नितीश कुमारांचे विधान ‘सेक्स एजुकेशन’ की ‘अश्लीलता’?

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आधी विधानसभेत आणि त्यानंतर विधान परिषदेत लोकसंख्या नियंत्रणाबाबत बोलतांना अश्लील वक्तव्य केलं आणि एकच गदारोळ झाला. त्यांच्या हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतो आहे. त्यांच्या वक्तव्यावरून विरोधकांनी त्यांना धारेवर धरलंय, तर महागठबंधनमधील त्यांचे सहकारी राष्ट्रीय जनता दलचे नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी त्यांची पाठराखण करत ‘मुख्यमंत्री सेक्स एजुकेशन बद्दल बोलत होते आणि त्यात काही गैर नाही’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. परंतु नितीश कुमारांनी मांडलेला मुद्दा अश्लीलतेपेक्षा खूप मोठा आहे. तो कसा,

सर्वात आधी पाहूयात नितीश कुमार विधिमंडळात काय बोलले…

बिहार विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मंगळवारी मांडण्यात आलेल्या जातीय सर्वेक्षण अहवालावरील चर्चेनंतर मुख्यमंत्री उत्तर देत होते. उत्तर देतांना मुख्यमंत्री लोकसंख्या नियंत्रणाबाबत बोलायला लागले. जर महिला शिक्षित असतील तर fertility Rate किंवा प्रजनन दर खात्रीशीररित्या कमी होईल. त्यांचा एवढाच मुद्दा होता. पण याबाबत बोलतांना नवरा बायको रात्री बेडमध्ये काय करतात, याबाबतचे डिटेल्स मुख्यमंत्री भर विधानसभेत सांगत बसले. या सगळ्यांच लाईव्ह प्रक्षेपण सुरू होतं. त्यामुळे काही वेळातच हा राष्ट्रीय मुद्दा झाला. परंतु सुशिक्षित पत्नी प्रेग्नंसीची शक्यता टाळते आणि त्यामुळे बर्थ रेट किंवा जन्मदर घटला आहे असं मुख्यमंत्र्यांच म्हणण होतं. याबाबत त्यांनी खुलासाही केला आहे. याशिवाय माझ्या बोलण्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो असं म्हणून त्यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

या सगळ्या बातम्यांमध्ये आपण सर्वात महत्त्वाचा मुद्दा हरवून बसलो तो म्हणजे शिक्षण आणि बर्थ कंट्रोल यांचा संबंध.. तो कसा ते समजून घेऊ.

तो समजून घेण्याआधी बिहारच सध्याचा fertility Rate किंवा प्रजनन दर किती आहे आणि काळानुरूप त्यामध्ये कसा बदल झाला आहे ते समजून घेणं महत्त्वाचं ठरत. त्याआधी प्रजनन दर म्हणजे काय ते समजून घेऊ. प्रजनन दर म्हणजे एका वर्षात १५ ते ४९ वयातील एक हजार महिलांमागे किती बाळांचा जन्म झाला यावरून प्रजनन दर ठरवला जातो. प्रजनन दरावरूनच बर्थ रेट किंवा जन्मदर काढला जातो. जन्मदार हा एकूण लोकसंखेच्या प्रमाणात काढला जातो तर प्रजनन दर फक्त बाळाला जन्म देऊ शकणाऱ्या वयातील महिलांच्या प्रमाणात काढला जातो. यानुसार बिहारचा प्रजनन दर पहिला तर तो सध्या ३ आहे. याची तुलना भारत आणि महाराष्ट्राच्या दराशी केली तर

भारताचा प्रजनन दर २ आहे तर महाराष्ट्राचा १.७. बिहारच्या किशनगंज सारख्या काही जिल्ह्यांमध्ये प्रजनन दर ४.८ ते ५ इतका आहे.

