सिंघू बॉर्डर येथे हत्या झालेल्या लखबीरच्या नव्या व्हिडीओमुळे प्रकरणाला वेगळं वळण लागलंय
१५ ऑक्टोबरला हरियाण- दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर एक खळबळजनक घटना घडली. तरण तारण जिल्ह्यातील चीमा गावातील रहिवासी लखबीर सिंह याची काही निहंग शिखांनी हत्या केली. ती घटना इतकी भयानक होती की, लखबीरचे आधी हात आणि पाय कापले गेले आणि त्याच्या मृत्यूनंतर मृतदेह संयुक्त किसान मोर्चाच्या मुख्य व्यासपीठापासून काही अंतरावर रस्त्याच्या कडेला असलेल्या बॅरिकेडवर लटकवण्यात आला.
हत्येनंतर सकाळी या मृतदेहाचे लटकवलेले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. ज्यानंतर एकचं खळबळ उडाली. तातडीने राज्य पोलिसांनी कारवाई केली.
आता घटनास्थळी उपस्थित असलेल्या निहंग शीखांच्या म्हणण्यानुसार, लखबीरने धार्मिक ग्रंथाचा अपमान केला होता, ज्यासाठी त्याला शिक्षा झाली. या प्रकरणात आतापर्यंत चार निहंग शीख सरबजीत सिंह, नारायण सिंह, भगवंत सिंग आणि गोविंदप्रीत सिंग यांना अटक करण्यात आली आहे.
आता धार्मिक ग्रंथांच्या आरोपावरून सिंघू बॉर्डरवर मारल्या गेलेल्या दलित लखबीर सिंहचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ त्याच्या हत्येच्या आधीचा आहे. ज्यामध्ये लखबीर सिंह आहे, पण त्याचे हात आणि पाय बांधलेले आहेत. त्या अवस्थेत तो जमिनीवर पडलेला आहे.
ज्या प्रकारे लखबीरच्या चेहऱ्यावर ओठांमधून रक्त पडताना दिसतेय, त्यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की, त्याला मारहाण केल्यानंतर हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. ज्यात लखबीर सिंह आपल्या चारही बाजूंनी निहंग शीखांनी घेरलेला दिसतोय. व्हिडिओमध्ये तो सांगतोय की, त्याला ३० हजार रुपये दिले गेले. पण ते कशासाठी दिले होते, हे काही स्पष्ट होऊ शकले नाही.
लखबीर सिंगच्या बोलण्यावरून असे दिसते की, त्याच्यासोबत आणखी एक तरुण होता. निहंगांनी विचारल्यावर लखबीर त्या तरुणाचा मोबाईल नंबर सांगतो. या दरम्यान, काही लोक तो मोबाईल नंबर नोट करण्याविषयी बोलत आहे.
Nihang singh releases new video of Lakhbir Singh who was murdered by them, In which he admitted that he was given 30k. But in video it is not clear that for which work ! pic.twitter.com/SGbI1tgM9c
— Gagandeep Singh (@Gagan4344) October 20, 2021
या व्हिडिओबद्दल असा दावा केला जातोय की, लखबीर सिंह गुरु ग्रंथ साहिबच्या अपमानासाठी पाठवल्याची कबुली देत आहे. मात्र, ३० हजार रुपयांसाठी त्याला याच कामासाठी दिले होते का हे व्हिडिओवरून स्पष्ट झालेले नाही.
आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी पंजाबच्या काँग्रेस सरकारने विशेष तपास पथकावर (STI) ही जबाबदारी सोपवली आहे. एडीजीपी वरिंदर कुमार यांना एसआयटीचे प्रमुख बनवण्यात आले आहे.असे सांगण्यात आले आहे की, एसआयटी निहंग नेता अमन सिंह, त्याच्या गटाच्या अॅक्टिव्हिटी, सिंघू सीमेवर लखबीर सिंहची हत्या आणि बडतर्फ पोलीस कर्मचारी गुरमीत सिंह ‘पिंकी’ यांची केंद्रीय मंत्र्यांसह भेट आणि काही निहंग नेत्यांविषयी माहिती घेईल.
यासोबतच, पंजाबचे गृहमंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांनी अकाल तख्तचे जथेदार ग्यानी हरप्रीत सिंग यांच्याशी चर्चा केली आहे. रंधावा यांनी ग्यानी हरप्रीत सिंग यांना बाबा अमन सिंह यांच्या कारवायांची माहिती घेण्यासाठी वेगेवगेळ्या निहंग गटांची बैठक घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी आरोप केला की, अनेक बनावट निहंग नेते समोर आले आहेत.
कारण एका अहवालानुसार असा संशय व्यक्त करण्यात येतोय की, शेतकरी चळवळ संपण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग बाबा अमन सिंह असू शकतात. यात बाबा अमन सिंह यांचे काही फोटो सुद्धा समोर आलेत. ज्यात केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर, शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी आणि इतर भाजप पाहायला मिळत आहेत.
आता इथं प्रश्न पडतो की, बाबा अमन सिंह कोण आहेत. तर बाबा अमन सिंह हे निहंग शीख समूहाचे प्रमुख आहेत आणि कॅनडाच्या ओंटारियो इथल्या शीख गटाचे प्रमुख आहेत. आणि या हत्येचा आरोप ज्या निहंग शिखांच्या गटावर लावला गेलाय, ते बाबा अमन सिंग यांच्या गटाचे सदस्य असल्याचे म्हंटले जातेय.