शोभाताई फडणवीसांनी काढलेल्या शेतकरी मोर्चामुळं मुख्यमंत्री स्वतः चंद्रपुरात आले होते

देशात गेल्या वर्षभरापासून शेतकरी आंदोलनामुळं वातावरण तापलेलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादग्रस्त कृषीकायदे मागे घेणार असल्याचं जाहीर केलं असलं, तरी अजूनही आंदोलन मागं घेण्यात आलेलं नाही. कृषी कायद्यामुळं झालेलं आंदोलन हे काही देशातलं पहिलं आंदोलन नाही. या आधीही देशात ठिकठिकाणी शेतकरी आंदोलनं झाली आहेत.

महाराष्ट्रातही एकदा शेतकरी आंदोलन झालं होतं, ज्याची दाखल थेट मुख्यमंत्र्यांना चंद्रपुरात येऊन घ्यावी लागली होती.  तो मोर्चा काढला होता तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य शोभा फडणवीस यांनी.

सगळ्यात आधी शोभा फडणवीस यांच्याबद्दल सांगतो-

भाजप नेत्या शोभा फडणवीस या मूळच्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूल या गावातल्या. त्यांचं कुटुंब अनेक पिढ्यांपासून जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाशी संबंधित होतं. त्यांचे दीर गंगाधरपंत फडणवीस हे नागपूर इथून अनेक वर्ष विधानपरिषदेवर निवडून गेले होते. त्या स्वतःही चंद्रपूरमधल्या साओली मतदारसंघातून सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.

गंगाधरपंत फडणवीसांनंतर, त्यांचा वारसा आणि राजकारणाची सूत्रं शोभा यांच्याकडे आली. त्यांनी पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसच्या राज्यमंत्र्याला पाडण्याचा पराक्रम केला आणि विधानसभेत धडाक्यात एन्ट्री मारली.

राज्यात १९९५ साली युतीचं सरकार आलं. त्यावेळी शोभा फडणवीस यांना मनोहर जोशींच्या मंत्रिमंडळात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री बनवण्यात आलं. मात्र दोनच वर्षांनी १९९७ साली त्यांच्यावर रेशनमधील तूर डाळीच्या घोटाळ्याचा आरोप झाला. त्याचवेळी अण्णा हजारेंच्या उपोषणामुळे भ्रष्टाचाराची प्रकरणं राज्यात गाजत होती. त्यामुळं विरोधकांनी हे तूर डाळीचं प्रकरण चांगलंच लावून धरलं. भाजपला यामुळं बॅकफूटवर जावं लागलं.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी, या प्रकरणावर कठोर भूमिका घेतली. त्यांचं म्हणणं होतं, कितीही मोठा नेता असला, तरी भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही. त्यांनी भाजपच्या नेत्यांवर दबाव आणला आणि डाळ घोटाळ्यामुळे शोभा यांना अन्न व पुरवठा खातं सोडावं लागलं.

पुढे १९९९ साली शिवसेना आणि भाजप युतीला सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर, विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं सरकार सत्तेत आलं. त्यावेळी सेना-भाजप युतीमधल्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला होता. मात्र भ्रष्टाचाराचे आरोप होऊनही शोभा फडणवीस साओली विधानसभा मतदारसंघातून मोठ्या बहुमतानं निवडून आल्या.

त्यांनी २००४ पर्यंत या मतदार संघाचं प्रतिनिधित्व केलं. त्यांच्यानंतर, त्यांचे पुतणे आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय वारसा पुढे नेला.

शोभा फडणवीस यांनी काढलेला शेतकरी मोर्चा-

शोभा या जिल्हा परिषद सदस्या असताना चंद्रपूरमध्ये मोठा दुष्काळ पडला होता. त्यामुळं शोभा यांनी शेतकऱ्यांना एकत्र आणलं आणि मोर्चा काढला. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरावही घातला. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या कानावर या मोर्चाबद्दल गेलं. त्यांनी शोभा फडणवीस यांना फोन केला आणि सांगितलं, ‘तुम्ही घेराव उठवा, मी आठ दिवसांत तिथं येतो आणि दुष्काळ मंजूर करतो.’

मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देत त्यांनी घेराव उठवला. आठ दिवसांनी शंकरराव चव्हाण चंद्रपुरात आले, त्यांनी पाहणी केली लगोलग दुष्काळ जाहीर केला. सोबतच जिल्ह्याला पीक विमा योजनेचा लाभही मिळवून दिला. एका जिल्हा परिषद सदस्यानं केलेल्या आंदोलनाची दखल थेट मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागली आणि याची चर्चा पूर्ण राज्याभरात झाली.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.