दिवाळीच्या सीझनमध्ये या चांदीच्या माशांची फॉरेनमध्ये देखील तुफान डिमांड असते..

चला, दिवाळी तर संपली भिडू.  फराळ, फटाके, रोषणाई, नवीन कपडे, वस्तूंची खरेदी, पूजा – पाठ या सगळ्या गोष्टींमधून बरीच जण आपापल्या कामाला सुद्धा लागले असतील. पण दिवाळी ही प्रत्येकाच्या आठवणीत राहील अशीच असते. म्हणजे दिवाळी निम्मित घरात कोणती ना कोणती नवीन वस्तू किंवा दागिना घरात आलेलाच असतो. कारण दिवाळीचा मुहूर्त नवीन गोष्टींसाठी शुभ मानला जातो.

आता आपल्या देशात तरी शुभ – अशुभ या गोष्टी मानणारी मंडळी आहेत. म्हणजे कोणती वस्तू कधी घ्यायची, का घ्यायची, या संदर्भातल्या गोष्टी आपल्याला वर्दीलोपार्जीत सांगितल्या जातात. ज्याचं अनुकरण आपण पुढेही चालूच ठेवतो.

अशीच एक धार्मिक परंपरा आहे मीन ठेवण्याची. मीन म्हणजेच मासा जो नेहमीच शुभ मानला जातो.

आता बऱ्याच जणांसाठी हे नवीन असेल तर अनेकांना याबद्दल माहीतही असेल. पण भिडू प्रत्येक गोष्टीमागे काही नवीन माहिती शोधणं हे आपलं कामचं आहे.

तर घर असो, आपल्या व्यवसायाचं ठिकाण असो, मंदिर असो सगळ्याच ठिकाणी माश्याची आकृती कोरली जाते. पण तुमच्या माहितीसाठी ही परंपरा फक्त आपल्या भारतातचं नाही तर परदेशातही आहे. साता समुद्रापलीकडची मंडळी सुद्धा मासा हा शुभ संकेत मानतात. बरेच जण चांदींचा मासा आपल्या घरात व्यवसायाच्या ठिकाणी ठेवतात.

दरम्यान हा मासा बनवण्यात उत्तर प्रदेशातील हमीरपूरच्या मौदाहा हे शहर महत्वाची भूमिका बजावत आहे.  जिथला चांदीचा मासा हा देशातल्या कानाकोपऱ्यात तर पोहोचतोच, सोबतच दुसऱ्या देशातही ते पोहोचवण्याचे काम करत आहे. यात अमेरिका, पाकिस्तान, दुबई, कुवेतसह इतर देशांमध्ये या चांदीच्या माश्याची निर्यात मोठ्या प्रमाणावर होत असते. 

महत्वाचं म्हणजे हा चांदीचा मासा बनवण्याचं काम मौदाहा सोडून देशात इतर कुठल्याच ठिकाणी  बनवला जात नाही.

 असे म्हंटले जाते कि,चारशे वर्षांपेक्षाही जास्त काळापासून या मौदाहा शहरात चांदीचे मासे तयार केले जात आहेत. म्हणजे पार मुघलांच्या काळापासून.

 इथल्या लोकांच्या म्हणण्यानुसार मुघल लेखक अबुल फजल यांनी आईना-ए-अकबरीमध्ये चांदीच्या माशाचा  उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिले की, इथल्या लोकांकडे चांगले जीवन जगण्यासाठी एक उत्तम साधन आहे, त्यानंतर त्यांनी या माशाच्या कारागिरीचे कौतुक केले.

 त्याची मागणी वर्षभर तर असतेच पण दिवाळीत या चांदीच्या माशांची मागणी कित्येक पटींनी वाढते. दिवाळीला या चांदीच्या माश्याची पूजा केली जाते सोबतच सुख आणि शांतीची कामना केली जाते. 

कामगारांच्या म्हणण्यानुसार एक मासा तयार करण्यासाठी सुमारे दोन ते तीन दिवस लागतात.हा चांदीचा मासा अगदी खऱ्या माशासारखा दिसतो. 

असे म्हंटले जाते कि, १८१० मध्ये ही कला पाहून राणी व्हिक्टोरिया देखील आश्चर्यचाकाची झाल्या होत्या. त्यांनी त्यावेळी या चांदीचा मासा बनवणाऱ्या कारागिरांचा सन्मान देखील केला होता. 

इथल्या कामगारांच्या म्हणण्यानुसार,

जवळपास ४०० वर्षांपूर्वी त्यांच्या पूर्वजांनी हे चांदीचे मासे बनवण्याचे काम सुरू केले होते. त्यांनी तयार केलेल्या माशांचे सौंदर्य पाहून लोकांचे आकर्षण वाढत गेले. या माश्याची आणि त्याच्या चांगल्या संकेताची चर्चा जगभरात पसरली आहे.

आता हा व्यवसाय कितीही जुना असला तरी शासनाकडून या उद्योगाला चांगले प्रोत्सहन मिळाले नाही.  १९८० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या हस्ते या कलेच्या कारागिरांचा गौरव करण्यात आला होता. मात्र त्यानंतर एवढ्या वर्षांपासून ही कला जिवंत आज तिला कुठला सन्मान मिळाला नाही.  त्यामुळे एकेकाळी लाखो रुपयांची उलाढाल करणारी ही कला आणि हळू-हळू संपू लागली आहे.

हे ही वाचं भिडू : 

 

Leave A Reply

Your email address will not be published.