१९९२-९३ साली बिहारच प्रजनन दर ४ होता. ही सगळी आकडेवारी २०१९-२१ च्या पाचव्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून घेण्यात आली आहे. याच आकडेवारीचा आधार घेऊन नितीश कुमारांनी विधानसभेत हे वक्तव्य केलंय. आम्ही महिलांना शिक्षण दिल्यामुळे प्रजनन दरात घट झाली आहे असा दावा नितीश कुमारांनी केला आहे.

परंतु खरंच मुलींचे शिक्षण आणि प्रजनन दर घटण्यात काही संबंध आहे का?

याबाबत बोलतांना पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालक पूनम मुतरेजा सांगतात, ‘१९५१ मध्ये, भारताचा एकूण प्रजनन दर सुमारे ६ होता जो आता २ आहे. पाचव्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात हे स्पष्टपणे दिसून आलं आहे की, ज्या भागात स्त्रिया शिक्षित आहेत तिथं त्यांना कमी मुलं होतात. यासोबतच सरकारच्या कुटुंब कल्याणाशी निगडीत विविध योजनांचा यात महत्त्वाचा वाटा आहे. ‘भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशातील हिंदू कुटुंबांमध्ये प्रजनन दर २.२९ आहे. तेच तामिळनाडूमध्ये मुस्लिम महिलांसाठी हाच दर १.९३ आहे. त्यामुळे हा दर धर्माऐवजी शिक्षण आणि आर्थिक कारणांशी जोडला पाहिजे. कारण जिथं स्त्रिया शिक्षित आहेत तिथं त्या कमी मुलांना जन्म देतात.’ असं पूनम मुतरेजा याचं म्हणणं आहे.

बिहारची साक्षरतेची आकडेवारी पहिली तर बिहारमध्ये साक्षरतेचा दर ६१ टक्के आहे. त्यात पुरुष साक्षरता ७१.२० टक्के आहे तर स्त्री साक्षरता ५१.५० टक्के. २००१ च्या जनगणनेची आकडेवारी पहिली तर हाच दार फक्त ४७ टक्के होता. ज्यामध्ये पुरुष ५९.६८ टक्के तर स्त्रीया ३३.१२ टक्के साक्षर होत्या. त्यामुळे २० वर्षात ३३ वरून ५१ टक्के अशी १८ टक्क्यांची मजल चांगली असली तरी ती देशाच्या आणि इतर राज्यांच्या तुलनेत चांगली नाही.

भारताचा साक्षरतेचा दर ७७.७ टक्के आहे. यामध्ये पुरुषांचा साक्षरता दर ८४.७ तर स्त्रियांचा ७७ टक्के.

यावरून बिहारला अजून बरीच मजल मारायची आहे, हे स्पष्ट होतं. परंतु मागील काही काळात स्त्री साक्षरतेत झालेली वाढ बिहारमध्ये प्रजनन दर कमी करण्यासाठी थेट कारणीभूत आहे असं अनेक तज्ञांच म्हणण आहे. महिलांमध्ये साक्षरतेच प्रमाण वाढल्याने बिहारमध्ये गर्भनिरोधक साधनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गर्भनिरोधक साधनं वापरण्यात बिहार टॉप तीन राज्यांमध्ये आहे. याशिवाय दोन पाल्यानंतर नसबंदीच्या शस्त्रक्रियांमध्येही वाढ झाली आहे.

परंतु मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे हा मुद्दा मांडला त्यामुळे मूळ मुद्दा सोडून इतरच गोष्टींचीच चर्चा अधिक होऊ लागली. पण पब्लिसिटी ही पब्लिसिटी असते. मग ती नेगेटिव्ह असो की पॉजिटीव्ह. हे प्रकरण आणि बिहार सरकारने केलेले जात सर्वेक्षण यामुळे जवळ जवळ राजकीय वनवासात गेलेले नितीश कुमार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नितीश कुमार नेहमीच कमबॅक करण्यात आणि राजकारणात रिलेव्हंट राहण्यात माहीर आहेत हा आत्तापर्यंतचा इतिहास सांगतो. त्यामुळे आता नितीश कुमार या प्रकरणाचा स्वतःच्या फायद्यासाठी कसा वापर करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाच भिडू:

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.