काय म्हणता..!!! शिंदे-ठाकरे एकत्र येणार पण चान्सेस किती आहेत…

गेल्या दोन तीन दिवसांपासून शिंदे आणि ठाकरे गटाच्या एकत्र येण्याच्या चर्चांनी वेग पकडला आहे. त्याला कारण ठरलय ते मंत्री दिपक केसरकर यांच विधान. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आत्मपरिक्षण केल्यास शिवसेना एकसंध होण्यास वेळ लागणार नाही अस केसरकर म्हणाले होते.

यानंतर शिंदे आणि ठाकरे गट एकत्र येण्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध होवू लागल्या. 

केसरकर यांच्या विधानामागची पार्श्वभूमी पाहिल्यास काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे नेते व मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विधानाचा संदर्भ देखील देण्यात येतो. मला अडचणीत आणण्यामागे आमचेच मंत्री असल्याचं विधान त्यांनी केलं होतं. त्यामुळे शिंदे गटातले आमदार नाराज असल्याच्या बातम्या सूरू झाल्या व याच पार्श्वभूमीवर केसरकर यांचे विधान चर्चेचा विषय ठरले.. 

मात्र नेहमीप्रमाणे या शक्यता फेटाळून लावतं संजय राऊतांनी शिंदे गटावर टिकास्त्र उगारलं. ते म्हणालेत की, हे गट टिकणार नाहीत. शिंदे गटातील बरेच आमदार भाजप प्रवेश करतील. शिंदे गटातच गट पडल्याची शक्यता आहे अस संजय राऊत म्हणालेत. मात्र संजय राऊतांच्या वाक्यात खरच दम आहे का? 

शिंदे ठाकरे गट एकत्र येण्याचे चान्सेस किती आहेत पाहूया.. 

  1. शिंदे गटामधील अंतर्गत कुरबुरी 

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड झाले असले तरी या बंडामागे महाशक्ती अर्थात भाजपचा हातभार होता हे उघड सत्य आहे. मात्र त्यातही अनेक आमदारांना थेट देवेंद्र फडणवीस यांच पाठबळ आहे, किंवा एकनाथ शिंदे यांच्याहून अधिक ते फडणवीसांना आपला नेता मानतात. अशा वेळी शिंदे गटातच मुख्यमंत्री शिंदेंना मानणारा एक गट व फडणवीसांना मानणारा एक गट असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशा वेळी फडणवीसांच आक्रमक धोरण कायम राहिलं तर एकनाथ शिंदेंपुढचा एक पर्याय म्हणून पुन्हा ठाकरे गटासोबत तडजोड करण्याची भूमिका राहू शकते. अर्थात भाजप व शिंदे गटातील तडजोड अपेक्षेप्रमाणे झाली नाहीत तर शिंदे गटातील एक गट ठाकरेंसोबत ॲडजेस्ट करू शकतो पण या शक्यता कमी असल्याचा अंदाज विश्लेषकांकडून वर्तवण्यात येतो. 

2) दूसरी शक्यता बोलून दाखवली जाते ती म्हणजे शिंदे आणि ठाकरेंच्या मर्यादा 

एकनाथ शिंदे हे प्रत्यक्ष मैदानावरील नेते आहेत. लोकांशी जोडून घेणं. थेट कनेक्ट असणं हे त्यांच्या कामाच वैशिष्ट राहिलेले आहे. तर दूसरीकडे सभा गाजवणं, भाषण करणं आणि एक भूमिका घेवून पुढे जाणं हे उद्धव ठाकरेंच वैशिष्ट राहिलेलं आहे. जोपर्यन्त पक्षीय राजकारणात उद्धव ठाकरे होते तोपर्यन्त पक्षात काहीच प्रॉब्लेम नव्हते. पण जेव्हा उद्धव ठाकरे सक्रिय राजकारणात येवून आमदार व मुख्यमंत्री झाले तसे पक्षातील नेत्यांना इश्यू येवू लागले.

दूसरीकडे गटनेते असले तरी एकनाथ शिंदे हे एका अर्थाने पक्षप्रमुखच झालेले आहेत. अशा वेळी बंडाच्या पुढे जावून एक स्वतंत्र ओळख मिळवून देण्याचं आव्हान शिंदेवर आहे. दसरा मेळाव्यात फ्लॉप झालेलं भाषण, विचारधारा घेवून करावं लागणार लॉन्ग टर्म राजकारण या ठिकाणी शिंदेंच्या मर्यादा उघड होतात. अशा वेळी एकमेकांच्या मर्यादा मान्य करुन तडजोड करण्याची भूमिका दोन्ही गटांची राहू शकते. 

3) कायदेशीर पातळ्यांवर वेळकाढू धोरणामुळे 

वेळकाढू धोरणांमुळे देखील शिंदे गटातील आमदार अस्वस्थ झाले असल्याचं बोलण्यात येतय. मंत्रीमंडळाचा विस्तार सहा महिने झाले तरी झालेला नाही. दूसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने देखील दिलासा दिलेला नाही. या गोष्टी एकनाथ शिंदेच्या विरोधात गेल्या तर आमदारांना आपलं सदस्यत्व देखील राखणं अवघड ठरणार आहे. त्यासाठी ठाकरेंसोबत किमान चर्चेचा एक मार्ग तरी मोकळा रहावा हे धोरण शिंदे गटातील आमदारांच राहणार आहे. त्यासाठी अशा चर्चा होत असल्याचं बोललं जातय. 

कधीही काहीही होण्याचे चान्स निर्माण झालेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात मात्र शिंदे गटातील आमदार पुन्हा ठाकरे गटात जाण्याचे चान्स नाकारून चालत नाही. पण असा निर्णय घेताना मात्र स्वतंत्र ओळख झालेल्या ठाकरे गटात जाण्यासाठी शिंदे गटातील एकूण आमदारांच्या 1 तृतीअंश आमदारांनी पुन्हा माघारी फिरण्याची गरज कायदेशीर पातळीवर असल्याचं सांगितलं जात आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.