“मिशन मराठवाडा” आखलंय, खरं मराठवाड्यात शिवसेनेची ताकद किती आहे..?

तब्येतीच्या कारणास्तव गेली एक वर्ष शांत असलेले मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आता आक्रमक झाल्याचे दिसून येतेय…

“माझी मणक्याची शस्त्रक्रिया मी तुमच्यासाठी केली आहे, आता बस झालं, मी घराबाहेर पडणार आणि सगळा महाराष्ट्र पिंजून काढणार,”

असं म्हणत त्यांनी शिवसैनिकांना सज्ज राहण्यास सांगितले आहे.

मराठवाड्यावर सर्वाधिक लक्ष द्या…

असे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेत. 

सेनेच्या आमदार, खासदारांनी पक्षाच्या “आगामी शिवसंपर्क अभियानाचा अहवाल” उद्धव ठाकरेंना सादर केला, त्यात मुख्य भर मराठवाड्यावर देण्यात आल्याचं कळतंय. त्यात मिशन मराठवाडा आखण्यात आलं आहे. 

त्यानुसार उद्धव ठाकरेंनी खासदार, प्रवक्त्यांसोबत बैठकांचा आणि सभांचा सपाटा चालू केलाय. मागेच त्यांनी सर्व जिल्हा प्रमुखांची तातडीची बैठक बोलावली होती. तर काही जिल्हाप्रमुखांना उद्धव ठाकरे ऑनलाईनच्या माध्यमातून मार्गदर्शन करतच आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या औरंगाबादेतील सभेला करारा जबाब देण्यासाठी ८ जूनला उद्धव ठाकरे यांची औरंगाबादेत भव्य सभा होणार आहे.

शिवसेनेने आता “मिशन मराठवाडा” आखलं आहे…मात्र हे लक्षात घेतलं पाहिजे की, मराठवाड्यात शिवसेनेची ताकद किती आहे ?

याबाबत काही प्रश्न निर्माण होतात ते म्हणजे,

  • संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना खरंच पसरली आहे का ?
  • कधीपासून ? त्याचा इतिहास काय आहे ?
  • सेनेच्या मराठवाड्यात विधानभेच्या जागा, लोकसभेच्या जागा किती ?

१९६६ मध्ये शिवसेना स्थापन झाली. त्यानंतर १९८० च्या दशकात मराठी बांधवांचा पक्ष म्हणून समोर आलेला शिवसेना पक्ष हळूहळू हिंदू बांधवांचा पक्ष अशा दुहेरी अशा भूमिकेत आला. 

त्याच्याच पुढच्या दशकात मराठवाड्याचा पक्ष अशा आणखी एका भूमिकेत शिवसेना समोर आली.

१९७० ते १९८४ पर्यंत सेनेची ताकद मर्यादित होती. १९८९ मध्ये भाजप-सेने युती झाली आणि त्यानंतर २००९ पर्यंतच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणूका दोन्ही पक्षांनी एकत्रित लढवल्या.  

यात १९८९ ते २००९ दरम्यान मराठवाड्यात शिवसेनेचा विस्तार झाला. मुंबई, कोकण नंतर मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला. १९८७-८८ च्या काळात औरंगाबाद शहरात शिवसेनेची पहिली शाखा सुरू करण्यात आली. त्याच वर्षी झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणूकीत शिवसेनेचा २८ जागांवर विजय झाला. औरंगाबाद शहराच्या राजकारणातून शिवसेना मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात पसरू लागली. 

सेनेची लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेची संपूर्ण महाराष्ट्रातील कामगिरी पाहिल्यास…

१९८९ : ४ जागा जिंकल्या,

१९९१ : ४ जागा जिंकल्या

१९९८ : ६ जागा जिंकल्या

१९९९ : १५ जागा जिंकल्या

२००४ : १२ जागा जिंकल्या

२००९ : ११ जागा जिंकल्या.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सेनेने संपूर्ण महाराष्ट्रात २० जागा लढवल्या त्यातील १८ जागा जिंकून आणल्या. तर २०१९ मध्ये २३ जागा लढवल्या त्यातील १८ जिंकून आणल्यात.

तर फक्त मराठवाड्यातील ताकदीवर लक्ष द्यायचं झालं तर गेल्या २०१४ मध्ये मराठवाड्यातून लोकसभेच्या ३ जागा सेनेला जिंकता आल्या आणि २०१९ मध्ये देखील ३ जागा सेनेने जिंकल्या होत्या.

  • २०१४ मध्ये परभणी- संजय जाधव, औरंगाबाद – चंद्रकांत खैरे, उस्मानाबाद – रवींद्र गायकवाड.
  • २०१९ मध्ये परभणी- संजय जाधव, हिंगोली – हेमंत पाटील, उस्मानाबाद – ओमराजे निंबाळकर.

