आधी जन्मठेप मग मुलाचा एन्काउंटर, युपी पोलिसांच्या रडारवर आलेला अतिक अहमद कोण आहे ?

“त्याच्या डोळ्यात बघायची हिम्मत होत नाही. रक्ताळलेले त्याचे ते लालबुंद डोळे एकटक तुमच्या दिशेनं रोखलेले असतात. तो नजर तर अशी रोखतो कि तुम्ही आपोआप खाली बघायला लागता” असं एक पोलीस आरोपीबद्दल सांगत होता. 

आम्ही काय पिच्चरची स्टोरी सांगत नाहीय. तर उत्तर परदेशातील एका बाहुबली नेत्याबद्दल बोलतोय. त्या नेत्याचं नाव आहे अतिक अहमद अन्सारी. अतिक अहमद म्हणजे उत्तर प्रदेशमधील कुप्रसिद्ध व्यक्तिमत्व.

ज्याने राजकारण आणि गुन्हेगारी या दोन्ही क्षेत्रात एकाचवेळी हुकूमत गाजवली. गुन्हेगारीचा शिक्का आणि १०० च्या आसपास खटले आणि १४४ गुंडांची टोळी चालवत असतानादेखील त्याने एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारत निवडणूक जिंकण्याचा प्रताप करून दाखविला. पण याच अतिक अहमदला गेल्या वर्षी स्वतःच्याच राज्यातून पळ काढावा लागला.

अतीक अहमद विविध प्रकरणात जून २०१९ पासून साबरमती तुरुंगात आहे. त्याची पहिलीच शिक्षा ठरली कारण चार दशक माफिया राहूनही त्याला कधीही शिक्षा झालेली नव्हती.

कृषी संस्थेच्या एका प्राध्यापकावर हल्ला केल्याप्रकरणी २०१६ रोजी त्याला अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्याला २०१९ मध्ये गुजरातमधील तुरुंगात हलवण्यात आले.

त्याची स्टोरी काय ?

१९८० चं अलाहाबाद. संगमावर बसलेलं शांत धार्मिक शहर म्हणून प्रसिद्ध असलेलं अलाहाबाद आता कात टाकत होतं. नवीन कॉलेजेस, नवीन इंडस्ट्रीज यामुळं अलाहाबादचं रुपडं झपाट्यानं बदलत होतं. राजकारणात पण बदल घडत होते. एकेकाळी अख्या उत्तरप्रदेशच्या राजकारणात दबदबा निर्माण करणारी अलाहाबाद युनिव्हर्सिटीची विध्यार्थी चळवळ मागे पडत होती.

हे सगळं फिरोझ टांगेवाल्याचं पोरगं बघत होतं. एवढे सगळे बदल होत असताना आपल्या आयुष्यात मात्र काय बदलत नाहीए हे त्यानं ओळखलं होतं. बापाचा टांगा चालवायचा धंदा पुढे आपण घेतला तर खायचे वांदे होतील हे त्याला कळलं होतं. आता शाळेत जाऊन अभ्यास करायचा आणि कलेक्टर बिलेक्टर बनायचं तर शाळेत पास होयचे वांदे . मग अतिकनं गुन्हेगारी आणि राजकारणाचा मार्ग निवडला.

अतिक अहमदवर प्रयागराज येथे खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल १९८४ रोजी पहिला गुन्हा दाखल झाल्याची नोंद आहे. आता गुन्हेगारी क्षेत्रात एन्ट्री मारलेल्या अतिक अहमदला आता राजकारणातही नाव कमवायचं होतं. 

१९८९ मध्ये अहमदने पहिल्यांदा तेव्हाच्या अलाहाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि विजयदेखील मिळवला. पुढच्या दोन विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढून अहमदने ही जागा कायम ठेवली. त्यानंतर समाजवादी पार्टीने अहमदसाठी आपले दरवाजे खुले केले. पश्चिम अलाहाबाद विधानसभा मतदारसंघातून तो पाचवेळा विजयी झाला आणि थेट खासदारकी पर्यंत मजल मारली. कधीकाळी पंडित नेहरू ज्या फूलपूर मतदारसंघामधून निवडून जात होते त्याच मतदारसंघामधून आता अतिक अहमद २००४ मध्ये लोकसभेवर पोहचला. 

मायावतींवर गोळीबार केल्याने अतिक अहमद चर्चेत आलेला.

१९९५ मध्ये गेस्ट हाऊसकांडमुळे अहमद चर्चेत आला. दरम्यान, अतीक अहमद हा समाजवादी पक्षात होता.  युपीच्या तत्कालीन मुख्यमंत्री मायावती त्यांच्या आमदारांसोबत गेस्ट हाऊसवर थांबल्या होत्या. अहमद आणि सपाच्या कार्यकर्त्यांनी या गेस्ट हाऊसला वेढा टाकून गोळीबार केला होता. गेस्ट हाऊसवर हल्ला झाला असताना मायावती यांना एका खोलीत बंद करण्यात आले होते. यानंतर संतापलेल्या मायावतींनी सपासोबतची युती तोडून टाकली आणि सत्तास्थापनेसाठी भाजपाची मदत घेतली.

