फक्त ५ हजार लोकसंख्येंच्या गावात २७ ऑलिम्पिक मेडल आहेत

प्रत्येक गावाची वैशिष्ट्ये असतात. एखादं गाव चपलेसाठी फेमस आहे तर एखादं चादरीसाठी. पण भारतात असंही एक गाव आहे जे ऑलिंपिक मेडल साठी फेमस आहे.

नाव आहे संसारपूर 

पंजाब मधल्या जालंधर जिल्ह्यातील एक छोटंसं खेडेगाव. आज देखील या गावची लोकसंख्या असेल इनमीन पाच हजार. पण इथल्या गावकऱ्यांनी आजवर २७ मेडल जिंकले आहेत. विश्वास बसला नाही ना? पण हे खरं आहे.

या गावाची स्टोरी सुरु होते एकोणिसाव्या शतकात. साधारण १८४९ साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने शिखांचा पराभव करून पंजाब जिंकून घेतला. राष्ट्रवादाने पेटलेल्या शीख योद्ध्यांना आवर कसा घालायचा हा प्रश्न ब्रिटिश अधिकाऱ्यांना पडायचा. १८५७ साली झालेली क्रांती व अधून मधून होणारे उठाव रोखण्या साठी ब्रिटिशांनी पंजाब मध्ये जागोजागी लष्करी तळ उभारले.

असाच एक तळ संसारपूरच्या उत्तरेला उभारण्यात आला.

संसारपूर म्हणजे शेतकऱ्यांचं गाव. गव्हाची शेती करणाऱ्या खेड्यात अचानक लष्करी तळ उभारला गेल्यामुळे खळबळ उडाली. गुरं राखायच्या निमित्ताने गावातली पोरंसोर लाल तोंडाची इंग्रज काय करतात हे बघायला कॅम्पजवळ घुटमळायची. तिथे परेड ग्राउंडवर फावल्या वेळेत इंग्रज अधिकारी हातात चेंडू आणि काठी घेऊन काही तरी खेळताना कायम दिसायचे.

आपल्या लगान सारखं ओ. फक्त हा खेळ क्रिकेट नव्हता. ते इंग्रज अधिकारी हॉकी खेळायचे.

मलबेरीच्या झाडावर बसून हे बघणाऱ्या पोरांची उत्सुकता ताणायची. त्यांचं बघून गल्लीत एक फळकुट आणि चिंध्यांचा बॉल करून खेळ सुरु व्हायचा. पंजाबी गरम रक्त. त्यांना हि गेम लगेच लक्षात आली. गावातली पोरं  अगदी चुरशीने हॉकी खेळू लागले.

याला पंजाबी भाषेत खिडो खुंडी असं म्हणत. 

एकदा तिथून जाणाऱ्या गोऱ्या अधिकाऱ्याने त्यांचा खेळ बघितला. आश्चर्याने त्याला धक्का बसला. भाषा येत नाही, नियम माहित नाही, खेळायचे कोणतेही साधन नाही तरीही त्या शीख मुलांनी हॉकी वर जबरदस्त पकड निर्माण केली होती.

त्या अधिकाऱ्याने या मुलांना कॅम्पवर आणले. तिथल्या परेड ग्राउंडवर संसारपूरची मुलं हॉकी खेळू लागली.

साधारण १९१० साली भारतीय आर्मीमध्ये ब्रिटिशांनी हॉकीचे मॅचेस सुरु केले. १९११ साली दिल्लीला पंचम जॉर्जचा राज्यारोहण सोहळा दिल्ली दरबार भरवला होता. त्या निम्मिताने देशपातळीवरची  पहिली हॉकी स्पर्धा आयोजित केली गेली. या स्पर्धेत ३६ शीख या पलटणीकडून संसारपुरचे ईश्वरसिंग कुल्लर यांनी स्पर्धा गाजवली.

संसारपुरच्या इतिहासातील गाजलेला हा पहिला हॉकी खेळाडू.

इथून पुढे या गावात हॉकीपटूंची रांगच लागली. सुभेदार ठाकूर सिंग हा भारताबाहेर जाऊन हॉकी खेळलेला संसारपूरचा पहिला खेळाडू. त्यांनी न्यूझीलंडच्या स्पर्धेत भाग घेतला होता.

फक्त संसारपूरच नाही तर संपूर्ण भारतात तेव्हा हॉकीचा खेळ बहरू लागला होता. इंग्रजांनी आपली टीम ऑलिम्पिक मध्ये उतरवली. १९२८ साली ऍमस्टरडॅम येथे भरलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत अनेकांना धक्का देत भारताची टीम गोल्ड मेडल जिंकली. मेजर ध्यानचंद यांनी हि स्पर्धा गाजवली.

पहिल्यांदाच भारत देशातील एक संघ जगाच्या लेव्हलवर अजिंक्य ठरला होता.

या टीमचे सदस्य असणारे सुभेदार ठाकूरसिंग संसारपूरला पहिला गोल्ड मेडल घेऊन आले. या गावाने तिथून आजवर ऑलिम्पिकसाठी १४ हॉकीपटू दिले आहेत. त्यांनी जिंकलेल्या पदकांची संख्या आहे २७.

हे हॉकीपटू भारतासाठीच नव्हे, तर कॅनडा, केनिया, नैरोबी, मोम्बासा या देशांसाठीही खेळले.

१९६८ सालच्या ऑलिम्पिकमध्ये संसारपूरचे चक्क सात हॉकीपटू खेळले होते. त्यापैकी भारतीय संघातून ५ व केनियातून दोघे. याखेरीज पंजाबसाठी वा देशपातळीवर खेळलेले हॉकीपटू वेगळेच. गुरमीत सिंग कुल्लर , उधमसिंग कुल्लर, अजितपाल सिंग कुल्लर हि काही गाजलेली नावं.

विशेष म्हणजे हे सगळे खेळाडू संसारपूरमध्ये अगदी १०० मीटरच्या अंतरावर राहत होते. 

मात्र गेल्या काही वर्षात सरकारी अनास्थेमुळे संसारपूरच्या हॉकीपटूंची स्थिती ढासळली.

ऍस्ट्रो टर्फसारख्या सोयीमुळे जागतिक लेव्हलला गेम वेगवान झाला पण भारताची सोन्याची खाण समजल्या जाणाऱ्या संसारपूरमध्ये हि सोय पोहचलीच नाही. आज या गावची मुलं हॉकी मध्ये मागे पडली. याचा परिणाम तरुणाई वर ड्रग आणि इतर अंमली पदार्थाचा विळखा पडण्यात झाला. एकेकाळी खिडो खुंडी म्हणत हॉकीची बॅट घेऊन खेळणाऱ्या पोरांच्या हातात कोकेन सारखे विष दिसू लागले,

याचं नुकसान फक्त गावातल्या हॉकीला नाही तर संपूर्ण देशातल्या हॉकीला झाले आहे.

गेल्या काही वर्षात भारत मेडल सोडा ऑलिम्पिकला पात्र होण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. हे सगळं थांबवायचं असेल तर संसारपूर गावाला ड्रग मधून बाहेर काढावे  लागेल आणि पुन्हा हॉकीच्या ट्रॅकवर नेऊन सोडावे लागेल.

याच विषयावर काही वर्षांपूर्वी पंजाबी मध्ये खिडो खुंडी हा सिनेमा येऊन गेला. या सिनेमा मध्ये संसारपूरच्या आजच्या परिस्थिती वर प्रखर भाष्य केले गेले आहे.

हे हि वाच भिडू .

 

1 Comment
  1. Rushikesh says

    Mast👍

Leave A Reply

Your email address will not be published.