संभाजीराजेंवर माघार घेण्याची वेळ कुणामुळे आली ? शिवसेना, राष्ट्रवादी की भाजप ?

संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणूकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली आहे.

मात्र घोषणा करतांना संभाजीराजे म्हणाले, “ही माझी माघार नसून स्वाभिमान आहे. कोणापुढे झुकून खासदारकी घेणार नाही, माझी ताकद मला बघायचीय्, मावळ्यांना संघटीत करायला मी सज्ज आहे. असे सूचक वक्तव्य करत संभाजीराजेंनी आपली पत्रकार परिषद संपवली आणि एका नव्या राजकारणाला सुरुवात झाली… 

मात्र एक प्रश्न सर्वांनाच पडला तो म्हणजे संभाजीराजेंवर माघार घेण्याची वेळ नक्की कुणी आणली ?

 संभाजीराजेंचा कार्यक्रम नक्की कुणी ? शिवसेनेना ? राष्ट्रवादीने कि भाजप ?

या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आधी टाईमलाईन समजून घ्यायला लागेल..१२ मे रोजी राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढची दिशा काय असणार याबद्दलचे पुण्यातल्या पत्रकार परिषदेत  दोन निर्णय जाहीर केले होते. ते २ निर्णय म्हणजे येणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीला ते अपक्ष म्हणून उभे राहणार, त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना पाठिंबा द्यावा म्हणून त्यांनी जाहीर केलेले तर दुसरा निर्णय त्यांच्या ‘स्वराज्य’या संघटनेच्या स्थापनेचा होता. 

त्यावेळेस ते हेही सांगायला विसरले नाहीत कि, हीच संघटना पुढे जाऊन राजकीय पक्ष बनेल आणि त्याला त्यांची हरकत नसेल, सोबतच त्यांनी राज्यसभेच्या ६ जागांचं गणित मांडलं.  

२०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर भाजपकडे २, राष्ट्रवादीकडे १, काँग्रेसकडे १, शिवसेनेकडे १, अशा जागा आहेत आणि ६ वी जागा संख्याबळ कमी असल्यामुळे रिक्त आहे, त्यावर संभाजीराजेंनी दावा ठोकला कि याच ६ व्या जागेवरून मी उभा राहतो आणि मला तुम्ही सर्वानी पाठिंबा द्या.

राज्यसभेत खासदारकी मिळवायची असेल तर त्यासाठी ४२ मते लागतात, महाविकास आघाडीकडे २७ मते आहेत. भाजप कडे २२ मते आहेत. बाकी अपक्ष आमदारांच्या मतांसाठी संभाजीराजेंनी मोट बांधायला सुरुवात केली..

मात्र यातला महत्वाचा प्रश्न म्हणजे, राज्यसभेच्या उमेदवारीसाठी त्यांनी कुठल्याही पक्षाशी हातमिळवणी केली नाही पण का ?त्यांना पद हवंय मात्र कुण्या पक्षात जायचं नाही. त्यांना कुठल्याही पक्षात का जायचं नाही हाही प्रश्न आहेच…त्याचं उत्तर म्हणजे संभाजीराजेंना त्यांचं स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करायचंय, त्यात त्यांनी स्वतःची ‘स्वराज्य’ संघटना स्थापन केली. दुसऱ्या पक्षात जाणं म्हणजे स्वतःच्या संघटनेचं महत्व कमी करण्यासारखं आहे….

२०१६ मध्ये ते भाजपच्या शिफारशीने राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून राज्यसभेत गेले होते. तसेच त्यांना आता देखील राज्यसभेत जायचं. मात्र कुणीच पक्ष त्यांना साथ का देत नसावेत ?

