शिवराज्याभिषेक सोहळ्यातील काही अपरिचित नोंदी

शिवरायांचा राज्याभिषेक ही युगप्रवर्तक घटना होती. या प्रसंगी अशा अनेक गोष्टी झाल्या ज्यांची नोंद इतिहासाने घेतली पण आजही सर्वसामान्य जनता या वैभवापासून अनभिज्ञ आहे.

त्यांना एकत्रितरीत्या मांडण्याचा हा प्रयत्न..

शिवरायांनी राज्याभिषेकासमयी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. स्वराज्याचा अधिकृत ध्वज म्हणून भगव्या झेंड्याला मान्यता दिली, तर स्वराज्याच्या कोणत्याही राष्ट्रीय उत्सवाच्या वेळी ‘जरीपटका’ फडकवण्याचा आदेश दिला.

शिवरायांनी स्वराज्याची स्वतंत्र चलनव्यवस्था उभी केली.

म्हणजे महाराजांच्या राज्यात त्यांच्याच नावाने पाडलेली नाणी फिरू लागली. यामार्गे शिवरायांनी स्वतःची अर्थव्यवस्था प्रणाली उभी केली. शिवरायांनी शिवशक सुरू केला. एक नवीन कालगणना भारताच्या इतिहासाला उपलब्ध झाली.

शिवरायांनी राज्याभिषेकाप्रसंगी २ मुद्रांचा स्वीकार केला. आपले पराक्रमी पिता शहाजी महाराजांनी दिलेली मुद्रा,

“प्रतिपच्चंद्र रेखेव वर्धिष्णूर्विश्ववंदिता
शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते”

कायम ठेवली. त्याचबरोबर परमानंदने एक सुंदर श्लोक महाराजांसाठी नव्याने तयार केला,

“श्रीशिवरूपेणोवीर्मवतीर्णोयं स्वयंप्रभुर्विष्णू:
एषा तदिय मुद्रा भूवलयस्याभयप्रदा जयति”

ही नवीन मुद्रा सुद्धा शिवरायांनी स्वीकारली.

दरबारी रितीरिवाजांची भाषा ही यावनी भाषेची प्रशस्ती करणारी होती. आपल्या स्वतंत्र राज्याची स्वतंत्र भाषा असावी हा शिवरायांचा मानस होता. त्यामुळे मराठीला स्वराज्याची अधिकृत भाषा म्हणून मान्यता मिळाली.

आणि शिवाजी महाराजांनी ‘राज्यव्यवहार कोष’ निर्माण करण्याची आज्ञा दिली.

शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा गाडा हाकण्यासाठी दरबारी अष्टप्रधानांनी नेमणूक केली. सिंहासनावर बसल्यानंतर शिवरायांच्या उजव्या बाजूस अनुक्रमे मोरोपंत पिंगळे पेशवा, रामचंद्र नीळकंठ अमात्य, अण्णाजी दत्तो सचिव आणि दत्ताजी त्र्यंबक बाकनिस यांच्या जागा होत्या.तर शिवरायांच्या डाव्या बाजूस सरनौबत सेनापती हंबीरराव मोहिते, रामचंद्र त्र्यंबक डबीर सुमंत, रावजी निराजी न्यायाधीश आणि रघुनाथराव पंडित स्थानापन्न होत.

हेन्री ओक्झेंडन हा रायगडावर या सोहळ्यासाठी उपस्थित होता. राजपरिवारासाठी उभारलेल्या स्थानापासून एक मैल लांब तो राहत होता. हेन्रीने दिलेल्या नोंदीपैकी एक नोंद मोठी विलक्षण आणि चमत्कारिक आहे. तो लिहीतो,

“गडावर राहणाऱ्या लोकांचे डाळ आणि तांदूळ यापासून तयार केलेली खिचडी हे मुख्य अन्न आहे. ही खिचडी लोण्यात तयार करून लोणी घालून लोक खात असत. त्यायोगे अंगात चरबी वाढते.”

इंग्रज वकीलास हे अन्न पसंद पडले नाही, ही बातमी शिवरायांच्या कानावर गेल्यास ताबडतोब त्यांनी हेन्रीस बकऱ्यांचे मांस देण्याची व्यवस्था केली. हेन्री, त्याच्यासोबत असलेले त्याचे दोन सहकारी अशा तिघांना रोज अर्ध्या बकऱ्याचे मांस पोचत होते.

एवढ्या गडबडीच्या प्रसंगी सुद्धा शिवाजी महाराजांचे आपल्या राज्याकडे, राज्यात घडणाऱ्या छोट्यानछोट्या गोष्टीकडे किती बारीक लक्ष होते, याचाच हा पुरावा.

गडावर तब्बल १२ दिवस शिवरायांनी दानधर्म चालवला होता. १२ दिवस गडावर जेवणाच्या पंगती उठत होत्या. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस, त्याच्या पत्नीस एवढंच काय तर लहान लहान मुलांना सुद्धा दक्षिणा मिळत होती. स्वराज्याच्या अभिषेकाचा हा सोहळा त्याकाळी घडलेल्या सर्वात श्रीमंत सोहळ्यापैकी एक म्हणून गणल्या गेला. दोनएक लाख होनांचे तर निव्वळ दान शिवरायांनी स्वहस्ते केले होते.

असा हा भव्यदिव्य, अतिश्रीमंत आणि अत्युच्च पातळीवर साजरा करण्यात आलेला ‘न भूतो न भविष्यती’ असा इतिहासाला कलाटणी देणारा शिवराज्याभिषेक सोहळा..

  •  केतन पुरी

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.