विद्यापीठ की आकाशवाणी वसंतदादांनी हा प्रश्न चुटकीसरशी सोडवला.

गोष्ट आहे १९६०च्या दरम्यानची. यशवंतराव चव्हाणांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश दिल्लीहून मुंबईला आणला होता. हे राज्य बनावे यासाठी प्रचंड मोठी आंदोलने झाली होती, अनेक वीरांनी आपले रक्त सांडले होते. आता वेळ होती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणाऱ्या राज्याच्या उभारणीची.

पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतरावांनी अनेक धडाडीचे निर्णय घेतले. राज्यात नवे उद्योग आणले, कोयने सारखी विद्युतनिर्मिती करणारी धरणे उभा केली. महामार्ग बांधले. पण यासोबतच त्यांनी आणखी एक निर्णय घेतला,

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच विद्यापीठ उभारण्याचा.

त्याकाळात मोठे विद्यापीठ, महाविद्यालये  मुंबई पुणे या मोठ्या शहरांमध्ये होते. यामुळे बऱ्याचदा खेड्यातल्या मुला मुलींना या मोठ्या शहरात जाऊन शिक्षण घेणे परवडणारे नसल्यामुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. म्हणूनच हे विद्यापीठ महाराष्ट्रातील एक क्रांतिकारी घटना असणार होती.

यामुळेच काय झाल की प्रत्येक मोठ्या नेत्याला वाटत होतं की हे विद्यापीठ आपल्या जिल्ह्यात व्हाव.

खुद्द मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण स्वतः सातारा जिल्ह्यातील कऱ्हाडचे. त्यांची इच्छा होती की पश्चिम महाराष्ट्राच्या मध्यवर्ती असणाऱ्या सातारा जिल्ह्यात हे विद्यापीठ व्हाव. त्यांच्या पाठोपाठ त्यांचेच सहकारी लोकनेते वसंतदादा पाटील यांनी आग्रह धरला की हे विद्यापीठ सांगली जिल्ह्यातच व्हावं.

हा वाद चिघळणार अशी शक्यता निर्माण झाली. दोन्ही नेते माघार घेण्यास तयार नव्हते. 

ही मंत्रिमंडळ बैठक जेव्हा सुरु होती तेव्हा राज्याचे शिक्षण मंत्री बाळासाहेब देसाई आजारी असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये होते. मात्र जेव्हा त्यांच्या कानावर हा वाद पडला तेव्हा अंगावर शाल ओढून मंत्रीमंडळ बैठकीला आले आणि गरजले,

“कोल्हापूरची शाहू महाराजांनी केलेली शैक्षणिक प्रगती, कार्य, तेथील बोर्डिंग्ज् हे पाहता कोल्हापूर ही पुण्यानंतरची विद्यानगरी आहे, कुठला सातारा आणि सांगली घेऊन बसलाय…?”.

बाळासाहेब देसाईंच्या या खडसावण्यामुळे यशवंतराव आणि वसंतदादा या दोन्ही दिग्गज नेत्यांनी माघार घेतली आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरला होणार हे नक्की झालं. मात्र त्याबदल्यात वसंतदादा पाटील यांनी कोल्हापूरला होणारे आकाशवाणी केंद्र सांगलीला वळवले.

वसंतदादांनी व्यवहारी चातुर्य दाखवलं. कोल्हापूर सांगलीपासून खूप दूर नाही. तिथे विद्यापीठ झाल्या मुळे शाहू महाराजांच्या करवीर नगरीचा मान राखला गेला आणि सांगलीकरांना आकाशवाणी आणि विद्यापीठ दोन्हीचा लाभ मिळाला.

१८ नोव्हेंबर १९६२ रोजी शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली त्याच्या पाठोपाठ ६ ऑक्टोबर १९६३ साली सांगलीत आकाशवाणी सुरु झाली.

आजच्या नेटफ्लिक्स, मल्टीप्लेक्सच्या युगातही पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सांगली आकाशवाणी केंद्र आवर्जून ऐकल जातं.

मागच्यावर्षी आलेल्या कृष्णा नदीच्या महापुरात अगदी रेकोर्डिंग रूमपर्यंत पाणी चढेपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत आकाशवाणी कर्मचाऱ्यानी जीवावर उदार होऊन किल्ला लढवला. महापुरात बाकीचे संपर्काचे सर्व मध्यम बंद पडले होते तेव्हा आकाशवाणी सुरु होती याबद्दल खुद्द प्रधानमन्त्री नरेंद्र मोदींनी त्यांचे कौतुक केले.

“हे आकाशवाणीचे सांगली केंद्र आहे  “

हे शब्द कानावर पडले तर लहानपणीच्या आठवणीनी सांगलीकरांचे उर भरून येते.

हे ही वाच भिडू.