सरकारच्या निर्णया अगोदर मनोज जरांगे यांनी दौरा काढला कारण..

जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या गावात मनोज जरांगे उपोषणाला बसले आणि संपुर्ण महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटले. १४ दिवसानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरावली सराटी या गावात येऊन उपोषण सोडवलं. एक महिन्याचा कालावधीत मराठा आरक्षणा बद्दल भुमिका घेऊ असं आश्वास दिल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी उपोषण अखेर मागे घेतलं. मनोज जरागें पाटलांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलाय. एक महिन्यात जर काही निर्णय झाला नाही. तर, सकरकारला सोडणार नाही असा थेट इशारा त्यांनी दिला.

त्यानंतर मराठवाड्यातील मराठा समाजाला निजामकालीन नोंदीनुसार कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची मागणी झाल्यानंतर गेल्या महिन्या भरापासून महसूल प्रशासनाच्या वतीने मराठवाड्यात कुणबी असलेल्या नोंदीचे अभिलेख तपासण्यात येत आहेत. गेल्या महिनाभरापेक्षा जास्त दिवसांत ६५ लाखांपेक्षा अधिक अभिलेख तपासण्यात आले आहेत. मात्र कुणबी जातीच्या अवघ्या ०.३ टक्के नोंदी आढळून आल्याची माहिती समोर आली. सरकारच्या १२ पेक्षा जास्त विभागात ही तपासणी सुरु आहे.

सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर १९६७ च्या आधीचीसुद्धा सगळी कागदपत्र तपासली जात आहेत. पण, ६५ लाखांपैकी फक्त ५ हजार नोंदी सरकारला सापडल्या आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा सरकार काय निर्णय घेणार याकडे लक्ष तर लागलच आहे. पण, जरांगे पाटील पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. त्यांनी संपुर्ण राज्यभर दौराचं काढला आहे. सरकारच्या निर्णया अगोदर जरांगे पाटील कसे सक्रीय झाले आहेत? जरांगे पाटलांचे पुढचे आंदोलन कसे असणार आहेत जाणून घेऊयात.

मनोज जरांगे पाटलांनी राज्यसरकारचा निर्णय येण्याअगोदरच राज्यभर दौरा काढलाय.

३० सप्टेंबर ते ११ ऑक्टोंबर दरम्यान असा हा दौरा असणार आहे. अंतरवाली सराटीतून या दौऱ्याला सुरवात होणार आहे. पुढे अंबड, घनसावंगी, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, कळमनुरी, उमरखेड, परळी, अहमदनगर, नाशिक, या ठिकाणी हा दौरा करणार आहेत. मनोज जरांगे पाटील या दौऱ्याच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या पुढील लढ्याची तयारी करत आहेत.

कारण १४ ऑक्टोंबरला मराठा समाजाचा मेळावा अंतरवाली सराटी येथे आयोजित करण्यात आलाय.

या मेळाव्याला मराठा समाजातील लोक लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी जरांगे पाटील प्रयत्न करत आहेत. त्यामुळेही त्यांचा दौरा महत्वाचा आहे.

१४ ऑक्टोंबरला होणाऱ्या मेळाव्यात तीस दिवसाच्या देण्यात आलेल्या मुदतीत शासनाने काय निर्णय घेतले आहेत. समितीने काय काय काम केलं. शासन स्थारावर काय काय आध्यादेश निघाले याची माहीती देण्यात येणार आहे. जर सरकारच्या बाजुने कुठलाही मराठा समाजाच्या बाजुने निकाल लागला नाही तर पुढे काय करायचं हेही या मेळाव्यात सांगण्यात येणार आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या लोकांना मेळाव्या संदर्भात जागृत करण्यासाठी आणि त्यांनी या मेळाव्याला हजेरी लावावी यासाठी हा दौरा महत्वाचा

या दौऱ्याच दुसरं एक महत्वाचं कारण मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय. या दौऱ्यातून आपण मराठा समाजातील बांधवानां शांतेत व लोकशाही मार्गाने आंदोलन करा असं आव्हाण करण्यासाठी जात आहे. तसेच मराठा समाजातील तरूणांनी आक्रमक न होता लोकशाही मार्गाने आंदोलन करावं, कुणीही आत्महत्याचा प्रयत्न करून जीव देऊ नये आणि ज्या मराठा समाजातील लोकांना अंतरवाली सराटी या ठीकाणी येता आलं नाही त्यांच्याशी चर्चा करून पुढील काही निर्णय घेण्यासाठी हा दौऱ्याचा उद्देश असणार आहे.

दौऱ्याच्या निम्मित्ताने सरकारला प्रश्न विचारत धारेवर धरण्याचा प्रयत्न होणार.

राज्य सरकारला पुन्हा एकदा जागं करण्यासाठी हा दौरा असणार आहे. कारण मनोज जरांगे पाटील यांनी दौरा करण्याची अगोदर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं,त्यांना पुरावे कुठं मागतायत. आमच्याकडे गाड्याच्या गाडे पुरावे असूनही आम्हाला आरक्षण नाही. दोन दिवसात गुन्हे परत घेतो असे सांगितले होते.परंतु, अद्याप गुन्हे परत घेतलेले नाहीत. यामुळे आता आरक्षणाचा लढा आणखी तीव्र करावा लागणार आहे. असे प्रश्न उपस्थित करत थेट इशारा त्यांच्याकडून देण्यात आलेला आहे.

दौऱ्याचा सर्वात मोठा जर कोणता उद्दैश असणार आहे, तो म्हणजे मेळावा.

जर सरकारने मराठा समाजाच्या बाजुने निकाल दिला नाही तर, पुढची लढाई इथुनच ठरली जाणार आहे. महाराष्ट्रातील अनेक ठीकाणी मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा देण्यासाठी गावागावात उपोषण व आंदोलन करण्यात आली. ती लढाई अधिक होण्यात दौऱ्यामुळे बळ येईल. मराठा समाजाची एकी पुन्हा एकदा या दौऱ्यातून आणि मेळाव्यातून दिसुन येईल. या दौऱ्याच्या निम्मित्ताने ३५ लाख मराठा समाजाचे लोक अंतरवली सराटी या गावात आणण्याचा उद्दैश असणार आहे. एक प्रकारे मराठा समाजाची ताकद दाखवण्याचा प्रयत्न या मेळाव्यात होणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांच उपोषण सोडवण्यासाठी सरकारने एक महिन्याचा वेळ मागीतला होता तो देण्यात आला. पण, आता मनोज जरांगे पाटील आणखी वेळ सरकारला देणार नाहीत हे त्यांनी ठाम केलं आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात तयारीने उतरताना पहायला मिळत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हा दौरा असल्याचं बोललं जात आहे. मनोज जरांगे पाटलांनी तर आता आपली तयारी सुरू केली आहे.

हे ही वाच भिडू:

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.