आत्ताचा वाद फक्त राजकारणापुरता मर्यादित नाहीये….

शिवसेनेतल्या फुटींनंतर उद्धव ठाकरेंनी पक्षाबाहेरील अनेकांना पक्षात घेण्याचा सपाटा लावला. यात सर्वात हिट पक्ष प्रवेश ठरला तो सुषमा अंधारे यांचा पक्षप्रवेश.

हाती शिवबंधन बांधलं अगदी त्या दिवसापासून सुषमा अंधारे चर्चेत येत असतात. एकनाथ शिंदे यांच्या बंडांनंतर सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत सरळ प्रवेश केला आणि शिवसेना उपनेतेपदी त्यांची निवड करण्यात आली. बंडखोर गटातल्या आमदारांना लक्ष्य करणे, त्यांच्यावर टीका करणे हा कार्यक्रम त्या सातत्याने करत आल्यात. त्यावर शिंदे सरकारमधील आमदार तितक्याच ताकदीने उत्तर देखील देत आलेत.

मात्र सद्या शिंदे सरकारमधील आमदार संजय शिरसाट आणि सुषमा अंधारे यांच्यातलं वॉर वेगळ्या वळणावर गेलं आहे. 

प्रकरण काय ?

झालंय असं कि, सुषमा अंधारे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ‘महाप्रबोधन यात्रे’च्या माध्यमातून सुषमा अंधारे सातत्याने शिंदे गटातील आमदारांचा उल्लेख ‘माझे भाऊ’ असा करत उपरोधिक टोलेबाजी करतात… दरम्यान याच मुद्द्यावरुन छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या शिवसेनेच्या सभेत बोलताना संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली. 

सुषमा अंधारेंवर टीका करताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची जीभ घसरली. वक्तव्य करताना त्यांनी असं म्हंटलंय कि, ““ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. सत्तार भाऊ माझेच भाऊ आहेत, भुमरे भाऊ पण माझेच भाऊ आहेत. पण तिने काय-काय लफडी केली आहे, हे तिलाच माहीत. अरे पण तू आहे तरी कोण? आम्ही आमची ३८ वर्षे शिवसेनेसाठी घालवली. आता तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करताय आणि काही उरलेले लोक टाळ्या वाजवत आहेत” असं ते म्हणाले आणि त्यावर समोरच्यांनी टाळ्या वाजवल्या. 

त्यांच्या वादग्रस्त विधानावरून हे प्रकरण पेट घेतलं… 

शिरसाट यांच्या विधानावर सुषमा अंधारे काय म्हणाल्या ? “संजय शिरसाट या विकृत आमदाराने वापरलेली भाषा ही व्यक्तीशः मलाच नाही, तर एकूणच महिला वर्गाच्या मनात लज्जा उत्पन्न करणारी आहे. तसेच त्यांची भाषा बहीण- भावाच्या पवित्र नात्याला कलंक लावणारी आहे”, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली.

तसेच यासंदर्भात अंधारे यांनी परळी पोलीस ठाणे गाठत तक्रार केली.

तसेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये सुषमा अंधारे यांच्याबद्दल स्त्री मनाला लज्जा उत्पन्न होईल अशा शब्दाचा वापर करणाऱ्या आमदार शिरसाट यांच्यावर कलम ३५४ (अ), ५०९ आणि ५०० प्रमाणे गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. हा तक्रार अर्ज क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकाकडे दिला आहे. आता पोलीस याबाबत तपास करून पुढील कारवाई करणार आहेत.

तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी योग्य ती चौकशी करून कार्यवाही करण्याचे निर्देश आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलीस आयुक्त छत्रपती संभाजी नगर यांना दिले आहेत आहेत.

 इतकंच नाही तर राज्यात शिरसाट यांच्या विरुद्धच्या घडामोडींचा वेग आला.  ठाकरे गटाच्या महिला आघाडीचे शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेलं. या शिष्टमंडळाने आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी केली. त्यामुळे पोलीस आता याप्रकरणी काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. राज्यात काही ठिकाणी शिरसाट यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन झालं.

