क्रिकेटमुळे सचिन देव बनला पण त्याला अरबपती या माणसाने बनवलं

वर्ष १९९३. मनमोहन सिंग यांच्या खाऊजा धोरणामुळे आपल्या घरातल्या टीव्ही प्रमाणे ब्लॅक अँड व्हाईट असलेलं क्रिकेट आता कलर झालं होतं. नुकताच झालेल्या वर्ल्ड कपमध्ये अगदी शिंप्याकडून शिवलेला पांढरा शर्ट पॅण्ट जाऊन व्यवस्थित कलरफुल जर्सी आली होती. पाकिस्तानने हा वर्ल्ड कप उचलला होता.
त्यामुळे पुढचा म्हणजे ९६ च्या वर्ल्डकपच्या यजमानपदाचा मान पाकिस्तानला मिळाला होता.
आता त्या काळात सुद्धा पाकिस्तानची इमेज एक गरीब देश अशीच होती. एवढी मोठी सिरीज आयोजित करायचं त्यांना झेपणार नाही असच आयसीसीला वाटत होतं. म्हणून या वर्ल्डकपचं भारत पाक आणि श्रीलंका यांनी मिळून आयोजन करावं असे आदेश वरून आले.
पाकिस्तान बरं म्हणाले पण त्यांची अट होती, फायनल आमच्याकडे असायला पाहिजे.
मागच्या वेळी म्हणजे ८७ साली वर्ल्डकप झालेला त्याच फायनल कलकत्त्याला झालेलं म्हणून यावेळी आमचा हक्क आहे असं त्यांचं म्हणणं होतं. भारतातर्फे बोलणी करायला अस्सल मारवाडी जगमोहन दालमिया आले होते. त्यांनी जास्त ताणावलं नाही. खाऊंदे गरीब म्हणत फायनल मॅच पाकिस्तानमध्ये होणार म्हणून सांगितलं पण निगोशिएशनमध्ये या मॅचचे ब्रॉडकास्टींगचे अधिकार आपल्या पदरात पाडून घेतले.
जगमोहन दालमिया हा बारा गावचं पाणी पिलेला माणूस आहे हे पाकिस्तानला उशिरा कळालं. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.
नुकतंच बीसीसीआयने भारत इंग्लंड टेस्ट सीरिजचे ब्रॉडकास्टिंग राईट्स विकले होते ते २२ कोटी रुपयांना. आपल्या हातात सोन्याचे अंडे देणारी कोंबडी गावली आहे याचा अंदाज त्यांना आला होता. म्हणून दालमिया शेठनी फायनलचा मान पाकला देत सोन्याची कोंबडी स्वतःच्या हातात ठेवली.
दालमियांनी वर्ल्ड कप ब्रॉडकास्टिंगचा लिलाव काढला.
ट्रान्स वर्ल्ड इंटरनॅशनल (TWI) नावाच्या कंपनीने तब्बल ८५ लाख डॉलरची बोली लावत हा लिलाव जिंकला. सगळं झालं पण एक प्रॉब्लेम आला. बीसीसीआयने त्यांना काही रक्कम अगोदर उचलून द्या असं सांगितलं. TWI वाल्यांचं म्हणणं होतं हे शक्य नाही. दालमिया याबाबतीत कडक होते. त्यांनी पुढचं नियोजन केलेलं, जगातला आजवरचा सर्वात भव्य क्रिकेट वर्ल्ड कप आयोजित करून दाखवायचं त्यांचं स्वप्न होतं.
यासाठी स्टेडियम दुरुस्त करणे आणि इतर गोष्टींसाठी पैसे लागणार होते. याच बरोबर असोसिएट देशात पैसे गुंतवून क्रिकेटच्या पॉलिटिक्स साठी आपला खुंटा बळकट करायचा त्यांचा इरादा होता. एवढं सगळं पुढची बांधणी केली आणि TWI ऐनवेळी माती खात होती.
अखेर बीसीसीआयने TWI चं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं. वर्ल्डटेल नावाची नवी पार्टी त्यांना मिळाली. लंडन मधल्या एका अपार्टमेंट मध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष बिंद्रा आणि जगमोहन दालमिया यांच्या बरोबर डील करायला वर्ल्ड टेलचा एक तरुण आला होता.
नाव मार्क मॅस्करेन्हस.
नाव इंग्लिश असलं तरी गडी भारताचा होता. बेंगलोरचा. शिकला अमेरिकेत, तिथे टेलिव्हिजन प्रॉडक्शनच्या डिप्लोमा करून आलेला. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी केलेली. पुढे स्वतःची कंपनी स्थापन केली आणि फुटबॉल वर्ल्डकप, स्किईंग वर्ल्डकप ब्रॉडकास्ट करून दाखवले.