शिवसेनेची विधानसभेतील १९९० पासून ते २०१९ पर्यंतची जिल्हानिहाय ताकद पाहूया, 

मराठवाड्यात एकूण ८ जिल्हे आहेत, त्यापैकी 

औरंगाबाद : 

शिवसेनेची मराठवाड्यातील पहिली शाखा औरंगाबादेत सुरू झाली. त्या औरंगाबादेतली सेनेची कामगिरी कामगिरी पाहिली तर,

१९९० ते २००४ पर्यंत विधानसभा निवडणूकीत सेनेने प्रत्येक वेळेस जिल्ह्यात ५ जागांवर आपले उमेदवार उभे केले त्यापैकी १९९० मध्ये ३ जागा जिंकून आणल्यात,  १९९५- २ जागा,  १९९९ – ३ जागा. २००४ – ४ जागा जिंकून आणल्या. तर २००९ च्या विधानसभा निवडणूकीत सेनेने ६ जागा लढवल्या त्यापैकी २ जागा जिंकून आणल्या. सेनेने २०१४ मध्ये ३ जागा जिंकल्या तर २०१९ मध्ये ६ जागा जिंकल्या.

औरंगाबादचे शिवसेनेत विशेष महत्व आहे, औरंगाबादने गेल्या ३७ वर्षांत २०१९ मधला लोकसभा निवडणुकीतील पराभव सोडला तर बाकी शिवसेनेच्या वाट्याला कधी पराभव येऊच दिला नाही. म्हणूनच या ज्या जिल्ह्याने महापौर, आमदार, मंत्री, खासदार अशी अनेक पदं पाहिलीत.

जालना : १९९० ते २००९ या काळात सेनेने जालना विधानसभा निवडणूकीत प्रत्येक वेळेस जिल्ह्यात ३ जागांवर आपले उमेदवार उभे केले त्यापैकी १९९० – २ जागा, १९९५ – ३ जागा, १९९९ – १ जागा, २००४ -१ जागा, २००९ मध्ये १ जागा, २०१४ मध्ये देखील सेनेने १ च जागा जिंकली. २०१९ मध्ये एकही जागा सेनेला जिंकता आली नाही. 

नांदेड :  १९९० ते २००९ हा काळ पाहता, सेनेने नांदेडमध्ये १९९० मध्ये ६ जागा लढवल्या त्यापैकी सेनेला १ च जागा जिंकता आली. त्यानंतर १९९५ मध्ये सेनेने ७ जागा लढवल्या त्यापैकी ३ जागा जिंकल्या, १९९९ मध्ये ७ जागांपैकी ४ जागा जिंकल्या, २००४ मध्ये ५ जागा लढवल्या आणि त्यापैकी ३ जागा जिंकल्या आणि २००९ मध्ये ७ जागा लढवल्या आणि एकाही जागेवर सेनेला विजय मिळवता आला नाही. २०१४ ला ४ जागेवर सेनेने विजय मिळवला तर २०१९ मध्ये १ च जागा जिंकता आली.

लातूर : १९९० ते २००९ या काळात सेनेने लातूर विधानसभा निवडणूकीतली कामगिरी पाहिली तर, १९९० मध्ये सेनेने ४ जागा लढवल्या तर १९९५ मध्ये ३ जागा लढवल्या मात्र दोन्ही विधानसभा निवडणुकीत सेनेला एकाही जागेवर यश मिळालं नाही.  १९९९ मध्ये सेनेने २ जागा लढवल्या त्यापैकी एका जागेवर यश मिळालं. २००४ मध्ये सेनेने १ च जागा लढवली आणि जिंकून आणली. मात्र २००९ मध्ये २ जागा लढवल्या आणि दोन्ही जागेंवर सेना यश मिळवू शकली नाही. हीच स्थिती २०१४ आणि २०१९ च्या विधानसभेत देखील होती. 

लातूर जिल्ह्यातील मतदारसंघ बांधणीत शिवसेना आजही शून्यावरच आहे. कारण मागील लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातुन शिवसेनेकडून सचिन देशमुख उभे होते मात्र त्यांना  मिळालेली मते नोटापेक्षा कमी होती. 

बीड : १९९० च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने ४ जागांपैकी १ जागा जिकून आणली, १९९५ मध्ये ३ जागा लढवल्या त्यापैकी १ जागा जिंकली, त्या नंतर १९९९,२००४,२००९ प्रत्येक निवडणुकीत प्रत्येकी १ च जागा लढवली त्यापैकी २००४ मध्ये १ च जागा जिंकून आणता आली आणि बाकी दोन्ही विधानसभेत सेना अपयशी ठरली. अशीच परिस्थिती २०१४ आणि २०२९ मध्ये देखील राहिली कारण दोन्ही विधान सभा निवडणुकीत सेनेला एकही जागा जिंकता आली नाही.

जिल्हानिहाय आकड्यांची ताकद पाहता बीड आणि लातूरमध्ये शिवसेनेची २००९ पर्यंतची कामगिरी क्षीण आहे.