पण तरी प्रकरण पेटल्यानंतर आमदार संजय शिरसाट यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे. 

ते म्हणाले कि, “सुषमा अंधारेंचा अपमान केला. याच्यात अपमानाचं कुठे आलं तर कळलं नाही. त्या व्हिडीओत मी एकही अश्लिल शब्द वापरलाय असं सिद्ध करुन दाखवलं तर मी तातडीने आमदारकीचा राजीनामा देईन. मला सत्ता महत्त्वाची नाहीय. पण तुम्हाला अधिकार कुणी दिला? तुम्हाला लढायचं असेल तर समोरासमोर लढा. याद राखा माझ्या विरोधात बोलायचा प्रयत्न केला तर त्याला मी त्याच भाषेत उत्तर देईन. मागे हटणार नाही” असा इशारा दिलाय..

शिरसाट यांच्यावर जर कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल झालाच तर ? हे कलम इतकं गंभीर आहे का ?

कोणत्याही स्त्रीला भारतीय दंड संहिता कलम ३५४ नुसार विनयभंगाची तक्रार करण्याचा अधिकार आहे. मात्र विनयभंगाबाबतचा कायदा काय सांगतो आणि त्या कायद्याअंतर्गत शिक्षेचं स्वरूप काय आहे ते माहिती करून घेऊया,

एखाद्या पुरूषाने एखाद्या महिलेशी सार्वजनिक ठिकाणी कसे वागायला पाहिजे आणि कसं वागायला नाही पाहिजे हे स्पष्ट करणारा हा विनयभंगाचा कायदा आहे.  भारतीय दंड संहितच्या कलम ३५४ नुसार, ” कोणतीही व्यक्ती एखाद्या स्त्रीला लज्जा उत्पन्न होईल अशी जबरदस्ती त्यांच्यासोबत केल्यास, जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्यास १ ते ५ वर्षाची शिक्षा होऊ शकते.   

शारीरिक जवळीक साधण्याची बळजबरी केली तर कलम ३५४ अ अंतर्गत ३ वर्षे शिक्षा होऊ शकते, विनयभंग करण्यासाठी हल्ला केल्यास कलम ३५४ (ब)अंतर्गत ३ ते ४ वर्षे शिक्षा, महिलांना कपडे बदलताना अथवा संभोग करताना पाहिल्यास कलम ३५४ (क) अंतर्गत ३ ते ४ वर्षे शिक्षा, एकदा पाठलाग केला तर कलम ३५४ ड ३ वर्षांची शिक्षा, वारंवार पाठलाग केल्यास ५ वर्षे शिक्षा होऊ शकते.

विनयभंगाचा गुन्हा हा दखलपात्र आणि अजामीनपात्र स्वरूपाचा आहे. अगदी २०११ -१२ पर्यंत कलम ३५४ अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा जामीनपात्र होता म्हणजेच आरोपीला पोलिस ठाण्यातूनच जामीन मिळवता यायचा. पण मुंबई न्यायालयाचे न्यायमूर्ती मोहित शाह आणि रंजना देसाई यांच्या विनयभंगाचा गुन्हा अजामीनपात्र करण्याच्या सूचनेनंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या प्रयत्नांनी ३५४ अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा हा अजामीनपात्र म्हणून दुरस्ती करण्यात आली.

विनयभंगाच्या कायद्याबाबतची सर्वात महत्वाची गोष्ट हे कि, माझ्यासोबत विनयभंग झाला इतकीच तक्रार केली म्हणजे झालं अशातला भाग नसतो तर त्या स्त्रीला त्या घटनेतील संबंधित पुरुषाने गैरवर्तन केलं असं न्यायालयात सिद्ध करावं लागतं. 

पण यालाच जोडून एक असा प्रश्न निर्माण होतो कि, संजय शिरसाट यांनी भाषणात अर्वाच्य भाषेत केलेलं विधान पाहता त्यांच्यावर पोलीस प्रशासन काय कारवाई करेल हे पाहणं महत्वाचं ठरेल.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.