ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळाला तर, भाजपची ताकद किती?

लोकसभा निवडणूकीच्या जागावाटपावरून जेव्हा जेव्हा चर्चा होते. तेव्हा तेव्हा राज्यातील जागावाटपाचा विषय बाजूला पडून ठाणे आणि कल्याण लोकसभेचा वाद शिगेला पोहोचतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दबदबा असलेल्या ठाणे जिल्ह्यातच भाजप-शिवसेना युतीतील सुप्त संघर्ष कित्येक वेळा चव्हाट्यावर आलाय. स्थानिक पातळीवरील हा संघर्ष इतका वाढला होता की, कल्याणचे खासदार आणि मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी थेट राजीनामा देण्याचीच तयारी दर्शवली होती. दुसरीकडे भाजपकडून कल्याण बरोबर ठाणे लोकसभा मतदारसंघावरही दावा करण्यात येत होता, हा एकनाथ शिंदेंवर दबाब टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.

दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमधील वाद टाळायला हवेत. आणि एकमेकांविरोधातील  वाद कमी व्हावेत हे लक्षात घेता महत्त्वपूर्ण निर्णय आता घेण्यात आलाय. त्यानुसार, आता कल्याण लोकसभा मतदारसंघाची लोकसभेची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाने लढवावी अन्‌ ठाणे भाजपला द्यावी, असा प्रस्ताव मांडण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. प्रस्तावानुसार ठाणे लोकसभा भाजपला सोडली तर भाजपची मतदारसंघात ताकद किती हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

भाजपची ताकद पाहण्या अगोदर मतदारसंघाची रचना आपल्याला पहावी लागणार आहे.

ठाणे लोकसभा मतदार संघात ६ विधानसभा मतदारसंघ येतात. ज्यामध्ये मीरा भाईंदर हा मतदारसंघ अपक्ष आमदार गीता जैन यांच्या ताब्यात आहे. ज्यांनी आता भाजपसोबत जवळीक साधली आहे. दुसरा मतदारसंघ आहे कोपरी पाचपाखडी हा मतदारसंघ, हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. तिसरा मतदारसंघ आहे ओवळा माजीवाडा हा शिवसेनेच्या ताब्यात असुन प्रताप सरनाईक हे त्या ठीकाणचे आमदार आहेत.

ठाणे विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार संजय केळकर आहेत, ऐरोली मतदारसंघही भाजपच्या ताब्यात आहे. त्या ठीकाणी गणेश नाईक आमदार आहेत. बेलापूर या मतदारसंघात भाजपच्या मंदा म्हात्रे आमदार आहेत.

ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी ३ आमदार भाजपचे तर एक अपक्ष आमदाराचाही भाजपला पाठींबा आहे.

तसेच कोकण पदवीधर मतदारसंघाचे निरंजन डावखरे भाजपसाठी जमेची बाजू मानली जातात. तर महायुतीत असलेल्या शिंदे गटाचाही दोन जागा आहेत. त्यामुळे मतदारसंघाचा विचार केला तर भाजपची ताकद येथे दिसून येते. महायुतीला टक्कर द्यायची असेल तर मविआला ताकदीचा उमेदवार द्यावा लागणार आहे.

भाजप विरोधात मविआकडे खासदार राजन विचारे सोडले तर दुसरा ताकदीचा उमेदवार नाहीये.

ठाणे लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार राजन विचारे हे दोन टर्मचे खासदार आहेत. गेल्या लोकसभा निवडणूकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांचा पराभव केला होता. आज आनंद परांजपे हे अजित पवार गटात सामिल झालेले आहेत. भाजपला जर ही जागा महायुतीत मिळाली तर आनंद परांजपे यांना या जागेवर पाणी सोडून या ठीकाणी युतीची धर्म पाळण्यासाठी भाजपला मदत करावी लागणार आहे. ज्यामुळे राजन विचारे यांच्या अडचणीत आणखी वाढ होऊ शकते. राजन विचारे यांना गेल्या निवडणूकीत भाजप आणि शिवसेना युतीमुळे सोयीचं झालं होतं. पण, आता राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षातील फुटीचा फटका थेट त्यांना बसताना दिसतोय. कारण एकही विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे नाही.

भाजपने लोकसभा मतदारसंघाची तयारी आत्तापासुन केल्याचं पहायला मिळत आहे. इच्छुक उमेदवारांची चर्चाही सुरू आहे. तसेच काही इच्छुकांनी तर आत्तापासुन कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या भेट घेण्याची सुरवात केल्याचं पहायला मिळत आहे. पण, महाविकास आघाडीकडून कुठल्याही पध्दतीची चर्चा आणि वातावरण निर्मीती सुरू नाही. भाजपने मतदारसंघात चर्चा करत आपली ताकद दाखवायला सुरवात केली आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपला सुटला तर, भाजपकडून कोन उमेदवार असु शकतात ?

तर, ठाणे लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी भाजपकडे होता. शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी पुढे हा मतदारसंघ भाजपकडून हिसकावून घेतला आणि येथून शिवसेनेच्या उमेदवारांना खासदार केल. रामभाऊ म्हाळगी, राम कापसे अशा अभ्यासू खासदारांची परंपरा लाभलेला हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात गेल्याची सल अजूनही भाजपच्या जुन्या जाणत्यांच्या मनात कायम आहे. म्हणून पुन्हा एकदा भाजपने या मतदारसंघावर दावा केला आहे. भाजपकडून ठाण्यातील आमदार संजय केळकर, संजीव नाईक आणि राज्यसभा खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांची नाव चर्चेत आहेत.

 पहिलं नाव चर्चेत आहे आमदार संजय केळकर.. 