मात्र अलीकडील परस्थिती पाहता,

२०१९ मध्ये राष्ट्रवादीचे मोठे नेते असणारे आणि २००९ आणि २०१४ असे सलग दोन वेळेस आमदार म्हणून निवडून येणारे जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आणि बीडमध्ये कमकुवत असलेल्या सेनेला जयदत्त क्षीरसागर यांच्या रूपाने स्ट्रॉंग उमेदवार मिळाला होता. जयदत्त क्षीरसागर आणि राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर या काका-पुतण्याच्या लढतीत संदीप क्षीरसागर यांनी बाजी मारली.  

खरं तर बीड सेनेसाठी महत्वाचा मतदार संघ आहे. कारण सुरेश नवले, सुनील धांडे हे बीडमधून निवडून आलेलेत. आता इथून पुढे जयदत्त क्षीरसागर यांच्यामुळे शिवसेनेचा वरचष्मा पाहायला मिळू शकतो. 

परभणी : ९९० ते २००९ या काळात सेनेने लातूर विधानसभा निवडणूकीत १९९० मध्ये ४ जागा लढवल्या आणि ३ जागांवर विजय मिळवला. १९९५-१९९९- २००४ सलग तीन वर्षे सेनेने परभणीत ५ उमेदवार उभे केले आणि अनुक्रमे ३-४-१ अशा जागा सेनेला जिंकता आल्या आणि २००९ मध्ये सेनेने ३ जागा लढवल्या आणि २ जागांवर विजय मिळवला. तर २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येकी एक-एक जागा सेनेला जिंकता आली. 

हिंगोली : १९९० मध्ये सेनेने १ जागा लढवली आणि जिंकून आणली. त्यानंतर १९९५ मध्ये एक जागा लढवली जी जिंकता आली नाही. १९९९ मध्ये १ जागा लढवली आणि तीही जिंकून आणता आली नाही. त्यांनतर २००४ आणि २००९ मध्ये २ जागा लढवल्या मात्र २००४ मध्ये १ जागा जिंकून आणली तेच २००९ मध्ये सेनेला एकही जागा जिंकता आली नाही. मात्र २०१४ ला आणि २०१९ ला सेनेला येथे अनुक्रमे १-१ जागा जिंकता आली.

उस्मानाबाद : १९९० मध्ये ४ जागा लढवल्या त्यात एकही जागा जिंकता आली नाही. १९९५ मध्ये ५ जागा लढवल्या त्यात ३ जागा जिंकल्या, १९९९ मध्ये ५ पैकी २ जागा जिंकल्या, २००४ मध्ये ४ जागा लढवल्या त्यात २ जागा जिंकल्याचा तर २००९ मध्ये ३ जागा लढवल्या २ जागा जिंकल्या. २०१४ च्या सालात सेनेने इथे १ चा जागा जिंकली तर २०१९ मध्ये ३ जागा जिंकून आणल्या.  सद्या या जिल्ह्यात सेनेचे ३ आमदार आणि १ खासदार एवढी ताकद आहे.

तसेच शिवसेनेच्या मिशन मराठवाडा अंतर्गत “शिवसंपर्क अभियान” महत्वाचं ठरणार आहे आणि या अभियानात सेनेच्या जिल्हानिहाय संपर्कप्रमुखांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यानुसार,

औरंगाबाद जिल्ह्याचे विनोद घोसाळकर हे संपर्कप्रमुख आहेत ज्यांची ८ वर्षांपूर्वी नेमणूक झाली होती. तर लातूरचे संपर्क प्रमुख संजय मोरे हे आहेत जे ठाण्याचे माजी महापौर होते. तर उस्मानाबाद जिल्ह्याला तानाजी सावंत यांच्या रूपाने चांगला खमक्या नेता संपर्क प्रमुख म्हणून मिळाला आहे.

परभणी जिल्ह्यासाठी अलीकडेच राजेंद्र साप्ते यांची संपर्क प्रमुख म्हणून निवड झाली आहे. तर हिंगोली, नांदेड आणि बीड या जिल्ह्यांचे संपर्कप्रमुख म्हणून मुलुंडच्या आनंद जाधव यांच्याकडे आहे…

मात्र अशीही माहिती मिळतेय की, “मिशन मराठवाडा” नुसार आता नवे संपर्क प्रमुख नेमले जाणार

शिवसेनेचं ‘मिशन मराठवाडा’ नुसार,

उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे,

पूर्वी शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या जिल्ह्यांवर पक्ष विशेष लक्ष घालणार आहे. तसेच नांदेड-परभणी -जालना या जिल्हे सेना काबीज करणार आहे. थोडक्यात मराठवाड्यात पक्ष वाढीवर स्वतः मुख्यमंत्री, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पक्षाचे आमदार, खासदार कष्ट घेणार आहेत.

मिशन मराठवाडा कितीपत यशस्वी होणार आहे हे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये कळेलच…तसेच येत्या ८ जूनला होणाऱ्या औरंगाबाद येथील उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर या मिशनला खरी सुरुवात होईल…

मराठवाड्यातली शिवसेनेची ताकद आणि त्याचा इतिहास बघता हे पाहणं महत्वाचं आहे की, दुष्काळग्रस्त मराठवाड्यात शिवसेनेला संजीवनी मिळणार का..

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.