सत्यजित तांबे जिंकले, पण शुभांगी पाटील यांनी स्वतःची चर्चा होईल अशी सोय केलीये…
राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदार संंघाच्या ५ जागांसाठी निवडणुका पार पडल्या. या सगळ्या निवडणुकांच्या काळात सर्वात जास्त चर्चेत राहिली ती नाशिक पदवीधरची निवडणूक. त्यामागची कारणं ही तशीच आहेत. अगदी निवडणूक जाहीर झाल्यापासून ते फॉर्म भरण्यापासनं निवडणूकीचा निकाल लागेपर्यंत नाशिक पदवीधरची निवडणूक चर्चेत राहिलीये.
काँग्रेसकडून विद्यमान आमदार सुधीर तांबे यांना तिकीट मिळालं असूनही त्यांनी फॉर्म न भरता सत्यजीत तांबेंनी अपक्ष म्हणून फॉर्म भरला इथून नाशिक पदवीधरची निवडणूक चर्चेत आली.
नाशिक पदवीधरची निवडणूक चर्चेत राहण्याचं एक कारण सत्यजीत तांबे असले तरी दुसरं कारण म्हणजे मतदार संघातील आणखी एक उमेदवार शुभांगी पाटील. बरं शुभांगी पाटलांमुळे निवडणूक तर चर्चेत राहिलीच सोबतच त्यांनी स्वत:लाही राजकीय चर्चांमध्ये ठेवण्यात यश मिळवलंय.
शुभांगी पाटलांनी निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून अर्ज भरला.
२०२२ साली भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शुभांगी पाटील यांना नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी भाजपकडून तिकीट मिळेल असा अंदाज वर्तवला जात होता. पण, फॉर्म भरण्याची वेळ संपेपर्यंत भाजपने कोणताच उमेदवार दिला नाही त्यामुळे मग शुभांगी पाटलांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरला.
त्यानंतर त्यांनी थेट महाविकास आघाडीकडून पाठिंबा मागितला.
भाजपचं पारडं हे सत्यजीत तांबेंच्या बाजुला झुकतंय हे लक्षात येताच त्यांनी मातोश्रीचं दार वाजवत महाविकास आघाडीकडून पाठिंबा मागितला. शिवसेनेकडून शुभांगी यांना पाठिंबा देण्यातही आला आणि मग बऱ्याच चर्चा आणि बैठकांनंतर महाविकास आघाडीनेही शुभांगी पाटलांना पाठिंबा जाहीर केला. शुभांगी पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या.
त्यामुळे मग तांबेंना रोखण्यासाठीचा प्लॅन म्हणून महाविकासआघाडीचा प्लॅन म्हणून शुभांगी पाटील चर्चेत आल्या.
प्रचार करतेवेळी पुन्हा शुभांगी पाटलांनी चर्चेत राहण्यात यश मिळवलं.
निवडणूकीसाठी प्रचार करत असताना शुभांगी पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सत्यजीत तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात यांच्या घरी पोहोचल्या. तिथे त्यांना वॉचमनने आत जाऊ दिलं नाही. त्यावेळी मग त्या म्हणाल्या,
“मी थोरात साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलेली. पण ते मुंबईत असल्याची माहिती फोनवर मिळाली.”
असं म्हणून मग त्या माघारी फिरल्या आणि पुढच्या नियोजीत प्रचार कार्यक्रमाला गेल्या.
यामुळे त्यांनी केलेला हा पब्लिसिटी स्टंट होता असं बोललं जात होतं आणि त्यामुळे माध्यमांमध्ये आणि राजकीय वर्तुळात चर्चेत आल्या.
मतदानाच्या दिवशीसुद्धा चर्चेतच राहिल्या.
मतदाना दिवशी मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केलं आणि त्यानंतर अशा दोन गोष्टी घडल्या की, ज्यामुळे त्या चर्चेत राहिल्या.
पहिलं म्हणजे, मतदान करून बाहेर आल्यानंतर शुभांगी पाटील आणि सत्यजीत तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे यांची भेट झाली. आता ही भेट अनपेक्षितरित्या झाली होती. दोघीही मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्या होत्या परंतू, माध्यमांमध्ये या भेटीमुळे चर्चा रंगल्या आणि परत एकदा चर्चेत राहण्याचं गमक शुभांगी पाटलांनी जुळवून आणल्याच्या चर्चा झाल्या.
दुसरं म्हणजे, मतदानादिवशी मतदान केंद्रावरच शुभांगी पाटील यांनी मतदानासाठी रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांशी संपर्क साधला.
मतदार नागरिकांशी त्यांना चर्चा करताना पाहून मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी शुभांगी पाटलांना असं न करण्याच्या सुचना दिल्या. त्यामुळे पुन्हा एकदा शुभांगी पाटील माध्यमांमध्ये आल्या आणि चर्चेत सुद्धा राहिल्या.
आता मतदानाच्या दिवशी मतदारांशी संपर्क साधल्यानं निकाल फार बदलणार होता अशातला भाग नाही, पण त्यामुळे त्या चर्चेत राहू शकल्या आणि हेच त्यांना साध्य करायचं होतं असं बोललं जातंय.
याशिवाय एका लग्नात सत्यजीत तांबे आणि शुभांगी पाटील समोरासमोर आल्याने , सतत आपण जिंकणार असल्याच्या केलेल्या वक्तव्यांनीही निकाल येईपर्यंत शुभांगी पाटील चर्चेत राहिल्यात.
आता नाशिक पदवीधर मतदार संघाचा निकाल जाहीर झालाय. सत्यजीत तांबे यांचा विजय झाला आणि शुभांगी पाटील यांचा पराभव झालाय. या पराभवानंतरही त्यांनी स्वत:ला चर्चेत बाकी ठेवलंय.
शुभांगी पाटलांना पराभवाबद्दल प्रतिक्रिया विचारल्यावर त्या म्हणाल्या,
“सामान्य घरातल्या मुलीला ४०,००० मतं मिळणं मोठी गोष्ट आहे. मला झाशीच्या राणीसारखं लढायचं आहे.शिवसेना कधीही सोडणार नाही.”
आता या वक्तव्यामुळं, भाजपसह विरोधकांकडून शुभांगी पाटलांवर टीका केली जातीये. शिवाय थेट झाशीच्या राणीशी स्वत:ची तुलना करणं हा हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? असा सवाल ही विचारला जातोय.
एकंदरीत विचार केला तर, निवडणुकीत पराभव झाला असला तरी, ४०,००० हा मतांचा आकडा काही लहान नाहीये. त्याहीपुढे जाऊन विचार केला तर, सध्याच्या राजकारणात गरजेचं असलेलं चर्चेत राहणं हे कसं साध्य करायचं तेही शुभांगी पाटलांना चांगलंच जमल्याचं दिसतंय.
हे ही वाच भिडू:
- नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्ष पदावरून काढण्याची मागणी का होतेय ?
- पटोलेंचं म्हणणंय काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल पण कुणाच्या जोरावर ?
- पुण्यातील काँग्रेस भवन कोणाचं…? हा वाद थेट उच्च न्यायालयात गेला होता…