तो सेल्समनशिपचा बाप होता. तो दालमिया बरोबर बोलणी करायला आला. पण गंमत म्हणजे या मार्कने क्रिकेट बघून १० वर्षे झालेली. यातुन किती पैसे मिळवता येतील याचा काहीच अंदाज नव्हता.
दालमियांनी थेट सांगितलं,
TWI आम्हाला ८५ लाख डॉलर देतंय, तुम्ही १ कोटी डॉलर देणार असाल आणि त्यातले २५ लाख डॉलर ऍडव्हान्स देणार असाल तर कॉन्ट्रॅक्ट तुमचं.
मार्कने होकार कळवून टाकला. अनेकांनी त्याला खुळ्यात काढलं. मारवाड्याने तुला गंडवलं असंच सगळ्यांचं म्हणणं होतं पण मार्क आपल्या म्हणण्यावर ठाम होता. त्याच्यासाठी आयुष्यातली सगळ्यात मोठी रिस्क होती, पण गड्याने डेरिंग केलेलं.
हा जुगार कामी आला. १९९६ च्या वर्ल्डकप मध्ये पठ्ठ्याने १ कोटी डॉलर लावले आणि २ कोटी डॉलर कमावले.
हाच तो काळ जेव्हा सचिन क्रिकेटचा नवा हिरो म्हणून समोर येत होता. त्याने ओपनिंगला बॅटिंगला येणं सुरु केलेलं. वकार युनूस,अॅलन डोनाल्ड, शेन वॉर्न सारख्या दिग्गज बॉलर्सची त्याने पिसे काढलेली. त्या वर्ल्डकपमध्ये पण सचिन चमकला. प्रत्येक मॅच नंतर त्याची हवा वाढत चालली होती.
वर्ल्ड कप सुरु असतानाच त्याला अनेक स्पॉन्सर्स भेटून चालले होते. आमच्या जाहिराती कर म्हणून सांगत होते. पण सचिन आपलं कॉन्सन्ट्रेशन बिघडू नये म्हणून कोणालाच भीक घालत नव्हता. अखेर त्याची भेट रवी शास्त्रीने मार्क मॅस्करेन्हस बरोबर घालून दिली.
अट्टल सेल्समन असणाऱ्या मार्कने सचिनला साइन करून टाकले. सचिनने कुठल्या जाहिराती करायच्या, त्याच्या बॅटवर कोणाचा लोगोची असणार, त्याच्या शर्टवर कशाचं नाव असणार हे सगळं आता मार्क ठरवणार होता. त्या बदल्यात सचिनला करोडो रुपये तो देणार होता.
एका साध्या मराठी प्राध्यापकाच्या घरात जन्माला आलेला सचिन रमेश तेंडुलकर या पैशांच्या गणितापासून खूप लांब होता. साधारण वीस बावीस वर्षाच्या सचिनला आपण एक ग्लोबल ब्रँड आहे हेच माहीत नव्हतं.
मार्कने या हिऱ्याला पैलू दिले. क्रिकेटमध्ये पैसा आहे आणि मॅच फिक्सिंग वगैरे न करता आपल्या मेहनतीने योग्य पद्धतीने तो कमवता येतो आणि श्रीमंत होता येत हे मार्कने सचिनला दाखवून दिलं.
त्या आधी सचिन वर्षाला ५ जाहिराती करून साधारण १५ लाख कमवायचा. मार्कने त्याच्या बरोबर ५ वर्षांचा करार केला आणि वर्षाला २७ कोटी रुपये मिळवून देण्यास सुरवात केली. या एकाच डीलमध्ये सचिन जगातला सर्वात श्रीमंत खेळाडू बनला. टीमचे सगळे खेळाडू मिळून जेवढं कमवत नाहीत त्याच्या तीनपट पैसे सचिन कमवत होता.
आता आपले काही सत्वशील गरीब पत्रकार मंडळी असतात ज्यांना जुन्या रेडिओच्या जमान्यात राहायचं असतंय त्यांनी यावर जोरदार टीका केली. क्रिकेट म्हणजे पैशाचा बाजार करून ठेवलाय वगैरे वगैरे. अशातच अझर च्या मॅचफिक्सिंगच्या चर्चा दबक्या आवाजात सुरु झाल्या होत्या.
