केसरींना धक्के मारून हाकललं आणि सोनिया गांधीनी काँग्रेस आपल्या हाती घेतली.

गोष्ट १९९८ सालची. भारतातला सर्वात जुना पक्ष असलेला काँग्रेस मोडकळीस आलेला होता. बिहारचे अनुभवी नेते सीताराम केसरी यांनी नरसिंह राव यांच्या नंतर पक्षाचं नेतृत्व हाती आलं होतं .

सीताराम केसरी हे स्वातंत्र्य लढ्याच्या काळापासूनचे काँग्रेसचे सदस्य. इंदिरा गांधींनी त्यांना पक्षाचा खजिनदार बनवलेलं. काँग्रेसच्या प्रत्येक चढउताराचे ते साक्षीदार होते. राजकारण त्यांनी कोळून पिलेलं होतं. पक्षाच्या प्रत्येक घटकावर त्यांची पकड बसलेली होती.

पुढे जाऊन भारताचा पंतप्रधान बनण्याचं त्यांचं स्वप्न असणे सहाजिक होते.

मात्र याचं महत्वाकांक्षेपायी त्यांनी पहिल्यांदा देवेगौडा व दुसऱ्यांदा गुजराल यांचे सरकार पाडले पण दोन्ही वेळी त्यांच्या हाती निराशा आली. बाकीच्या पक्षांनी त्यांना पाठिंबा न दिल्यामुळे त्यांच पंतप्रधानपदाच स्वप्न अधुरं राहिलं.

सीताराम केसरी यांच्या या गड्बडीच्या स्वभावामुळे दिल्ली वर्तुळात त्यांना गंमतीने ओल्ड मॅन इन हरी असं म्हटलं जायचं.

किती जरी नाही म्हटलं तरी स्वातंत्र्यानंतर नेहरू-गांधी कुटुंबाने काँग्रेस पक्षावर राज्य केलं आहे. इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या हत्ये नंतर सोनिया गांधी या गांधी घराण्याच्या राजकीय वारसदार बनल्या होत्या मात्र त्यांनी राजकारणात कोणताही स्वारस्य नसल्याचं जाहीर केलेलं होतं .

पण सीताराम केसरी यांच्या उठाठेवीमुळे इतर काँग्रेसजन नाराज होते.

केसरी यांच्या चारित्र्यावर टीका होत होती. ते रात्रीच्या वेळी साग्रसंगीत दरबार भरवतात आणि गांधी घराण्यापासून ते फिल्म इंडस्ट्री पर्यंत प्रत्येक गोष्टीच गॉसिप करत बसतात असे आरोप केले जायचे. त्यांचा एक डायलॉग त्या काळी फेमस होता.

“ना खाता, ना बहि, जो केसरी कहे वही सही”

पक्षाला सावरायचं असेल तर गांधी घराण्यातील तारणहार यायला हवा असं बाकीच्या काँग्रेस नेत्यांचं मत होऊ लागलं होतं. यातूनच काही निष्ठावंतांनी सोनिया गांधींना पक्ष ताब्यात घेण्यासाठी मनधरणी करण्यास सुरवात केली. सीताराम केसरी मात्र बेफिकीर होते. त्यांना माहित होत की सोनिया गांधी राजकरणात येणार नाहीत आणि आल्या तरी त्यांचा परदेशी जन्माचा मुद्दा काढून सहज हरवता येईल.

हिंदी देखील बोलता न येणारी एक महिला आपल्याला आव्हान देऊ शकते यावर त्यांचा विश्वास नव्हता.

पण त्यांना अनपेक्षितपणे २७ डिसेंबर १९९७ रोजी काँग्रेसच्या वर्धापनदिनी बातमी आली कि

येत्या निवडणुकीत सोनिया गांधी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.

खुद्द काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी यांना याची काहीही कल्पना नव्हती. सोनिया गांधी राजकारणात येत आहेत हे कळल्यावर त्यांना दातखीळ बसली. अनिच्छेने का होईना त्यांनी याला होकार दिला.

ज्या ठिकाणी राजीव गांधी यांची हत्या झाली होती त्या श्री पेरन्ब्दुर येथे सोनिया गांधी यांनी आपली पहिली सभा घेतली.

जनतेला भावनिक साद घालत सोनिया गांधी राजकारणात आल्या होत्या. त्यांच्या सोबत त्यांची धाकटी मुलगी प्रियांका देखील होती. ती सभा या दोघींच्या उपस्थितीमुळे जिंकली. फक्त श्रीपेरन्ब्दुर नाही तर सोनिया गांधी यांनी देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन प्रचार सुरु केला.

