काशी प्रमाणेच पंढरपूर कॉरिडोर मध्ये सुद्धा ऐतिहासिक वास्तूंचं नुकसान होणार आहे

काशी विश्वनाथ कॉरिडोर प्रमाणेच पंढपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर ते चंद्रभागेच्या घाटापर्यंत कॉरिडोर विकसित करण्याचा आराखडा बनवण्यात आला आहे. एकूण २,००० कोटी रुपयांचा हा प्रकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो.

या प्रकल्पासाठी मंदिर परिसरापासून वाळवंटापर्यंतच्या परिसरातील अनेक घरं आणि ऐतिहासिक वास्तू अधिग्रहित करण्याचा प्लॅन बनवण्यात आलाय. या कॉरिडोर प्रोजेक्टमध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू आणि घरं पाडली जाणार असल्यामुळे या प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध सुरु केला आहे.

हा विरोध दुसरं तिसरं कोणीच करत नसून, खुद्द भाजपमधूनच होत आहे.

‘स्थानिक घरं आणि ऐतिहासिक वस्तूंचं नुकसान करणारा हा प्रकल्प रद्द न झाल्यास भाजपचे स्थानिक नेते सामूहिक राजीनामे देतील.’ असं भाजपचे पंढरपूर शहराध्यक्ष विक्रम शिरसाठ यांनी म्हटलंय. पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सुद्धा यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदने दिली आहेत, असं शिरसाठ यांनी सांगितलं.

तर पंढरपूर संत भूमी बचाव समितीचे अध्यक्ष आदित्य फत्तेपुरकर यांनी पंढरपूरला कर्नाटकात विलीन करण्याचा इशारा दिला आहे. 

“पंढरपुरवर हा प्रकल्प अन्यायाने लादला जात असेल तर आम्हाला पंढरपूर कर्नाटकमध्ये विलीन करण्याची मागणी करावी लागेल. पुढील आषाढीच्या पूजेसाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पूजेला बोलवावं लागेल, असं आदित्य फत्तेपुरकर यांनी म्हटलंय.

परिसरातील तब्बल २२ रस्त्यांचं रुंदीकरण करून विकसित करण्यात येणाऱ्या या कॉरिडोर प्रकल्पाला स्वतः पंढरपूरच्या लोकांकडून विरोध होत आहे. त्यामुळे हा प्रकल्प थांबवण्यात येईल की, पूर्ण होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पण हा कॉरीडोर पूर्ण झाल्यास इथे असलेले दोन ऐतिहासिक वाडे पाडले जाण्याचा धोका आहे.

मंदिराकडून चंद्रभागेच्या वाळवंटाकडे जातांना घाटाच्या किनाऱ्यावर दोन ऐतिहासिक वाडे लागतात. डाव्या हातावर लागतो अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला होळकर सरकार वाडा आणि राम मंदिर. तर उजव्या हातावर बायजाबाई शिंदे यांनी बांधलेलं शिंदे सरकार वाडा आणि कृष्ण मंदिर. मराठा साम्राज्यातील महत्वाच्या घराण्यांनी बांधलेले हे वाडे आजही इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. 

यातील पहिला वाडा आहे होळकर सरकार वाडा. 

इंदौर संस्थानाच्या महाराणी अहिल्याबाई होळकर या धार्मिक स्वभावाच्या होत्या. त्यांनी देशभरातील अनेक महत्वाच्या तीर्थस्थळांमध्ये भाविकांची सोया व्हावी यासाठी तब्बल १ हजार ६०० वाडे बांधले होते. त्यातीलच एक वाडा म्हणजे पंढरपुरातील होळकर सरकार वाडा.

आज २५५ वर्ष जुन्या असलेल्या या वाड्याची पायाभरणी १७५४ सालात करण्यात आली होती. १२५ खानाचा हा वाडा तब्बल २ एकर जमिनीवर विस्तारलेला आहे. या वाड्याचा मुख्य दरवाजा पश्चिमेला असून वाड्याला २ चौक आहेत. त्यानंतर पूर्वेकडील दरवाज्यातून चंद्रभागेच्या तीरावर जाता येते.

महादेवाच्या निस्सीम भक्त असलेल्या अहिल्याबाईंनी या वाड्यात सुद्धा महादेवाचं मंदिर बांधण्याचं ठरवलं होतं. 

परंतु जेव्हा या वाड्याच्या पायाभरणीसाठी इथे खोदकाम करण्यात आलं तेव्हा इथे हनुमानाची मूर्ती सापडली. ही माहिती अहिल्याबाईंना कळवण्यात आली. ही बातमी ऐकून अहिल्याबाईंनी महादेवाचं मंदिर बांधण्याचा निर्णय रद्द केला आणि हनुमानाच्या जोडीला श्रीरामाचं मंदिर बांधण्याचे आदेश दिले. त्यानंतर वाडा आणि मंदिराचं बांधकाम सुरु करण्यात आलं.

या मंदिरासाठी दगड आणि विटा इथल्याच वापरण्यात आल्या परंतु वाड्याचं लाकूड मात्र मध्य प्रदेशाच्या जंगलातून आणण्यात आलं. 

