सह्याद्रीतून माळरानावर विस्थापित झालेल्या गावानं स्वत:ला ‘प्रति-महाबळेश्वर’ बनवलं
त्यांच्या कित्येक पिढ्या जावळीच्या खोर्यात प्रामुख्याने महाबळेश्वर च्या पायथ्याशी असलेल्या चिंचणी (पूर्वीचा सातारा तालुका) गावात गेल्या. पुढे विकासाचं राजकारण आलं आणि या लोकांना कन्हेर धरणामुळे 1978 मध्ये सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीतून विस्थापित व स्थलांतरित व्हावं लागलं.
त्यांची नवीन मुळं रोवली गेली ती मुळ गावापासून दूर सुमारे २०० किलोमीटर दूर असणाऱ्या विठ्ठलाच्या पंढरीजवळ. वारकऱ्यांसाठी आदराचं स्थान असणाऱ्या “टप्पा” जवळच्या दुष्काळी माळरानावर…
सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीतून दुसरीकडे कायमस्वरूपी विस्थापित होत असताना चिंचणी गावाला कुठेही जागा मिळालेली असती, पण या गावच्या कित्येक पिढ्या वारकरी परंपरेमध्ये वाढलेल्या असल्याने आणि आपलं उरलंसुरलं आयुष्यही पंढरपूरच्या म्हणजेच विठ्ठलाच्या भक्तीत, संतांच्या आठवणीत व पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेत घालवता येईल म्हणून त्यांनी वारकऱ्यांसाठी आदराचं स्थान असलेल्या ‘टप्पा’ जवळच्या माळ रानाची मागणी सरकारकडं केली.
अन चिंचणी गावाला 150 एकराची जमीन राहायला आणि कसायला मिळाली.
पुनर्वसनाच्या निर्णयानंतर 1978 पासून हळूहळू एक एक कुटुंब पंढरपूरच्या टप्प्या जवळच्या माळावर कायमचंच राहायला यायला लागलं. आज अखेर या ठिकाणी जवळपास 70 ते 80 च्या आसपास कुटुंब आहेत.
जावळीच्या खोऱ्यात राहत असताना ज्या गावाला क्रांतिसिंह नाना पाटील असो की कर्मवीर भाऊराव पाटील असो यांच मार्गदर्शन-सहवास लाभला आणि इतिहासात ज्यांच्या पिढ्यान पिढ्या छत्रपती शिवाजी राजे, छत्रपती संभाजी राजे व स्वराज्यासाठी जिवाची पर्वा न करता सन्मानाने उभ्या राहिल्या त्या चिंचणी गावाला विस्थापित झाल्यावर पहिल्या दोन पिढीत सन्मानच जगणं जाऊन अपमानाचं जगणं वाट्याला आलं.
सुरुवातीला जावळीच्या खोर्यातून टप्पा जवळच्या माळावर स्थलांतरित होत असताना चिंचणी गावांन पिढ्यानपिढ्या सह्याद्रीतल्या पठारावरचा प्रचंड पाऊस आपल्या जीवनात अनुभवला होता, त्यांना पंढरपूरच्या या भागातही सह्याद्रीसारखा प्रचंड पाऊस असेल म्हणून त्या काळात कोकणात जशी तीव्र उताराची घरे बांधतात तशी या माळावर आपली घरही तीव्र उताराची बांधली.
आजही त्या ठिकाणी अशी काही घरे पाहवयास मिळतात.
परंतु काही वर्षानी त्यांच्या लक्षात आलं की, या ठिकाणी दोन दोन तीन तीन वर्षे मोठया प्रमाणात पाऊस पडतच नाही.
अन त्या “न पडणाऱ्या पाऊसाबरोबर” त्यावेळच्या विस्थापित पिढीच्या आयुष्याची परवड सुरू झाली अन प्रचंड हतबलता व निराशा त्यांच्या वाट्याला आली. त्या काळात सुरुवातीच्या दोन पिढीने परकेपणाची अवहेलना सोसली.
अन क्षणातच सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीतलं बाणेदार व टुमदार अस गाव पंढरपूरच्या उजाड व दुष्काळी माळावर आपली वाट आणि जगणं कायमचच हरवून बसल.
जसा जसा काळ पुढे सरकत होता तसं तसं या गावची नव्यानं जन्माला आलेली नवी पिढी पंढरपूरच्या मातीशी आपली नाळ जोडण्याचा व विठ्ठलाच्या भक्तीत रमणाण होण्याचा प्रयत्न करीत होती.
या बदलत्या प्रयत्नातुनच 2006 साल उजडता उजडता नव्या तरुण पिढीच्या धाडसी निर्णयामुळे चिंचणी गावांन आपला चेहरामोहराच बदलून टाकण्याचा ठाम निश्चिय केला.
अन चिंचणी गावाचं, पंढरपूरचं आणि सोलापूर जिल्ह्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर नेण्याचा चंगच त्यांनी बांधला.
तो धाडसी निर्णय असा होता की,
“आपण या टप्प्या जवळच्या उजाड व दुष्काळी माळावर आपल्या पूर्वीच्या अनेक पिढीनं अनभुवलेलं सह्याद्रीच्या कुशीतलं हिरवाईन नटलेलं प्रतिमहाबळेश्वर निर्माण करायच.”
