महाराष्ट्राच्या शेतकरी नेत्याने कर्नाटकात शेतकऱ्यांचं सर्वात मोठं आंदोलन उभारलं होतं.

महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरचा बेळगाव जिल्ह्यातला निपाणी तालुका. वेदगंगा नदी ही इथली जीवनदायनी. याच नदीच्या पाण्यावर निपाणी परिसर सुजलाम सुफलाम बनला. इथल्या खोऱ्यात पूर्वी कापूस डाळी, शाळू पिकवणारा शेतकरी गेल्या दीड शतकापासून तंबाखू पिकवू लागला.

बेळगाव, कोल्हापूर, सांगली या सीमेवरील जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात तंबाखू उत्पादन घेतले जात होते.

तंबाखूची सर्वांत मोठी बाजारपेठ निपाणी होती. शेकडो खासगी व्यापाऱ्यांच्या हातात तंबाखू आणि विड्या तयार करणारी प्रचंड गोदामे होती. मात्र, तंबाखूला वर्षानुवर्षे किमान भाव मिळत नव्हता. त्याचा सर्वांत मोठा असंतोष केंद्रात जनता पक्षाची राजवट आल्यावर जाणवू लागला. दहा-बारा रुपये किलोप्रमाणे विकला जाणाऱ्या तंबाखूचा दर रुपया-दीड रुपयापर्यंत खाली आला. 

१९७९ साली पूर्ण भारतभरातल्या  शेतकऱ्यांच्या आंदोलनाला वळण देणारी घटना घडली ती म्हणजे शेतकरी संघटनेची स्थापना. ही संघटना कुठल्या राजकीय पुढाऱ्याने काढली नव्हती तर ती बनवली होती एका जागतिक दर्जाच्या अर्थशास्त्र्याने.

शरद जोशी त्यांच नाव.

शेती करायची म्हणून संयुक्त राष्ट्रसंघातली उच्च पदाची नोकरी सोडून भारतात परत आले.

इथे शेती करताना कितीही कष्ट केले तरी शेतमालाला भावचं मिळत नाही हे लक्षात आलं. आणि त्यातून शेतमालास रास्त भाव’ या एककलमी कार्यक्रमासाठी शेतकऱ्याची संघटना उभा केली.

त्यांच्या सर्व मागण्या अर्थशास्त्राच्या कसोटीवर बसणाऱ्या होत्या. देशभरातल्या  कांदा, ऊस, तंबाखू, भात, कापूस, इत्यादी नगदी पिके पिकविणाऱ्या व दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या प्रश्नाविषयी जागृत करून त्यांचा लढा सुरु केला. त्यांच्या आंदोलनाला शेतकऱ्यांनी देखील जोरदार प्रतिसाद दिला.

याच काळात निपाणीमध्ये सुभाष जोशी नावाचा तरुण तंबाखूच्या प्रश्नावर आवाज उठवत होता.

त्याला मोहन धारिया यांचे बंधू गोपीनाथ धारिया यांची साथ होती. धारिया यांची देखील वडिलोपार्जित शेती या भागात होती. तंबाखू शेतकरी, विडी कामगार महिला यांना संघटीत करून त्यांच्यात जनजागृती करण्याचा प्रयत्न सुभाष जोशी यांनी चालवला होता पण या दोघांची ताकद कमी पडत होती.

अखेर सुभाष जोशी यांनी महाराष्ट्रातल्या शेतकरी संघटनेची मदत घ्यायची ठरवली. शरद जोशींना आमंत्रण धाडण्यात आले.

३० जानेवारी १९८१ रोजी शरद जोशी पुण्याहून निपाणीला आले. शरद जोशी येणार आहेत म्हटल्यावर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचा संचार झाला. मोठी गर्दी उसळली.

१ फेब्रुवारी १९८१ रोजी शरद जोशींची पहिली सभा  निपाणीच्या नेहरू चौकात झाली.

या सभेत त्यांनी शेतीवरील खर्चाचा हिशोब मांडला. तंबाखू शेतकरी कर्जबाजारी व व्यापारी मालामाल होत आहे ही वस्तुस्थिती अगदी शास्त्रीय पद्धतीने समजावून सांगितली. शेतकऱ्यानां ती पटली. शरद जोशींचे आंदोलन कव्हर करण्यासाठी बीबीसी या इंग्लिश वाहिनीचे गोरे प्रतिनिधी निपाणीला आले हे बघून तिथले शेतकरी हरखून गेले. आपले आंदोलन योग्य हातात गेले आहे याची त्यांना खात्री पटली.

शरद जोशी यांनी सुभाष जोशी यांच्या साथीने बेळगाव जिल्ह्यात रान उठवले. चिकोडी तालुक्यातील ५१ गावांमध्ये तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सीमाभागातील खेड्यांमध्ये मेळावे भरवण्यात आले. त्यांना जाईल तिथे भरघोस पाठींबा मिळाला होता.

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सीमावर्ती भागातील कन्नड-मराठी भाषिक वाद मागे पडला होता. कर्नाटकवादी नेतेसुद्धा या आंदोलनास पाठींबा देत होते. पण तेव्हा मुख्यमंत्री बनलेले कॉंग्रेसचे गुंडूराव कोणताही प्रतिसाद देत नव्हते.