त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी भरत होती. सोनिया गांधी मोडक्या तोडक्या हिंदीत भाषण वाचून दाखवत होत्या मात्र गांधी घराण्याची सून, राजीव यांची विधवा पत्नी या नात्याने काँग्रेस कार्यकर्त्यांच्यात त्यांच्या बद्दल सहानुभूती होती.

प्रचाराची रंगत वाढू लागली तशी सीताराम केसरी यांच्या ऑफिस मधली नेत्यांची गर्दी ओसरू लागली व सोनिया गांधी यांच्या १०, जनपथ या निवासस्थानावर रांगा लागू लागल्या.

सीताराम केसरी याना त्यांचे समर्थक सांगत होते की सोनिया गांधी निवडणुकीपुरतं आल्या नाहीत तर त्या काँग्रेस अध्यक्ष पदासाठी दावा करणार आहेत. हे ऐकून त्यांची मानसिक स्थिती आणखीन खालावली. त्यांनी घरातून बाहेर पडणं देखील थांबवलं.

काँग्रेस च्या इतिहासात पहिल्यांदाच पक्षाचा अध्यक्ष निवडणूक प्रचारात एकदाही उतरला नाही.

राजकारणात नवख्या असलेल्या सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या सर्वात जेष्ठ नेत्याला धोबीपछाड देण्याचे सगळे डाव आखले होते.

पुढे १९९८च्या लोकसभा निवडणूक पार पडल्या. काँग्रेस चा मोठा पराभव झाला. अल्प बहुमत असूनही वेगवेगळ्या पक्षांचा सहारा घेऊन भाजपचे वाजपेयी पंतप्रधान बनले. या पराभवामुळे काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते निराश होते पण त्यांचा अध्यक्ष प्रचंड खुश होता.

सोनिया गांधींनी प्रचार करूनही पक्षाचा पराभव झाला ही आपल्यासाठी सुवर्ण वार्ता आहे हा समज केसरी यांनी करून घेतला.

अप्रत्यक्षरीत्या पराभवाचे खापर सोनिया गांधी आणि त्यांच्या कंपूवर ढकलून सीताराम केसरी आपलं स्थान बळकट करत होते.

निकाला नंतर गांधी घराण्याच्या निष्ठावंतांनी मात्र कंबर कसली.

काहीही करून सोनिया गांधी याना अध्यक्ष करायचे यासाठी गुप्त बैठक सुरु झाल्या. आपण आता सन्मानाने निवृत्त व्हावे व तरुणांच्या हाती पक्ष द्यावा असा संदेश सीताराम केसरी यांना द्यावा हि जबाबदारी प्रणव मुखर्जी व ए.के.अँथनी यांच्या कडे देण्यात आली.

केसरी यांचे मानलेले पुतणे म्हणजे अहमद पटेल त्यांना भेटले पण केसरी म्हणाले,

“हि काही सोनियाजी यांची मागणी दिसत नाही. अर्जुनसिंग व जॉर्ज यांनी तुम्हाला पाठवले असावे. मी अध्यक्षपद सोडावे अशी खरोखर इच्छा असेल तर सोनिया गांधींनी स्वतः मला तसे सांगावे.”

हळूहळू संपूर्ण काँग्रेस आपल्या अध्यक्षाच्या विरुद्ध होऊ लागली. महाराष्ट्राचे नेते शरद पवार देखील अनिच्छेने का होईना पण प्राप्त राजकीय स्थिती मध्ये केसरी हटाव मोहिमेत सहभागी झाले. केसरींची उचलबांगडी करण्यासाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे असं मत ते बैठकी मध्ये मांडू लागले.

दिग्गजांच्या या हालचालींचा सुगावा लागताच केसरी यांचे समर्थक तारिक यांवर यांनी चलाखीने हि मोहीम हाणून पाडण्याचे प्रयत्न सुरु केले. काँग्रेस अध्यक्ष पदाच्या खुर्चीचा सत्तासंघर्ष टोकाला जाऊन पोहचला.

काँग्रेस च्या कार्यकारणीमध्ये सोनिया गांधी यांच्या अध्यक्षपदाची मागणी पुढे आली तशी सीताराम केसरी यांनी त्याला धुडकावून लावलं. शरद पवार विरोधी पक्ष नेते पदासाठी कारस्थान करत आहेत असा आरोप त्यांनी लावला.

सहजासहजी आपले पद सोडण्यास केसरी तयार नव्हते. अखेर सोनिया गांधी यांनी त्यांना भेटून ‘कधी ‘ असा एकमेव प्रश्न विचारला त्यानंतर सीताराम केसरी यांनी माघार घेतली.

९ मार्च १९९८ रोजी त्यांनी आपल्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचे सूतोवाच केले.

फक्त त्यांनी यातही एक मेख मारून ठेवली होती. त्यांचं म्हणणं होत कि मी राजीनामा पक्षाच्या सदस्यांपुढे ठेवीन, यापुढचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे.

