत्स्फूर्त शब्दासाठी

“गेट्स इट.. फर्स्ट मॅन ऑन द प्लॅनेट टू रिच टू हंड्रेड अँड इट्स अ सुपरमॅन फ्रॉम इंडिया — साssचिन तेंडुलकर.. टू हंड्रेड फ्रॉम वन फोर सेव्हन.. टेक अ बो मास्टर”

आयला तो डायरेक्ट ‘प्लॅनेट’ म्हणाला होता राव, कसलं भारी वाटलं.. या ग्रहावर असं काहीतरी आहे जे फक्त आपल्या भारतीयांकडे आहे.. ओह व्हॉट अ फिलिंग यार!!! किंवा टोनी ग्रेगबाप्पाच्या भाषेत ‘ओह.. वॉटा प्ल्याss’

देवत्वावर अधिकृतपणे माझ्या अंदाजाप्रमाणे अगणिताव्या वेळेला शिक्कामोर्तब झालं होतं त्या दिवशी.

टाइम मशीन मिळालंच तर भूतकाळात क्रिकेटप्रेमी म्हणून ज्या ज्या दिवसांत जायला आवडेल त्यापैकी तीन २४ तारखा खास राखीव आहेत आपल्या किंबहुना आपल्या सगळ्यांचाच! म्हणजे २४ एप्रिल १९७३ रोजी एक अवतारजन्म झाला म्हणून मुंबईत पेढे वाटायचेत, २४ एप्रिल १९९८ रोजी त्याच्या बर्थडेला शारजामध्ये जाऊन वॉर्न, कास्प्रोविझ, फ्लेमिंग आणि स्टीव्ह वॉला ‘काय भाऊ, बराय ना?’ असं खांद्यावर हात ठेवून विचारायचंय.. आणि २४ फेब्रुवारी २०१० रोजी ‘अबब! आत्ता मी चक्क वनडेत ग्वाल्हेरच्या कॅप्टन रुपसिंग स्टेडियममध्ये प्रेक्षकांत जाऊन बसून जे पाहिलं ते खरंच घडलंय का’ असं वाटून स्वतःलाच चिमटा घ्यायचाय.
होय ना?

  •  पराग पुजारी

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.