पागनीस म्हणाले, आयुष्यभर निस्वार्थी राहिलेल्या तुकारामांच्या भूमिकेसाठी मानधन कस घेऊ..

कलाकार एखादी भूमिका जगतो असं आपण खूप वेळेस म्हणतो. पण अभिनय हा प्रांत असा आहे की साकारलेली भूमिका कितीही चांगली असली तरीही, ती भूमिका तिथेच सोडून कलाकाराला दुसऱ्या भूमिकेत प्रवेश हा घ्यावाच लागतो.

पण काही कलाकारांच्या मनात मात्र त्यांनी रंगवलेली भूमिका इतकी रुजते, की त्यातून बाहेर पडणं त्यांना जमत नाही. असे मनस्वी कलाकार त्या भूमिकेचा आदर ठेवतात. त्यातून स्वतःचं एक वेगळं विश्व ते आखत असतात. सध्याच्या काळात जे कलाकार आहेत त्यांना या धावत्या जगात स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी एकाच भूमिकेत अडकून चालणार नाही.

पण भिडूंनो, पूर्वीच्या काळात असे कलाकार होऊन गेले आहेत, ज्यांना आपण कोणत्या व्यक्तिमत्वाची भूमिका साकारतोय याची जाण असायची. त्या भूमिकेचा आदर करणं, मान ठेवणं हे त्यांना कलाकार म्हणून स्वतःचं कर्तव्य वाटायचं.

असाच एक कलाकार महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेला, तो कलाकार म्हणजे विष्णुपंत पागनीस. आजही संत तुकाराम यांचं नाव उच्चारताच आपल्या मनात विष्णुपंत पागनीस यांची छबी निर्माण होते. 

विष्णुपंत पागनीस यांचा १५ नोव्हेंबर १८९२ रोजी कोल्हापुरात जन्म झाला. विष्णुपंत पागनीस यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासूनच अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली. त्या काळात जनुभाऊ निंबकरांची ‘स्वदेशी हितचिंतक मंडळी’ ही नाटक कंपनी फार प्रसिद्ध होती. कंपनीद्वारे निर्मिती केलेल्या नाटकांमधून विष्णुपंत पागनीस यांनी वयाच्या दहाव्या वर्षी स्त्री भूमिका केल्या.

त्या काळी प्रचंड गाजलेल्या अशा ‘शारदा आणि शकुंतला’ या नाटकात सुद्धा विष्णुपंत पागनीस यांनी भूमिका केली होती. अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यावर विष्णुपंतांच्या अभिनयावर नाटकाचे संस्कार झाले. 

रंगभूमीवर अभिनयाचा पाया पक्का झालेला कलाकार पुढे कोणत्याही माध्यमात स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवू शकतो. विष्णुपंतांच्या बाबतीत सुद्धा हेच झालं. आयुष्याच्या सुरुवातीलाच मातब्बर नट मंडळींसोबत अभिनय केल्याने सिनेसृष्टीत सुद्धा विष्णुपंत पागनीस यांच्या भूमिका नावाजल्या गेल्या.

१९२१ साली आलेल्या ‘सुरेखा हरण’ आणि १९२४ साली आलेल्या ‘पूना रेडेड’ हे विष्णुपंतांच्या सिनेसृष्टीतले पदार्पणाचे सिनेमे. पण विष्णुपंत पागनीस हे ज्या भूमिकेमुळे अजरामर झाले ती भूमिका म्हणजे संत तुकाराम. 

आपण कोणीही संत तुकाराम महाराजांना पाहिलं नाही. त्यांचे अभंग , त्यांचं पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन झालेलं आयुष्य आपल्याला माहीत असतं. पण संत तुकाराम दिसायला कसे असतील असा प्रश्न मनात आल्यावर विष्णुपंत पागनीस यांनी साकारलेले तुकाराम महाराज आपल्या डोळ्यासमोर येतात.

हा सिनेमा जेव्हा पाहण्यात येतो तेव्हा विष्णुपंत पागनीस हे संत तुकारामांची भूमिका करताना किती समरस झाले आहेत, याची जाणीव होते. 

Screenshot 2020 09 13 at 9.56.18 PM

‘प्रभात फिल्म कंपनी’ची निर्मिती असलेला ‘संत तुकाराम’ हा सिनेमा १२ डिसेंबर १९३६ साली प्रदर्शित झाला. विष्णुपंत दामले आणि फत्तेलाल शेख या दोघांनी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली. या मराठी सिनेमाने अमाप यश मिळवले.

प्रेक्षकांनी या सिनेमाला भरपूर प्रेम दिले. इतकंच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळवलेला हा पहिला भारतीय सिनेमा ठरला.

मानाच्या ‘व्हेनिस फिल्म फेस्टिवल’ मध्ये जगभरातून अनेक सिनेमे निवडले जातात. १९३६-३७ साली ‘संत तुकाराम’ या सिनेमहोत्सवात दाखवला गेला. यामुळे जागतिक स्तरावर भारतीय सिनेमांची दखल घेतली गेली. 