केसरीने अपेक्षा होती की कार्यकारणीमधील नेते आपल्या बाजूने उभे होतील व सोनिया गांधींना आपण पराजित करू.

१४ मार्च १९९८चा दिवस उजाडला. सीताराम केसरी नेहमी प्रमाणे ११ वाजता काँग्रेस च्या २४, अकबर रोडवरील मुख्यालयात आले. पण त्यांना कल्पना नव्हती की त्यांच्या विरुद्ध मोठा कट शिजला आहे. केसरी पोहचले तेव्हा त्यांना जाणवलं कि काही तरी गडबड आहे. त्यांच्या आगमनानंतर स्वागता साठी कोणीही उठून उभे राहिले नाही.

बैठक सुरु झाल्यावर प्रणव मुखर्जी बोलायला उभे राहिले. त्यांनी थेट सीताराम केसरी यांना आभार मानणारे भाषण सुरु केले.

यात काँग्रेसच्या घटनेत अनुच्छेद १९ कलम १चा दाखला देत अध्यक्षांना पदावरून काढण्याच्या विशेष अधिकाराबद्दल ही बोलत होते.

सीताराम केसरींना समजायचं बंद झालं. त्यांना गांगरल्या सारखं होऊ लागलं. खरं तर जे चालू होत ते घटनाबाह्य होत, असा कोणताही अधिकार काँग्रेस घटनेत नव्हता मात्र प्रणव मुखर्जी व इतरांनी बळजबरीने केसरींना पदावरून काढले होते.

मनात धुसमसुणाऱ्या संतापामुळे अगदी खोल गेलेल्या आवाजात केसरी “अरे ये क्या कर रहे हो ?” म्हणत होते. पण बाकीचे त्यांच्या कडे लक्ष देण्याच्या मनस्थिती नव्हते. सोनिया गांधींच्या नावाची घोषणा झाली तेव्हा काँग्रेस मुख्यालयात टाळ्यांचा कडकडाट झाला. केसरी ओरडत होते.

“ये बैठक घटनाबाह्य है. अभी भी काँग्रेस का अध्यक्ष मै ही  हुं . कोई मुझे निकाल नही सकता.”

त्यांना त्या बैठकीतून अक्षरश: हाकलून दिल गेलं.

संतापाने तणतणत केसरी बैठकीतून उठले. आपल्या दालनात जाऊन बसले. त्यांच्या सोबत तारिक यांवर देखील होते. काही वेळाने केसरी ऑफिसच्या बाहेर आले तेव्हा त्यांना दिसलं की,

दाराबाहेरची त्यांच्या नावाची पाटी गायब झाली होती व तिथे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी असा कंप्यूटर प्रिंट आउटचा तात्पुरता फलक लावण्यात आला होता.

बाहेर सोनिया गांधी जिंदाबादच्या घोषणा आणि फटाक्यांचा जोरदार आवाज सुरु होता. त्यांचे आगमन होणार त्यापूर्वी स्पेशल प्रोटेक्शनच्या जवानांनी मुख्यालय ताब्यात घेतले. केसरी यांना काँग्रेसच्या ऑफिसमधून बाहेर काढण्यासाठी धक्काबुक्की झाली. त्यांचा सदरा फाटला. काही कार्यकर्त्यांनी त्यांचा धोतर ओढण्याचा प्रयत्न केला.

काँग्रेसचे अनेक प्रतिष्ठित नेते उपस्थित असताना हे सभ्यपणाच्या मर्यादा ओलांडून हे सगळं घडलं होतं .

काँग्रेसचा हा ऐंशी वर्षांचा अध्यक्ष अपमानित होऊन हाकलला गेला.

त्यांनी घरी जाऊन आपल्या लाडक्या कुत्रीला पेकाटात लाथ घातली.

सीताराम केसरी निघून गेल्यावर सोनिया गांधी काँग्रेसच्या मुख्यालयात आल्या. अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली. थोड्याच वेळात त्या केसरी यांच्या घरी गेल्या. त्यांची समजूत काढली. त्यांच्या कडे आशीर्वाद मागितला.

सोनिया गांधी यांची विनम्रता पाहून केसरी भारावून गेले आणि काही तासापूर्वी झालेला आपला अपमान विसरून त्यांनी सोनिया गांधी यांना आशीर्वाद दिला.

काँग्रेस मध्ये सोनिया गांधी नावाचे नवे पर्व सुरु झाले. त्यांनी काँग्रेसच्या १३० वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक काळ अध्यक्ष पद भूषवण्याचा विक्रम केला.

सन्दर्भ- २४ अकबर रोड लेखक रशीद किडवई 

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.