गुन्हेगारीवरच त्याचं सगळं राजकारण चाललं होतं असं उत्तरप्रदेशातील पत्रकार सांगतात. मात्र २००५ मध्ये राजू पाल जो एकेकाळी त्याचा राईट हॅन्ड ओळखला जायचा त्याच्या हत्येनंतर मात्र अतिक अहमदच्या कारकिर्दीला उतरती कळां लागली. अलाहाबाद पश्चिम या विधानसभेच्या मतदारसंघात अहमद लोकसभेवर गेल्यामुळे पोटनिवडणूक लागली होती. 

अतिक अहमद लोकसभेवर निवडुन गेल्यांनतर त्याच्या अलाहाबादेतील जागेवरून त्याचा भाऊ अश्रफ याला विधानसभेवर पाठवायची इच्छा होती. मात्र राजू पाल यानं बसपाचं तिकीट घेऊन अश्रफचा पराभव केला. अतिक अहमदच्या एकाधिकारशाहीला हे आव्हान होतं. मग त्यानं जे केलं त्यांना अख्खा उत्तरप्रदेश हादरून गेला होता. २००५ मध्ये राजू पालच्या गाडीच्या ताफ्यावर दिवसा ढवळ्या हल्ला करण्यात आला.

राजू पालच्या स्कॉर्पिओची गोळ्यांनी चाळण करण्यात आली होती. त्यातूनही राजू पालच्या साथीदारांनी त्याला कसबसं टेम्पो मध्ये टाकून हॉस्पिटलमध्ये नेण्याचा प्रयत्न केला मात्र अतिक अहमदच्या शूटर्सनी टेम्पोवर देखील हल्ला करून राजू पालला संपवलं  होतं.   

एवढं सगळं कांड होऊनही अतिकनं आपला भाऊ अश्रफ याला निवडूकीच्या रिंगणात उतरवलं. लग्नाच्या अवघ्या ९ दिवसांनंतरच राजू पालचा खून झाला होता. बसपाने जेव्हा त्याची पत्नी पूजा पाल यांना उमेदवारी दिली. तेव्हा पूजा पालनं आपल्या हातावरली लग्नाची मेंहदी दाखवत मतं मागितली होती. मात्र अतिक अहमदची दहशत एवढी होती की  नवऱ्याचा मृत्यूच्या सहानभूतीचा कोणताच फायदा नाही झाला आणि अहमदच्या भाऊ अश्रफ निवडून आला. 

मात्र पुढे मायावती यांनी अतिक अहमदला चांगलचं अडकवलं. राजुपालच्या हत्येची केस पुन्हा उघडण्यात आली. पुढच्या लोकसभा आणि विधानसभेत त्याचा पराभव झाला. 

विधानसभेत हाताची मेहंदी मिटायच्या आत जिच्या डोक्यावरचं कुंकू पुसलं गेलं होतं त्या पूजा पालनं त्याचा पराभव केला होता. 

२०२१ मध्ये समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन अतिक अहमदने एमआयएम पक्षात प्रवेश केला. काही काळ तो अपना दलातही होता. मात्र राजकारणात पुढे जात असतानाच त्यानं गुन्हेगारी विश्व सोडलं नव्हतं आणि हेच गुन्हेगारी विश्व त्याच्या कारकिर्दीचा शेवट ठरवणारं ठरलं आणि तो जेल मध्ये गेला. 

अतिक अहमदचे गुन्हेगारी किस्से एखाद्या चित्रपटापेक्षा कमी थरारक नाहीत. डिसेंबर २०१८ रोजी अतिक युपीमधील देवरियाच्या तुरुंगात कैद होता. तिथे त्याने मोहित जयस्वाल नावाच्या व्यावसायिकाला भेटायला बोलावले. नंतर कळले की, जयस्वालला बळजबरीने उचलून तुरुंगात आणले होते. तिथे त्याला मारहाण करून त्याची ४८ कोटी रुपयांची जमीन अहमदच्या सहकाऱ्यांच्या नावावर करण्यासाठी कागदपत्रावर सही घेण्यात आली होती म्हणजे जेल मध्ये असूनही अतिकचे गुन्हेगारी कारनामे चालूच होते.

पण आत्ता अतिक अहमद चर्चेत यायचं कारण काय ?

गेल्या २४ फेब्रुवारी रोजी, बसपाचे माजी आमदार राजू पाल हत्याकांड प्रकरणातील मुख्य साक्षीदार उमेश पाल याची अतिक अहमदच्या गुंडांकडून दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मजी आमदार राजू पाल हत्याकांड प्रकरणात अतिक अहमद हा मुख्य आरोपी आहे. ज्याप्रकारे राजू पाल यांची हत्या झाली. त्याच प्रकारे आणि त्याच ठिकाणी उमेश पालची हत्या करण्यात आली. या प्रकरणी प्रयागराजच्या विशेष खासदार/आमदार न्यायालयानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

एकेकाळी उत्तरप्रदेश हादरवून सोडणाऱ्या या माफियाला गेल्या साडेपाच वर्षांत योगी आदित्यनाथ यांनी सळो कि पळो करून सोडलंय. आधी त्याच्या बेकायदा संपत्तीवर टाच आणली गेली, घर, बंगल्यावरून बुलडोझर फिरला आणि आता त्याच्या मुलाचाही एनकाउंटर झालाय…   

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.