त्या धाडसी निर्णया मागचा इतिहास ही खूप रंजक आहे,
जरी चिंचणी गाव ‘टप्पा’ जवळच्या माळावर स्थलांतरित झालं असलं तरी या गावच्या लोकांचे पै पाहुणे, रोजच्या व्यवहारातील लागेबांधे जावळीच्या खोर्यात होते व आजही आहेत.
अन याच संबंधातुन पै पाहुणेच्या सुखदुःखाच्या कार्यक्रमात, दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत नव्या ठिकाणी जन्माला आलेल्या आणि शाळा कॉलेजात शिकत असलेल्या तरुणांना वारंवार जाण्याचा योग यायचा.
अन तिकडं गेल्यानंतर महाबळेश्वर आणि जावळीच्या खोऱ्यातील हिरवीगार झाडी आणि निसर्गाचं सदाबहार रूप बघून आनंद व अप्रूप वाटायचं. अन या हिरव्यागार नटलेल्या झाडीमुळचं व निसर्गाच्या बेफाम सौंदर्याच्या उधळणीमुळेचं देशभरातली वेगवेगळ्या ठिकाणची माणसं हिकड फिरायला येतात असं त्यांना राहून-राहून वाटायचं.
त्या तीव्र अश्या इच्छेतुनच तरुणांनी आप आपसातले मतभेद बाजूला सारून सगळ चिंचणी गाव झाडून एकत्र आणलं आणि सर्वांच्या चर्चेतून असं ठरलं की, आपल्या यापूर्वीच्या पिढीन जसं आपलं सगळं आयुष्य दाट हिरव्यागार झाडीत, निसर्गाच्या सानिध्यात घालवल त्या पद्धतीने आपण या दुष्काळी माळावर प्रति महाबळेश्वर उभा करायचं आणि आपल्या गावलाच महाराष्ट्रामधलं पहिले “कृषी पर्यटन गाव” म्हणून विकसित करायचं.
2006 मधल्या चिंचणी गावच्या त्या धाडसी निर्णयामुळे आज हे गाव आदर्श गाव म्हणून आकाराला येत आहे.
दुष्काळी भागातलं हे गाव आता झाडांचे गाव म्हणून आपली हळूहळू ओळख बनवतेय. या गावाने एकोप्याने मिळून जवळपास सात ते आठ हजाराहून जास्त झाडं आपल्या परिसरात लावली आहेत. तोंडचं पाणी पाजून आपल्या लहान पोराला जस जगवतात तशी झाडे या गावांन वाढवलेली आहेत.
त्यामुळेच आज चिंचणी हे गाव “दुष्काळी भागातलं महाबळेश्वर” म्हणून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात ओळखायला लागल आहे.
पक्ष्यांना व प्राण्यांना त्रास होऊ नये म्हणून या गावातली लहानसहान मुलं गेली कित्येक वर्षे दिवाळीत फटाके फोडत नाही इतकी जागृती या गावात आली आहे.
आणि या छोट्या छोट्या जागृतीमधूनच अख्या चिंचणी गावालाच कृषी पर्यटन गाव म्हणून विकसित करता येतं का? या विचारातूनच गावकऱ्यांनी,
महाराष्ट्र राज्यातलं पहिलंवाहिलं कृषी पर्यटन गाव बनवण्यासाठी कंबर कसली आहे.
असं हे चिंचणी गाव सह्याद्रीच्या हिरव्यागार कड्या कपारीतून तुटलेलं. निसर्गाशी, प्राणी मात्रांशी, पशु पक्षांशी पुरातन मैत्री असलेल समृध्द असं गाव. धरणामुळे मुळातून उखडून दुष्काळी भागात कायमचं विस्थापित झालं.
या गावच्या पहिल्या दोन पिढ्या या दुष्काळात होरपळल्या, पण नव्या पिढीनं आपल्या मुळाचा शोध घेत घेत धरणामूळ उध्वस्त झालेलं जुनं गाव नव्याने “प्रति महाबळेश्वर व कृषी पर्यटन गाव” म्हणून उभा करण्याचा निर्धार केला आहे.
साऱ्या चिंचणी गावान एक ध्यास, नवं स्वप्न उराशी बाळगून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळातील डोळ्यांना आणि मनालाही सुखावणारी हिरवळ अपार कष्ट आणि मेहनतीतुन उभी करून, “हिरवळीच गाव, झाडाच्या गर्दीत गुडूप झालेलं गाव अन जणू प्रतिमहाबळेश्वरचं” अशी नव्याने निर्माण केलेली ओळख व घेतलेली झेप नक्कीच सर्वांना ऊर्जा निर्माण करणारी आहे.
– सुधीर नलवडे, तासगाव, जि. सांगली
9923109900
हे ही वाच भिडू.
- रोगराईतून मुक्त होण्यासाठी कोकणातले हे गाव शेकडो वर्षांपासून जनता कर्फ्यू पाळते
- विप्रोत ३ टक्के म्हणजेच ५ हजार कोटींचे शेअर्स अमळनेर गावचे आहेत
- जगप्रसिद्ध गांजा पिकवणाऱ्या “मलाणा” गावात भारताचा कायदा चालत नाही.