सरकारकडून ठोस काही घडत नाही आहे हे लक्षात आल्यावर १४ मार्च १९८१ रोजी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग NH-४ वर शेतकरी ठिय्या मांडून बसले. रास्ता रोको आंदोलन सुरु झाले. कर्नाटकातल्या छोट्या छोट्या खेड्यातून आंदोलक आपापल्या शेतीची कामे सोडून तेथे येऊ लागले.

117672263 217084446387147 3336725675985953195 n

शरद जोशी देखील महामार्गावर झोपडी उभारून तेथेच ठाण मांडून बसले होते.

आंदोलकांना यामुळे उत्साह मिळाला होता. आसपासच्या गावातून पिठलं-भाकरी-आंबील आंदोलकांना पुरवल जात होतं.कानडी-मराठी भाषिक स्त्री-पुरुष शेतकरी कामगार एकत्र येऊन लढा देत आहेत हे अभूतपूर्व दृश्य दिसत होतं.

एका भाषणात शरद जोशी म्हणाले,

“आमच्या शेतीमालाला योग्य भाव द्यायला जर गुंडूराव तयार असतील तर अख्खा महाराष्ट्र कर्नाटकात घालायला शेतकऱ्यांच्या वतीने मी तयार आहे. आणि जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अंतुले जर योग्य भाव द्यायला तयार असतील तर अख्खा कर्नाटक महाराष्ट्रात घालायला मी तयार आहे.”

आजवर सीमाभागात राजकारण्यांनी तापवलेला भाषावाद या आंदोलनापासून कोसो दूर लांब पळून गेला होता. भिक नको दाम दे ही घोषणा कर्नाटकातही फेमस झाली होती.

जवळपास तीन आठवडे हे आंदोलन चालले. सरकार शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा बघत होती. गुढीपाडव्याचा दिवस उजाडला, गुंडूराव यांना वाटत होते सणाच्या निमित्ताने तर लोक रास्ता रोको सोडून आपापल्या गावी जातील पण तस झाल नाही. एकही आंदोलक आपली जागा सोडून हलला नाही.

117444906 754604355357990 8403458903133905235 n
आंदोलकांशी चर्चा करताना सुभाष जोशी

६ एप्रिल १९८२ रोजी पहाटे ६ वाजता अनपेक्षितपणे पोलिसांची मोठी तुकडी आंदोलनामध्ये घुसली.

शेतकऱ्यांच्यावर थेट हल्ला केला, आंदोलकांच्या राहुट्या पाडून टाकल्या. शरद जोशींच्या सकट शेकडो आंदोलक ताब्यात घेतले. पण तरीही आंदोलक दबत नाहीत हे पाहिल्यावर आक्रमक भूमिका घेतली. महिला, वृद्ध काही न पाहता थेट लाठीमार सुरु केला. आंदोलकांनी दगडफेक करून प्रतिक्रिया दिली.आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराची नळकांडी फोडण्यात आली.

अखेर जमाव हाताबाहेर चालला आहे हे कारण दाखवून पोलिसांनी अंतिम उपाय बाहेर काढला. तयारीने आलेल्या बंदूकधारी कन्नड पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार सुरु केला. गुंडूराव यांच्या सरकारने निर्दयपणे शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढले.

जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण करून देणारा हा पोलिसांचा गोळीबार होता. १२ शेतकरी मृत्युमुखी पडले, शेकडोजण जखमी झाले. भारताच्या इतिहासातील हा एक काळा दिवस ठरला.

देशभरातल्या कामगार व शेतकरी संघटनानी गुंडूराव सरकारविरोधात आवाज उठवला. वीस दिवसाच्या कारावासानंतर शरद जोशी यांची सुटका कर्नाटक पोलिसांनी केली.

या आंदोलनाचा दबाव म्हणून २० एप्रिल १९८१ रोजी कर्नाटक शासनाने तंबाखू खरेदी-विक्रीसाठी एक सहकारी संस्था स्थापन करण्याची घोषणा केली.

१ मे १९८१ ला कामगार दिनानिमित्त शरद जोशींची सभा घेण्याच ठरल. मात्र कर्नाटक सरकारने त्यांना राज्यात प्रवेशासाठी परवानगी नाकारली. अखेर निपाणीच्या अर्जुननगर भागातील एका कॉलेज जवळच्या शेतामध्ये सभा आयोजित केली. गंमत म्हणजे या कॉलेजची इमारत महाराष्ट्रात तर कंपाऊंड कर्नाटक हद्दीत येते.

शरद जोशी भाषण करण्यासाठी उभे राहिले. कर्नाटक पोलिसांनी जबरदस्त बंदोबस्त केला होता मात्र शरद जोशी महाराष्ट्र हद्दीतून भाषण देत होते तर श्रोते कर्नाटकात बसून ऐकत होते. पोलीसांना बघत बसल्यावाचून पर्याय उरला नाही.

प्रसंग म्हणावा तर गंमतीदार आणि म्हटले तर राज्या-राज्यातील सीमा किती तकलादू आहेत हेही दाखवणारा.

फक्त कर्नाटक-महाराष्ट्र नव्हे तर एकूणच भारताच्या सामाजिक चळवळीच्या इतिहासात निपाणीच्या या अभूतपूर्व तंबाखू आंदोलनाचे प्रचंड महत्व आहे. सीमावाद, भाषावाद मोडून कामगार-शेतकरी एकजुटीने रक्त सांडून आपल्या मागण्या मान्य करून घेतात हे देशात पहिल्यांदाच घडल होतं.

फोटो व संदर्भ- ‘अंगारवाटा शोध’ शरद जोशींचा. लेखक भानू काळे

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.