पण या सगळ्याला सचिनच्या वतीने रवी शास्त्रीने उत्तर दिलं,
‘इतिहास में पहली बार एक भारतीय एथलीट को डिजर्विंग वैल्यू मिल रही है. यह आसानी से मिलने वाली बड़ी रकम की बात नहीं है. यह कहानी उस लड़के की है जिसे वो पैसा मिला, जो वह डिजर्व करता है. एक लड़का जिसे लिटिल मास्टर सुनील गावस्कर ‘ग्रेग चैपल जैसा टेक्निकल और विव रिचर्ड्स जैसी आक्रामकता’ वाला बताते हैं.’
शास्त्रीने आपल्या फेमस ट्रेसिंग लाईक बुलेट च्या स्टाईलने अर्ग्युमेण्ट केलं आणि गोरगरीब पत्रकार जनता शांत झाली.
मार्कने सचिन तेंडुलकर बरोबर केलेला करार त्याच्यासाठी लॉटरी ठरली. पुढच्या तीन वर्षात सचिनने संपूर्ण क्रिकेटवर राज्य केलं.
१९९८ च्या आस्ट्रेलिया विरुद्धचाय शारजा सिरीजमध्ये तर त्याने केलेल्या सलग दोन सेंच्युरी चमत्कार च मानल्या गेल्या. मन ऑफ द सिरीज म्हणून शारजाच्या अरब शेखने दिलेल्या भारी कार मध्ये बसून सचिन राईड मार्ट होता तेव्हा सगळ्या भारतीयांची कॉलर ताठ झाली होती.
इफ क्रिकेट इन रिलिजन देन सचिन इज गॉड
हे बॅनर आता जगभरात झळकायला लागले. सचिनच्या मेहनतीला मार्कने पैशात रूपांतर केलं होतं. २००१ साली वर्ल्ड टेलने सचिनबरोबर १०० कोटी डॉलरचा करार केला. म्हणजेच सचिन अरबपती बनला होता.
एक क्रिकेटर एवढं कमवू शकतो हे कोणी स्वप्नातदेखील पाहिलेलं नव्हतं. गल्लीत बॅटबॉल खेळतोय म्हणून पोराला बडवणारे पालक त्याला कोचिंगला पाठवू लागले. सेहवाग, युवराज कोहली धोनी पासून आजच्या रोहित शर्मा, अजिंक्य राहणे पर्यंत अनेक पिढ्या सचिन बनायचं हे स्वप्न घेऊन घडल्या,
फक्त सचिनचं नाही तर मार्कने गांगुली, आगरकर, रॉबिन सिंग पासून ते शेन वॉर्न पर्यंत कित्येक क्रिकेटर बरोबर कॉन्ट्रॅक्ट साइन केलं. फक्त त्याचा सगळ्यात लाडका खेळाडू आणि गाववाला द्रविड बरोबर करार करायला त्याला जमलं नाही.
याचा अर्थ असा नव्हता कि मार्क जे करेल त्यात त्याला यश मिळत होतं. त्याच आणि जगमोहन दालमिया यांची भांडणे देखील जोरदार गाजली. अगदी बीसीसीआयने त्याला कोर्टात देखील खेचलं होतं. श्रीलंका बोर्डाबरोबर सुद्धा त्याचा पंगा झाला. अगदी दादा गांगुली बरोबर भांडण होऊन त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मिटलं.
शेवट पर्यंत टिकलेला एकमेव क्लायन्ट म्हणजे सचिनच होता.
मार्कने जगाला क्रिकेट किती भव्य आहे हे दाखवून दिल. पुढचे आयपीएल, ट्वेन्टी ट्वेन्टी वगैरे प्रकार त्याच्या स्वप्नांवरच उभे राहिले. मार्क क्रिकेटच्या विश्वात विजे सारखा चमकला. पण त्याची एक्झिट देखील अशीच अनपेक्षित होती.
२७ जानेवारी २००२ रोजी मध्यप्रदेशहुन टाटा सुमोमध्ये मुंबईला निघालेल्या मार्कचा टायर फुटून अकॅसिडेंट झाला. जागेवरच त्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी भारताची कानपूरमध्ये इंग्लंडबरोबर मॅच होती. सगळे भारतीय खेळाडू आपल्या दण्डवर काळी फित बांधून मैदानात उतरले. सचिनने त्यादिवशी ६७ बॉल मध्ये ८७ रन्स बनवले.
त्यादिवशी भावुक होऊन सचिन म्हणाला,
‘यह बहुत बड़ा व्यक्तिगत नुकसान है.’
यावर इयान चॅपल म्हणाला,
“मार्क म्हणजे भारतीय क्रिकेटचा कॅरी पॅकर होता. त्याने भारतीय क्रिकेट चा टेलिव्हिजन कव्हरेज कायमचा बदलून टाकला. “
हे ही वाच भिडू.