संजय केळेकर हे ठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघावर जसा भाजपकडून दावा करण्यात येत होता. तसं एक नाव लोकसभेचे उमेदवार म्हणून चर्चेत होतं ते आमदार संजय केळकर यांच. संजय केळकर यांनी शिंदे गटावर अनेक वेळा अप्रत्यक्षरित्या टीका करत. ठाण्याची जागा ही भाजपचीच होती आणि यापुढेही राहील त्यासाठी आम्ही तयार आहोत असं म्हण्टलं होतं. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलाच वाद रंगला होता. केळकर यांनी ठाण्याच्या जागेवर दावा सांगितल्यानंतर त्यांच्या नावाची चर्चा चांगलीच सुरू झाली होती. ठाणे विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार असल्याने आणि त्यांच्या तयारीने ते पहिल्या पसंतीचे भाजपचे उमेदवार असु शकतात अशी चर्चा आहे. आपल्याला पक्ष देईल ती जिम्मेदारी घ्यायला तयार आहोत. पण, सध्या ठाण्यातील लोकांच काम करण्याला माझं पहिलं प्राधान्य राहीलं असं त्यांनी स्पष्ट केलं.

दुसरं नाव चर्चेत आहे संजीव नाईक..

नवी मुंबईतील मातब्बर नेते गणेश नाईक यांचे पुत्र असलेले संजीव नाईक यांची नवी मुंबईचे महापौर म्हणून कामगिरी दमदार होती. मोरबेसारखे धरण नवी मुंबईकरांना मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहीला आहे. ठाणे लोकसभेसाठी त्यांनी जोरदार तयारी केली आहे. २००९ च्या लोकसभा निवडणूकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवत शिवसेनेच्या विजय चौगुले यांचा पराभव केला होता. ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईदर या शहरात त्यांचा सततचा संपर्क राहिलाय. राज्यात भाजप व सर्वपक्षीय संबंध चांगले ठेवण्यावर त्यांनी भर दिलाय.

ठाणे शहरातील संघ कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशीदेखील ते सलोखा राखून आहेत. २०१४ मध्ये देशभरात आलेल्या नरेंद्र मोदी लाटेत शिवसेनेचे राजन विचारे यांनी संजीव यांचा दोन लाख ८२ हजार मतांच्या फरकाने पराभव केला. २०१९ च्या निवडणुकीत मात्र पक्षश्रेष्ठींचा आग्रह असतानाही नाईक कुटुंबियांनी उमेदवारी घेणे टाळले आणि पुढे भाजपची वाट धरली. प्रिल महिन्यात झालेल्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांनी ठाणे, मीरा भाईंदर शहरात जोरदार वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला. यानिमित्ताने संजीव नाईक यांची ठाणे लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छ जाहीरपणे दिसून आली.

तिसरं चर्चेतलं नाव आहे  खासदार विनाय सहस्त्रबुद्धे..

काही काळापासून ठाणे लोकसभा क्षेत्रातील वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात कमालिचे सक्रिय झाल्याचे पहायला मिळत आहे. नवी मुंबई, मीरा-भाईदर या ठाणे क्षेत्राबाहेरील विधानसभा मतदारसंघात त्यांनी वैयक्तीक भेटी-गाठी, पक्षाचे वेगवेगळे कार्यक्रमांचा धडाका लावला असून नवी मुंबईत गणेश नाईक आणि आमदार मंदा म्हात्रे गटातील समर्थकांच्या स्वतंत्र्य बैठकाही ते घेताना दिसत आहेत. याशिवाय मीरा-भाईदरमध्ये आमदार गीता जैन, माजी आमदार नरेंद्र मेहता तेथील नवनियुक्त अध्यक्षांशी समन्वय साधण्यावर त्यांचा भर असून लोकसभा निवडणुकांच्या निमीत्ताने त्यांच्या वाढत्या बैठकांमुळे त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. भाजपने काही महिन्यांपुर्वी ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या संयोजकपदी सहस्त्रबुद्धे यांची नियुक्ती केलीय.

भाजपने जागावाटपाच्या अगोदरच ठाणे लोकसभेवर दावा करत, तयारी सुरू केल्याची पहायला मिळत आहेत.

भाजपच्या महत्वाच्या नेत्यांचे ठाणे लोकसभा मतदारसंघातील दौरे, चर्चेत असणाऱ्या इच्छुकांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या घेत असलेल्या भेटी पाहूण भाजप या लोकसभेत संपुर्ण ताकदीने उतरणार आहे हे मात्र नक्की. येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत भाजपने जर जागा लढवली. तर, शिंदे गटातील नाराज स्थानिक पदाधिकाऱ्यांशी जे वाद झाले होते. त्या वादावर पडदा टाकुन विचारात घ्यावं लागेल. सध्या तरी हा संपुर्ण वाद मिटल्याचं समोर येत असलं तरीही शेवटपर्यंत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय ठेवणं दोन्ही पक्षाच्या नेत्यांना महत्वाचं असणार आहे. कल्याण लोकसभेत श्रीकांत शिंदेना भाजपला मदत करावी लागेल तर ठाण्यात भाजपला शिंदे गटाने मदत करावी लागणार आहे तेव्हा दोन्ही पक्षाची ताकद दिसून येईल.

ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी सहा विधानसभा मतदारसंघ, इच्छुक उमेदवारांच्या चर्चा आणि त्यांची तयारी, भाजपच्या महत्वाच्या नेत्यांचे मतदारसंघात दौरे आणि कार्यक्रम, विरोधकांची शांतता हे सगळं पहाता सध्या तरी भाजपची ठाणे लोकसभा मतदारसंघात ताकद आहे हे यावरून लक्षात येतं.

हे ही वाच भिडू:

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.