पण ही लाकडं पंढरपूरला जमिनीवरून आणण्यात आली नाहीत, तर जलमार्गाने आणण्यात आली. सर्वात आधी लाकडं तोडून ती नर्मदा नदीत टाकण्यात आली. नर्मदा नदीतून ही लाकडं वाहत वाहत समुद्राच्या तोंडाशी पोहोचली. त्यानंतर समुद्रमार्गाने ही लाकडं रत्नागिरीच्या किनाऱ्यावर आणण्यात आली. तेथून ही लाकडं हत्तीच्या माध्यमातून पंढरपूरला पोहचवण्यात आली.  

१३ वर्ष बांधकाम चालेला हा वाडा १७६७ मध्ये बांधून पूर्ण झाला आणि चैत्र शुद्ध प्रतिपदेला या वाड्याची वास्तुशांती करण्यात आली

परंपरेप्रमाणे वाडा बांधून पूर्ण झाल्यावर वाड्याच्या भिंतीवरून हत्ती सुद्धा चालवण्यात आले होते. या वाड्यात घोड्यांची पाग, गौशाळा, पालखी ठेवण्याची जागा, स्वयंपाकघर आणि तुळशीबाग सुद्धा बनवण्यात आली होती. 

वाड्याच्या दक्षिण भागात दोन मंडपाचे राम मंदिर आहे. यात श्रीराम आणि सितेच्या संगमवरी मुर्त्या आहेत. तर पूर्व भागात खोदकामात सापडलेली दास मारुतीचं मंदिर आहे. तसेच वाड्यात काशीराम दादा होळकर यांनी स्थापन केलेली अहिल्या बाई होळकरांची संगमवरी मूर्ती सुद्धा आहे. 

होळकर वाड्याच्या समोर दुसरा वाडा आहे, ज्याचं नाव आहे शिंदे सरकार वाडा. 

ग्वालियर संस्थानाचे संस्थापक महादजी शिंदे यांच्या सुनबाई आणि दौलतराव शिंदे यांच्या पत्नी बायजाबाई शिंदे यांनी १८४९ साली शिंदे सरकार वाड्याचं बांधकाम केलं होतं. तसेच वाड्यात द्वारकाधिश श्रीकृष्णाचं मंदिर बांधलं होतं. गेली १७३ वर्षांपासून उभ्या असलेल्या या वाड्याला सुद्धा वैभवशाली इतिहास लाभलेला आहे.

शिंदे घराण्याचे संस्थापक महादजी शिंदे हे माळकरी होते. त्यांनी ह. भ. प. मलाप्पा वासकर यांच्याकडून माळ घातली होती. तेव्हापासून शिंदे घराणे हे कृष्ण आणि विठ्ठलाचे भक्त राहिले आहे. याच विठ्ठलभक्तीमधून बायजाबाई शिंदे यांनी पंढरपुरात कृष्ण मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला.

या वाड्याचं आणि मंदिराचं बहुतांश बांधकाम दगडातच करण्यात आलं आहे. तर बाकी बांधकामासाठी विटा आणि लाकडाचा वापर करण्यात आला आहे.  

१२५ खाणी या वाड्याला दोन चौक आहेत. याच्या दर्शनी चौकात द्वारकाधिश श्रीकृष्णाचं मंदिर बांधण्यात आलं आहे. २४ दगडी खांबांवर बांधण्यात आलेल्या या मंदिराचं छत सुद्धा दगडाचंच आहे. गाभाऱ्याच्या दरवाजावर चांदीच सुरेख नक्षीकाम करण्यात आलं आहे.

गर्भगृहामध्ये श्रीकृष्णाची चतुर्भुज मूर्ती आहे तर कृष्णाच्या शेजारी रुक्मिणी आणि सत्यभामेच्या मुर्त्या आहेत. उजव्या बाजूला बायजाबाई शिंदे यांची सुद्धा पूजामुद्रेतील मूर्ती आहे. मुर्त्यांची प्राणप्रतिष्ठा करतांना स्वतः बायजाबाई शिंदे हजर होत्या. 

मूर्तीच्या डोक्यावर चांदीचं सुंदर नक्षीकाम केलेली छत्री आहे. तर सभामंडपात शिंदे घराण्यातील सर्व राजांचे फोटो आहेत. वाड्याच्या चहूबाजूला भक्तांना राहण्यासाठी ओवऱ्या सुद्धा बांधण्यात आल्या आहेत. हा १२५ खणी सुरेख आणि दगडी वाडा बांधण्यासाठी एकूण सव्वा लाख रुपये खर्च करण्यात आले होते.

काशी विश्वनाथ कॉरिडोर बांधतांना अनेक ऐतिहासिक वाडे पाडण्यात आले होते. पूर्वीच्या श्रीमंत जमीनदारांपासून स्वातंत्र्य सैनिकांनी वास्तव्य केलेल्या ऐतिहासिक वाद्यांचा त्यात समावेश होता. तशाच पद्धतीने पंढरपुरात दोन-अडीचशे वर्षांच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देत असलेले हे वाडे सुद्धा इतर घरांप्रमाणेच पाडण्यात येतील का? असा प्रश्न सामान्यांच्या मनात पडला आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.