वसंतदादांच्या एका शब्दावर वाडियांनी मुंबईमधली करोडोंची जमीन १ रुपयात देऊन टाकली.

वर्ष होतं १९७८. महाराष्ट्रात पाणीवाली बाई म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मृणाल गोरे यांच एक आंदोलन सुरु होतं. नागरी निवारा आंदोलन.

गोरेगाव मध्ये कमाल जमिनी धारणा कायद्यान्वये अल्प उत्पन्न धारकांना राहण्यासाठी घर मिळाव म्हणून हे आंदोलन सुरु होतं. मृणाल गोरे तिथल्या खासदार होत्या. इथेच त्यांनी खूप वर्षापूर्वी पाणी आंदोलन, लाटणे आंदोलन यशस्वी करून दाखवलेलं.

एकेकाळी गोरेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच जेष्ठ समाजवादी नेते प.बा.सामंत यांनी गोरेगाव मधल्या झाडू कामगारांना घर बांधण्यासाठी आपली जमीन देऊन टाकली होती. याच प.बा. सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी निवारा प्रकल्प सुरु करण्यात आला.

मुंबईच्या पाच हजार बेघर लोकांना घर मिळवून देण्याचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प होता.

मृणालताईनी पाच हजार लोकांनां सोसायटी सदस्य बनवले होते. कष्टकरी समाजातून आलेल्या या प्रत्येक सदस्याला एक पासबुक देण्यात आलेला होता. त्यांना दर महिन्याच्या शेवटी प्रत्येकी १०० रुपये जमा करायला सांगितले होते. पासबुक आणि पैशाचा हिशोब सोसायटीकडे असायचा.

पण मुख्य प्रश्न जमिनीचा होता. मुंबईमध्ये तेव्हा सुद्धा जमिनीच्या किंमती अवाच्या सव्वा बनल्या होत्या. बिल्डर लॉबी प्रचंड ताकद बाळगून होती. मृणाल ताईंची ही उठाठेव त्यांना पसंद नव्हती. हे आंदोलन मोडून काढायचा त्यांचा डाव होता.

अखेर हे प्रकरण राज्य सरकार कडे आले. सांगलीचे वसंतदादा पाटील तेव्हा मुख्यमंत्री होते.

मृणाल गोरे त्यांना भेटायला गेल्या. खर तर त्या विरोधी पक्षातल्या, अनेकदा त्यांनी सरकारवर प्रचंड टीका देखील केलेली पण वसंतदादा पाटलांनी कोणताही आडपडदा न ठेवता त्यांची भेट घेतली, सगळ प्रकरण समजावून घेतल. वसंतदादा हे मोठ्या मनाचे दिलदार व्यक्तिमत्व होते. त्यांनी मृणाल ताईनां स्पष्ट सांगितलं की

“अवघड आहे पण मी प्रयत्न करतो !”

दादांनी आश्वासन दिल खरं पण त्यांना काय करावे हे सुचत नव्हत. त्यांचे हात बांधलेले होते. चौकशी केल्यावर त्यांना कळाल की या भागात सुप्रसिद्ध उद्योगपती बॉम्बे डाईंगचे मालक नसली वाडिया यांची जमीन आहे. पण ते ही जमीन देण्यासाठी का तयार होतील का हा सुद्धा प्रश्न होता.

अखेर वसंतदादानी शरद पवारांना भेटायला बोलावल.

पवार त्यांच्या मंत्रिमडळात गृहमंत्री होते. नसली वाडियाशी त्यांचे चांगले संबंध आहेत हे दादांना ठाऊक होतं. त्यांनी पवारांच्या पुढे मृणाल गोरेंच्या आंदोलनाचा विषय काढला.

“मृणालची मागणी रास्त आहे पण अडचण ही आहे की त्यांना देण्यासाठी राज्य सरकारकडे जमीन नाही. या भागात नसली यांच्याकडे जमीन आहे पण ती त्यांना कशी मागयची? “

पवारांनी ही गोष्ट नसली वाडिया यांच्या कानावर घातली. वाडिया यांना वसंतदादांच्या प्रति खूप आदर होता. ते एका पायावर तयार झाले. त्यांनी मृणाल गोरे यांचं नागरी निवारा प्रकल्पासाठी नाममात्र १ रुपया एकर दराने २५ एकर जमीन देऊन टाकली.

आजच्या हिशोबात हजारो करोड रुपये किंमतीच्या या जागेवर पाच हजार गरिबांची घरे उभी आहेत, याचे श्रेय जाते मृणाल ताई, प बां सामंत यांच्या लढाऊ आंदोलनाला, वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाला आणि नसली वाडिया यांचं औदार्याला!

हा किस्सा शरद पवार यांनी आपल्या आत्मचरित्रात सांगितला आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.