या सिनेमाविषयी थोडं सांगायचं झालं तर, संत तुकाराम महाराज हे किती महान संत होते, याची सिनेमा माध्यमातून सर्वप्रथम प्रेक्षकांना ओळख झाली. संत तुकारामांचं सांसारिक जीवन, त्यांनी रचलेले अभंग, छत्रपती शिवाजी महाराजांसोबत त्यांची झालेली भेट आणि त्यांचं सदेह वैकुंठाला जाणं, अशा सर्व गोष्टींचा योग्य आढावा या सिनेमातून घेण्यात आला आहे.

विष्णुपंत पागनीस हे गायक नट होते. त्यामुळे सिनेमात त्यांनी गायलेले अभंग प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाले. हा सिनेमा त्या काळाच्या दृष्टीने तांत्रिक दृष्ट्या सरस असलेला सिनेमा होता. उदाहरण द्यायचं झालं तर, शेवटच्या प्रसंगात संत तुकारामांना घेऊन जायला आकाशातून पुष्पक विमान येतं. त्या विमानाची रचना, पंख पसरवत त्या विमानाचा वैकूंठाच्या दिशेने होणारा प्रवास अशा सर्व गोष्टी सिनेमात उत्तम दाखवलेल्या आहेत. 

‘संत तुकाराम’ सिनेमावर कौतुकाचा वर्षाव होत होता. पण ज्या कलाकरामुळे हा सिनेमा लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला ते विष्णुपंत पागनीस मात्र या सगळ्यात कुठेच नव्हते.

सिनेमाने आर्थिक कमाई सुद्धा बरीच केली. त्यामुळे निर्माते मानधन द्यायला विष्णुपंत पागनीस यांना भेटायला गेले. संत तुकारामांच्या भूमिकेमुळे विष्णुपंतांना सर्वजण आदराने ‘महाराज’ म्हणायचे. 

“महाराज , हे घ्या आपलं मानधन” पैशाचं पाकीट समोर ठेवून निर्माते म्हणाले. विष्णुपंतांनी शांत हसून मानधन घेण्यास नकार दिला. निर्माते बुचकळ्यात पडले. त्यांना वाटलं, सिनेमा गाजला म्हणून विष्णुपंतांना मानधनाची जास्त अपेक्षा असणार.

त्यांनी मानधनाची रक्कम दुप्पट, चारपट केली. तरीही विष्णुपंत मानधन घेण्यास तयार नव्हते. निर्मात्यांनी कारण विचारलं तेव्हा विष्णुपंत म्हणाले,

“आयुष्यभर नि:स्वार्थी जीवन जगलेल्या तुकाराम महाराजांच्या भूमिकेने मला अजरामर केलं, त्या भूमिकेसाठी मी मानधन कसं घेऊ? मानधना पलीकडे या भूमिकेने मला खूप काही दिलं आहे. त्यामुळे मी मानधनाचा स्वीकार करणार नाही.”

विष्णुपंतांनी व्यक्त केलेल्या या भावनेवर निर्माते सुद्धा काय बोलणार… त्यांनी विष्णुपंतांच्या म्हणण्याचा मान राखला. 

Screenshot 2020 09 13 at 9.55.56 PM

संत तुकाराम महाराजांचे मूळ छायाचित्र आज कुठेच उपलब्ध नाही. परंतु विष्णुपंत पागनीस यांनी साकारलेल्या तुकारामांच्या भूमिकेचा फोटो तेव्हा घरोघरी भक्तिभावाने पुजला जायचा. ज्या भूमिकेवर लोकांनी प्रेमाचा वर्षाव केला त्या संत तुकारामांच्या वेशभूषेत विष्णुपंत शेवटपर्यंत वावरत होते.

जणू काही संत तुकारामांचं व्यक्तिमत्व त्यांच्या अंगी भिनलं होतं. या सिनेमानंतर सुद्धा ‘संत तुलसीदास’, ‘नरसी भगत’, ‘महात्मा विदुर’ यांसारख्या सिनेमात त्यांनी भूमिका साकारल्या. त्यांनी गायलेलं ‘वंदे मातरम्’ हे गाणं सुद्धा लोकप्रिय झालं. 

संत तुकाराम महाराजांची भूमिका खऱ्या अर्थाने जगणाऱ्या विष्णुपंत पागनीस यांचं ३ ऑक्टोबर १९४३ रोजी निधन झालं. संत तुकारामांची भूमिका त्यांनी केवळ साकारली नाही तर प्रत्यक्ष आयुष्यात त्यांनी त्या भूमिकेप्रमाणे आचरण सुद्धा केलं.

म्हणून आजही संत तुकारामांच्या नावाचा जयघोष होतो, तेव्हा विष्णुपंतांनी साकारलेल्या संत तुकारामांची प्रतिमा नकळत मनात झळकते. 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.