100 कोटी कमवणारा फुटबॉलपटू फुटका मोबाईल का वापरतो याला पण एक कारण आहे.

सेनेगल, आफ्रिका खंडातील एक अतिगरीब देश. पण नुकताच फुटबॉलच्या वर्ल्डकपमध्ये सेमिफायनल पर्यंत धडक मारून सगळ्या जगभरात हवा केलेली. अख्खा देश फुटबॉल मय झाला होता.

डकार नावाची त्यांची राजधानी. तिथे एक ट्रायल चालली होती. शेकडो मुले आली होती. ट्रायल च्या आधी रजिस्ट्रेशनसाठी एक रांग बनवली होती. एक वयस्कर व्यक्ती तिथे उभे होते.

त्यांना या रांगेतच एक छोटा मुलगा उभा असलेला दिसला. पायात फाटलेले बूट, ढगळ चड्डी.

त्यांना खूप आश्चर्य वाटलं आणि राग देखील आला. आजकालची पिढी किती निष्काळजी आहे, त्यांना ट्रायलसाठी आवरून येण्याचा देखील कंटाळा आहे असं मनाशी बोलत त्यांनी त्या मुलाला जवळं बोलवून घेतलं.

“काय रे अस फाटके बूट आणि ढगळ बरमोडा घालून येतात का ट्रायल ला?”

तो मुलगा म्हणाला, माझ्याकडे हेच शूज आहेत

त्या मुलाची चौकशी केल्यावर कळाल की फक्त फुटबॉल च्या प्रेमापोटी हा मुलगा हजारो किमी अंतर पार करून आलाय आणि आपल्या क्लब साठी ट्रायल देतोय. त्यानी सांगितलं,

“तुझी ट्रायल झाली. उद्या पासून तू आपल्या अकॅडमीमध्ये ट्रेनिंग घेशील. तू फुटबॉल कसा खेळतोस माहीत नाही पण देशाचं नाव मोठं करणार हे मला माहित आहे”

त्या मुलाचं नाव सादियो माने

एक धार्मिक घरात त्याचा जन्म झाला. अठराविश्व दारिद्र्य. पण पोरग पायावर चालू लागला तेव्हापासून फुटबॉलच वेडं. गेल्या दहा पिढ्या कुटुंबात कोणालाही फुटबॉल खेळून माहीत नाही पण सादियो त्याशिवाय जगूच शकत नव्हता.

गावात गरीब मुलांना शिकायला चांगली शाळा नाही. बहुतांश मुले रस्त्यावर टवाळखोरी करत उभी. ड्रग, गुन्हेगारी हेच त्यांचं विश्व. सादियो सुद्धा त्याच वाटेने गेला असता पण फुटबॉलने त्याला सावरलं.

फक्त सावरलं नाही तर नाव पैसा जगभर प्रसिद्धी सगळी दिली.

मेट्झ नावाच्या फ्रेंच फुटबॉल क्लबपासून त्याचा प्रवास सुरु झाला. इंग्लिश प्रीमयर लीग मध्ये अवघ्या 2 मिनिट 56 सेकंदमध्ये 3 गोल केले आणि विक्रम केला.

त्याचा खेळ बघून लिव्हरपुल या जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉल क्लबपैकी एक असलेल्या क्लबने त्याला विकत घेतले. गेली 3 वर्षे तो त्याच टीम मध्ये आहे, त्यांचा मुख्य आधारस्तंभ आहे.

यावर्षी झालेल्या फिफा गोल्डन बूट च्या शर्यतीत तो आघाडीवर होता, लिओनेल मेस्सीने आपले मत त्याला दिलेलं.

इतकं असून गेले काही दिवस झालं तो एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आलाय. झालंय अस की त्याचा एक हातात फुटलेला ग्लास असलेला मोबाईल घेऊन जातानाचा फोटो व्हायरल झालाय.

लोक चेष्टेत म्हणाले की जगातल्या सगळ्यात महागड्या फुटबॉलपटूपैकी तो एक , लिव्हरपुल बरोबर वर्षाचा 73 कोटी रुपयांचा करार असलेला,

जाहिरातीतून शेकडो कोटी कमवणारा माने एक मोबाईल चांगला घेऊ शकत नाही. किती हा निष्काळजीपणा?

तर याचं उत्तर त्याच्या एका मुलाखती मधल्या उत्तरात आहे. तो चांगली गाडी का घेत नाही असा प्रश्न त्याला विचारण्यात आलेला तेव्हा सादियो म्हणाला,

” मी मनात आणलं तर घराबाहेर 10 फेरारी उभी करू शकतो. वीस हिऱ्याची घड्याळं, दोन विमाने विकत घेऊ शकतो पण याचा जगाला काय फायदा आहे?”

सादियो ने सांगितलं की मी लहानपणी भुकेलेले दिवस काढलेत. शेतात काम केलं, अनवाणी पायाने दिवसरात्र खेळलो, मला शिकता आलं नाही पण

जे काही कमावलं ते फुटबॉल मूळ आणि मला माझ्या माणसांना ते द्यायचं आहे.

सादियोने त्याच्या गावात शाळा उभी केली आहे, स्टेडियम बांधलं आहे, गरीब लोकांना अन्न, कपडे, बूट देतो. सेनेगल मधल्या म्हाताऱ्या, अपंग लोकांना तो महिन्याला 5हजार रुपये देतो.

मग स्वतः साठी घरच्यासाठी कोणतीही चैनीची गोष्ट घेण्यापेक्षा आपल्या प्रमाणे गुन्हेगारी दारिद्र्य ड्रग पासून दूर येण्याची एखाद्या मुलाला संधी देता आली तरी आपल आयुष्य पार पडलं अस त्याला वाटतं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.