सरसेनापती संताजी घोरपडे घराण्याचा दरारा दूर कर्नाटकात आजही कायम आहे.

इतिहासात अनेकदा मोठ्या घराण्याची एकमेकांशी सोयरिक असलेले आढळून आलेले आहे. आपल्यापैकी अनेकांना ठाऊक असेल की,

सरसेनापती संताजीचे घोरपडे घराणे हे छत्रपतींच्या भोसले घराण्याचे चुलत घराणे आहे. ही दोन्ही कुळे मुळचे मेवाडच्या राजघराण्याशी संबंधित सिसोदिया राजपूत

त्यांचे पूर्वज कर्णसिंह व भिमसिंह भोसले हे बहामनी साम्राज्यात चाकरी करायचे. त्यांच्यावर खेळणा किल्ला सर करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. हा किल्ला अतिशय दुर्गम होता. तेव्हा या भोसले बंधूनी घोरपडीचा वापर करून सैन्य गडावर पाठवले आणि किल्ला हस्तगत केलेला होता. मात्र दुर्दैवाने कर्णसिंहला या युद्धात मरण पत्करावे लागले.

पण या पराक्रम पाहून बहामनी सुलतानने भिमसिंहाला “राजा घोरपडे बहाद्दूर” हा किताब देवून मुधोळची जहागिरी दिली. त्यामुळे भोसलेंच्या या धाकट्या पातीचं आडनाव घोरपडे असे पडले.

बहामनी साम्राज्याच्या विघटनानंतरचा काळ आदिलशाही, निजामशाही या सुलतानशाहीचा होता. महाराष्ट्रातील अनेक पराक्रमी तरुण वेगवेगळ्या सुलतानांच्या पदरी नोकरी करत होते. यातूनच स्वकियांशी भांडणे,लढाया असा अंधकारमय हा काळ होता.

असच भोसले घराणे आणि घोरपडे घराण्याच्या बाबतीतही होते.

निजामशाहीतून आदिलशाहीमध्ये आलेल्या शहाजीराजे भोसलेंशी मुधोळच्या बाजी घोरपडेनी वैर धरले. शहाजी महाराजांना विजापूर दरबारात कैद करून आणण्यात त्यांचाही हात होता. या चुकीची शिक्षा म्हणून शिवरायांनी बाजी घोरपडेवर हल्ला करून त्यांना ठार केले.

घोरपडे व भोसले घराण्याचे वैर बाजी घोरपडेच्या मृत्यूनंतर संपुष्टात आले. याच घराण्यातील म्हाळोजी घोरपडेनां व त्यांच्या दोन मुलांना शिवरायांनी आपल्या पदरी रुजू करून घेतले. घोरपडेनी देखील मनात कोणतीही शंका न ठेवता स्वराज्याची सेवा केली.

इ.स.१६८९ ला मोगल सेनापती मुकर्रबखानाने कोकणातील संगमेश्वर येथे वेढा घालून संभाजीराजेंना अटक केली त्यावेळी याच म्हाळोजी घोरपडें यांनी आपल्या पराक्रमांची शर्थ करून संभाजी महाराजांचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न केला होता. पण त्यांना यात अपयश आलं आणि म्हाळोजीबाबांनी संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी प्राणाची आहुती दिली.

म्हाळोजी घोरपडेंना ३ मुले. मोठे संताजी, मग बहिर्जी आणि धाकटे मालोजी.

या भावांनी संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर छत्रपती राजाराम महाराजांना सुखरूपपणे दक्षिणेत जिंजी किल्ल्यावर पोहचवले होते. असं म्हणतात की एकदा बहिर्जीनी आपल्या पाठीवरती बसवून राजाराम महाराजांना तुंगभद्रा नदीचा धोका पत्कारून नदीपार करून दिलेली होती.

या शौर्यामुळे खुश होऊन छत्रपती राजाराम महाराजांनी संताजीस “ममलकतमदार” बहिर्जीस “हिंदूराव” तर मालोजीस “अमीर-उल-उमराव”असे किताब देवून गौरव केला.

संताजी घोरपडे स्वराज्याचे नवे सेनापती बनले.

शिवरायांच्या गनिमी काव्याचा वापर करून संताजी आणि धनाजी या जोडगोळीने मोघल सैन्यात धुमाकूळ घातला. एकदा तर थेट औरंगजेब बादशहाच्या छावणीवर त्यांनी हल्ला केला व त्याच्या तंबूचा सोन्याचा कळस कापून आणला. संताजी-धनाजीची दहशतीच्या दंतकथा इतक्या प्रसिद्ध झाल्या होत्या की मुघलांच्या सैन्याचे घोडेसुद्धा पाणी  पिताना घाबरतात अस म्हटल जायचं.

पुढे संताजी घोरपडे याचं छत्रपती राजाराम महाराजांशी मतभेद झाले व शीघ्रकोपी संताजी रागाच्या भरात महाराष्ट्रात परत आले. याच काळात मुघलांचा फितूर सरदार नागोजी माने याने त्यांचा खून केला.

संताजीचा भाऊ बहिर्जी घोरपडे हे देखील आपल्या भावाप्रमाणे पराक्रमी होते. त्यांनीच हिंदुराव घोरपडे घराण्याची स्थापना केली.

त्यांच्याकडे गजेंद्रगडची जहागिरी होती. बहिर्जी घोरपडे यांना तीन मुले होती. सयाजी, मुरारराव व सिधोजी. यापैकी सिधोजी हा पराक्रमी निघाला. त्याने कोल्हापूरच्या ताराराणी बाईसाहेबांना सत्ता स्थापनेसाठी मदत केली.

पुढे त्याने गुत्ती व सोंडूर ही कर्नाटकातली गावे जिंकून घेतली. या गजेंद्रगडकर घोरपडेंच्या पदरी कवायती फौज होती. यामुळे त्यांचा दरारा निजाम, हैदरअली व इंग्रज यांच्यात होता. अनेकदा पेशव्यांच्या वतीने बोलणी करण्यासाठी घोरपडेना पाठवल जायचं.

अशा या पराक्रमी घोरपडे घराण्याच्या वंशवेल कापशी, मुधोळ, दत्तवाड, बेडग सोबतच दूर कर्नाटकातील गजेंद्रगड सोंडूर येथे वाढल्या. या घराण्यांनी आपल्या शौर्याचा व चिकाटीचा वारसा प्राणपणाने जपला. आजही सोंडूर संस्थांनच्या झेंड्यामध्ये घोरपड दिसून येते.

तिथल्या प्रत्येक मंदिरातल्या कार्यक्रमात घोरपडे घराण्याचे वंशज सन्मानाने अग्रस्थानी असतात. आजही तिथली जनता आपल्या या राजघराण्याप्रति कृतज्ञ आहे.

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.