संभाजीराजेंना अपक्ष म्हणून उमेदवारी देण्याबाबत प्रत्येक पक्षाने काय काय स्टॅन्ड घेतला आणि त्याचा घटनाक्रम कसा घडत गेला हे जाणून घ्यायला हवं…

१२ मे रोजी संभाजी राजेंच्या पत्रकार परिषदेनंतर १६ मे ला राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजेंना पाठिंबा देण्याची घोषणा केली. ते म्हणाले कि, 

“महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाच्या संख्याबळाच्या जोरावर प्रत्येकी एक-एक जागा हमखास निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी पक्षापुरतं सांगायचे झाल्यास आमचा एक प्रतिनिधी निवडून आणून देखील १०-१२ मतं आमच्याकडे शिल्लक राहतात,  शिवसेनेकडं सुध्दा काही मतं आहेत त्यांनाही काही अडचण नाही, कॉंग्रेसचा अकडा कमी जास्त असेल तर आमचे लोक संभाजीराजेंना अनुमोदन देतील असं शरद पवार म्हणाले होते”. 

आता शरद पवारांचं महाविकास आघाडीतलं महत्त्व पाहता, त्यांच्या बोलण्यानुसार सूत्रं हलतील असा अंदाज होता…

पण नेमकं झालं असं कि,  १६ मे ला पवारांनी पाठिंबा दिला अन २२ मेला पवारांनी आपल्या भूमिकेवरून घुमजाव केला. शिवसेना ज्या कुणाला उभा करेल त्यालाच आमची शिल्लक मते देऊ, असं शरद पवारांनी स्पष्ट केलेलं. त्याच दरम्यान शिवसेनेने ६ व्या जागेवर आपलाच उमेदवार राज्यसभेवर पाठवण्याचं जाहीर केलं. 

  • १९ मे ला संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. 

संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा आणि शिवसेनेकडून राज्यसभा निवडणूक लढवावी असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी ठेवला. छत्रपती घराण्याचा मान राखूनच त्यांना उमेदवारीचा प्रस्ताव दिला, असं संजय राऊतांनी सांगितलं होतं… 

  • २२ मे ला पुन्हा एकदा शिवसेनेच्या दोन खासदारांमध्ये आणि संभाजीराजे यांच्यात बैठक पार पडली.. पण यातून काहीच निष्पन्न झालं नाही. संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश तर आम्ही उमेदवारी देऊ यावर शिवसेना ठाम होती तर शिवसेनेट जाणार नाही यावर संभाजी राजे ठाम होते…
  • सेनेने संभाजीराजेंना २२ मे च्या दुपारच्या १२ पर्यंत शिवसेनेत यावं असा अल्टिमेटम दिला होता…

पण अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवणार संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्ट केलं. मग शिवसेनेने कोल्हापूरचे संजय पवार यांना उमेदवारी दिली.

उमेदवारी दिली नाही म्हणून संभाजीराजेंनी “शिवसेनेला” आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. आजच्या पत्रकार परिषदेत देखील ते म्हणाले की, “मला खूप वाईट वाटतंय, मुख्यमंत्र्यांकडून मला ही अपेक्षा नव्हती. त्यांनी दिलेला शब्द मोडला”. असं म्हणत त्यांनी अखेर राज्यसभा निवडणूकच लढवणार नाही असं जाहीर केलंय. 

पण या सगळ्या राजकारणात भाजपने काय खेळी केली ?

भाजपची थोडक्यात भूमिका अशी राहिलीये की, गेल्यावेळी आम्ही संभाजीराजेंना राष्ट्रपतीनियुक्त खासदार म्हणून राज्यसभेत पाठवलं होतं. आता ती जबाबदारी महाविकास आघाडीतल्या पक्षांनी घ्यावी. जेंव्हा भाजपने संभाजीराजेंना खासदारकी दिली तेंव्हा मराठा आंदोलनाचा मुद्दा बराच तापला होता, तो शांत करण्यासाठी, मराठा चेहरा म्हणून भाजपने त्यांना संधी द्यायचं ठरवलं होतं.

