क्युट चॉकलेट बॉय शाहीद कपूर ‘अर्जुन रेड्डी’चा रिमेक करणार म्हटल्यावर अनेकांनी खुळ्यात काढलेलं.

सध्या मार्केट मध्ये चर्चा आहे कबीर सिंग या सिनेमाची. दक्षिणेत तेलगु मध्ये बनलेला सिनेमा अर्जुन रेड्डीचा हा हिंदी रिमेक. सगळ्यांनाच स्टोरी आवडली नाही. अंगावर येणारी हिंसा, व्यसनाधीनता, बायका म्हणजे उपभोगाची वस्तू असे वागवणारा  मेल शोव्हनिस्टिक नायक याच्या वर अनेकांनी टीका केली. प्रत्येकवेळी सिनेमा नैतिक चष्मा घालूनच बघावा का म्हणत सिनेमाच्या बाजूनेही काही जणानी मत मांडलं.

पण या सगळ्या गदारोळात सिनेमामधल्या एका गोष्टीचं कौतुक झालं ते म्हणजे शाहीद कपूरने केलेला अभिनय. 

तेलगु मध्ये विजय देवराकोंडाने अजरामर केलेला रोल शाहीदला कितपत सूट होईल याची अनेकांना शंका होती. चोकलेट बॉय छोटूराम शाहीदला त्या भुमिकेसाठी लागणारा आडदांडपणा, त्या भूमिकेचा जंगली पणा दाखवता येईल का हा आणि अशा अनेक प्रश्नांना शाहीद कपूरने या सिनेमात उत्तर दिल.  प्रेमात झिंगलेला डॉक्टर कबीर सिंग त्याचा राउडीनेस शाहीद कपूरच्या स्क्रीनवरच्या प्रत्येक फ्रेममध्ये उठून दिसतोय.

वीस वर्षापूर्वी मात्र अशी कंडीशन नव्हती.

शाहीद कपूरचे आईवडील दोघेही अभिमन्य क्षेत्रातले असल्यामुळे त्याला लहानपणापासूनचं सुपरस्टार होण्याच स्वप्न पडायचं. वडील पंकज कपूर हे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे विद्यार्थी, दोन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित, आपल्या जबरदस्त अॅक्टिंगसाठी नावाजलेले. पण शाहीद ला डान्स करणारा, फायटिंग करणारा हिरो व्हायच होतं.

तो लहान असतानाच त्याच्या आईबाबांचा घटस्फोट झाला होता. त्याच्या आईने म्हणजेच निलीमा अझीमने सिरीयल मध्ये छोटेमोठे रोल करायची. एकूण काय तर शाहीदच्या घरची परिस्थिती एकदम फिल्मस्टार प्रमाणे नव्हती. त्याकाळात मुंबईमध्ये शामक दावर यांचे डान्स क्लासेस फेमस होते. कॉलेजमध्ये असताना शाहीद आपल्या पॉकेटमनीसाठी तिथे डान्स इस्ट्रकटरची नोकरी करत होता. ताल या सिनेमातल्या एका गाण्यात ऐश्वर्या रायच्या मागे नाचणाऱ्या बॅकग्राउंड डान्सरमध्ये शाहीदसुद्धा दिसतो.

हे सगळ चालेलं पण शाहीदमधला हिरो व्हायचा किडा थांबत नव्हता. सतरा अठरा वर्षाचा असतानाच आपली प्रोफाईल घेऊन डायरेक्टर प्रोड्युसरना भेटणे वगैरे त्याच चालेल. अशातच एक व्हिडीओ अल्बम त्याला मिळाला. त्याच नाव होतं,

“आंखो मै तेरा ही चेहरा.”

यात एका टीनेजरचा रोल होता. यात सोबत ह्रिशिता भट सुद्धा होती. गाण, त्यात दाखवलेला निरागस प्रेम प्रेक्षकांना खूप आवडल. क्युट दिसणाऱ्या कुत्र्याबरोबर क्युट दिसणारा शाहीद सुद्धा अनेकांना आवडला. अल्बम भरपूर चालला. शाहीदला ओळख मिळाली.

त्याला भरपूर अॅडस मिळाल्या. शाहरुख, काजोल, राणी मुखर्जीबरोबर एका पेप्सीच्या जाहिरातीत देखील तो दिसला.

एकदा तो व्हिडीओ अल्बम निर्माता आणि टिप्स म्युजिक कंपनीचे मालक रमेश तौरानीनी पाहिला. त्यांनी त्याला भेटायला बोलवलं. त्यांना वाटलं की शाहीदने लहानपणी या गाण्यात काम केलेलं. आता तो मोठा झाला असेल. तौरानीनी प्रत्यक्षात त्याला पाहिल्यावर त्यांना जाणवलं हा वीस वर्षाचा वाटतच नाही. अजूनही तो एखादा शाळकरी मुलगा वाटतो.  तौरानीनी त्याला सल्ला दिला की

 “अजून थोडे दिवस थांब. गडबड करू नको. हिरो बनण्याच्या दृष्टीने तू अजुन कोवळा आहेस.”

शाहीदने तो सल्ला मानला. त्याला तो पर्यंत एन.चंद्रा यांच्या स्टाईल सिनेमा मध्ये रोल ऑफर झाला होता. पण शाहीदने नकार दिला. त्याच्या ऐवजी तो रोल शर्मन जोशीने केला. 

इकडे शाहीद अजून शामक दावर स्कूल मध्ये काम करतच होता. एकदा काय झालं कुठे तरी एक स्टेज शो होता. यात सुपरस्टार शाहरुख खान शामक दावरच्या डान्स ट्रूप बरोबर स्टेजवर नाचणार होता. यात बकग्राउंड कलाकारांमध्ये शाहीद कपूर सुद्धा होता. डान्सची प्रक्टिस सुरु होती. ब्रेक टाईममध्ये शाहरुखचं लक्ष शाहीदकडे गेलं. त्याला ठाऊक नव्हत की तो पंकज कपूरचा मुलगा आहे किंवा आपण एका जाहिरातीत एकत्र काम केलं आहे. सहज गंमतीने त्याने लुकड्यासुकड्या शाहीदचा दंड पकडला आणि शामक ला म्हणाला,

“क्या शामक तू अपने डान्सर लोगोंको कुछ खिलाते हो या नही?”

स्टेजवरचे सगळे शाहरुखच्या या जोकवर भरपूर हसले. पण शाहीदच्या मनाला ही गोष्ट खूप लागली. कहो ना प्यार है सुपरहिट झालेला तो काळ होता. ह्रितिकच्या कमावलेल्या बॉडीची सगळी कडे चर्चा होती. सगळ्यानाच पुढच्या सुपरस्टार प्रमाणे बनायचं होतं. शाहीदनेही बॉडी बनवायला सुरवात केली.

काही वर्षांनी रमेश तौरानीना शाहीदला सूट होईल अशी एक स्क्रिप्ट मिळाली. यावेळी त्यांना भेटायला तो आला तेव्हा त्यांनी ओळखलंचं नाही. शाळकरी क्युट वाटणारा शाहीदचं रुपांतर एका बलदंड बॉडीबिल्डर मध्ये झालं होतं. सिनेमाच नाव होतं इश्क विश्क. कोलेजला जाणाऱ्या प्रत्येक मुलाला आपलासा वाटणारा हलकाफुलका हा सिनेमा. 

maxresdefault 1 1

या पिक्चरसाठी खर तर शाहीदने थोडस वजन उतरवलं. सिनेमा खूप गाजला. त्यातली गाणी गाजली. फिल्मइंडस्ट्रीला नवीन स्टार मिळाला. पण  त्याची इमेज शाहरुखला कॉपी करणारा चॉकलेट बॉय अशीच बनली. तसेच रोल त्याला मिळत गेले.या नादात बरेच सिनेमे फ्लॉप झाले. नाही म्हणायला विवाह, जब वी मेट असे अपवादात्मक रोमांटिक सिनेमे गाजले. पण बऱ्याचदा अपयशचं पदरात पडलं.

गेल्या काही वर्षापासून त्याने प्रयोगात्मक भूमिका करण्यास सुरवात केली आहे. हैदर, उडता पंजाब अशा सिनेमांनी त्याची चॉकलेट बॉयची इमेज मोडून तर काढलीच शिवाय बाबा पंकज कपूर प्रमाणे त्याच ताकदीची भूमिका करू शकतो हे सिद्ध झाले. कबीरसिंगच्या निम्मिताने त्याने आपल्या फिजिकल लिमिटेशनलाही मागे टाकले आहे.

या सिनेमासाठी त्याने १४ किलो वजन वाढवले. ते करताना त्याला खूप वर्षापूर्वी शाहरुखने उडवलेली थट्टा नक्कीच आठवत असणार आहे. दारू आणि ड्रग्जमध्ये स्वतःला उध्वस्त करणारा नायक रंगवणे हे शारीरकद्रष्ट्या आणि मानसिक दृष्टया खूप अवघड होते, पण ते आव्हान शाहीदने पेलले आणि प्रेक्षकांनाही ते आवडले. 

येणाऱ्या काळात शाहीद अजून काय काय चमत्कार दाखवतो ही पाहण्यासारखी गोष्ट ठरेल.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.