मात्र यावेळेस संभाजीराजेंना उमेदवारी देऊन भाजपला काही फायदा नसल्यामुळे त्यांनी हात वर केल्याची टीका भाजपवर इतर पक्ष करतायेत. 

संभाजीराजेंना उमेदवारी देण्याची जबाबदारी शिवसेनेची आहे असं भाजपने स्टॅन्ड घेतला. खरं तर संभाजीराजेंना शिवसेनेनं उमेदवारी द्यावी हा प्रश्नच उद्भवत नव्हता. संभाजीराजेंची राज्यसभेची पहिली टर्म संपल्यानंतर दूसरी टर्म त्यांना भाजपकडूनच मिळणे अपेक्षित होतं असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. 

या सगळ्या चर्चा आणि राजकीय घडामोडी पाहता संभाजीराजेंना माघार नक्की का घ्यावी लागली याबाबत आम्ही राजकीय विश्लेषकांसोबत चर्चा केली…

राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे सांगतात कि, 

हा पूर्ण खेळ शरद पवारांनी केला. कारण शरद पवार स्वतः मराठ्यांचे नेते आहेत. आणि संभाजीराजे मराठा मोर्चांअंतर्गत स्वतःला मराठ्यांचा नेता म्हणून डेव्हलप करत होते. तसेच छत्रपतींचा वारसदार असल्याचा लाभ घेत होते. मग शरद पवारांनी दुसरा मराठा नेता तयार होऊ नये म्हणून हे सर्व केलं जे राजकारणात चालत असतं. भाजपने शिवसेनेला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला”. 

“थोडक्यात यात शिवसेना अडकली. शिवसेनेची भीती अशी होती कि, संभाजीराजे शिवसेना पुरस्कृत म्हणून निवडून गेले आणि त्यानंतर त्यांनी भाजपची बाजू घेतली तर शिवसेना तोंडघशी पडेल. म्हणून सेनेने छत्रपतींचा मान राखून पक्षात या म्हणून उमेदवारी ऑफर केली होती. पण संभाजीराजेंनी अपक्षच राहून लढणार हा हेका धरल्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आहे”, अशी प्रतिक्रिया अशोक वानखेडे यांनी दिली..

तसेच बोल भिडूने ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्याशी चर्चा केली त्यांचं असं मत आहे कि, 

“भाजप ज्याप्रमाणे या राजकारणात खेळी करतंय त्यावरून असं वाटतंय की, त्यांना संभाजीराजे राज्याच्या राजकारणात इतकेच महत्वाचे वाटतायत तर त्यांनीच संभाजीराजेंना पुन्हा राष्ट्रपती नियुक्त खासदार करावं”. 

“एवढ्या महत्वाच्या राज्यसभेसारख्या निवडणुकीत संभाजीराजेंनी, “मी उभं राहतोय मला निवडून द्या” असं म्हणतायेत पण एवढ्या भाबडेपणाने हे चालत नसतं. आधी स्वतःहून उमेदवारी जाहीर केली अन मग पाठिंबा मागण्याच्या तयारीला लागले ?

 “संभाजीराजेंचं असं काय कर्तृत्व आहे कि लोकांनी तुम्हाला राज्यसभेवर पाठवावं.  तुम्ही गेल्या ६ वर्षात राज्यसभेवर गेल्यावर काय केलं याचा लेखाजोखा तुम्ही द्यायला पाहिजे होता. तुम्ही छत्रपती आहेत याचा आदर आम्हाला आहेच मात्र फक्त छत्रपती आहात म्हणून तुम्हाला निवडून दिलं पाहिजे असं कुठं असतं का? तुम्हाला खासदारकी हवीय अन कुण्या पक्षाचं बंधन नको हे कस काय शक्य आहे ? असा सवाल विजय चोरमारे यांनी विचारला…

तुम्हाला काय वाटतं संभाजीराजेंना माघार घेतली त्यामागे नक्की कोणता पक्ष जबाबदार आहे ? 

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.